साठवणूक (भाग ३)
“एखादी साडी माझ्या बहिणीला दिली तर काही कमी होणार नाही.” पंकज म्हणाला
“त्या साड्यांचे फॉल पिको करून झालेत आणि ब्लाउजही शिवायला गेलेले आहेत. अशी अर्धी साडी देऊ का तुझ्या बहिणीला? तू म्हटला असतास तर काल काहीती घेऊन आले असते.” कीर्ती म्हणाली
“बघ बघ तुझ्या कपाटात असेल एखादी साडी. काढ एखादी बऱ्यापैकी साडी.” पंकज म्हणाला
“अरे पण ताई तिकडे आईकडे आल्या आहेत ना तर तिकडे एखादी साडी घेतलीच की.” कीर्ती म्हणाली
“ते घर आणि हे घर काय वेगळं आहे का? बघ एखादी साडी. द्यायची नसेल तर सरळ सांग.” पंकजही कधी नव्हे ते चिडला होता. कीर्ती रागातच आतल्या रूममध्ये गेली. तिनं कपाटातून एक साडी काढली आणि पंकजच्या समोर आणून ठेवली.
“ही? ही तर मी बेंगलोर वरून आणलेली साडी आहे ना? ही देणार आहेस ताईला?” पंकज म्हणाला.
“माझ्याकडे दुसरी साडी शिल्लक नाहीये. ही साडी आहे. हीचा फॉल पिको, ब्लाऊज सगळंच राहिलं आहे. हीच देऊन देते.” कीर्ती म्हणाली
“म्हणजे मी एवढ्या आवडीनं आणली त्याचं तुला काहीच नाही.” पंकजला तिचा राग आला होता.
“मग तू आधी सांगायला हवं होतं ना की तुझ्या बहिणीसाठी काहीतरी आणायचं आहे. मी आणून ठेवलं असतं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. दुकानात जाऊन घेऊन येते साडी. ड्रेस म्हणशील तर ड्रेसही आणते.” कीर्तीचा आवाज वाढला होता
“राहू दे काही आणायची गरज नाहीये.” पंकजला कीर्तीचा राग आला होता
“ते शेविंग किट, शेविंग जेल दोन-दोन ठेवलेले आहेत एक तुझ्या बाबांना देऊन दे.” कीर्ती म्हणाली
“अगं माझं दुकानात जाणं होत नाही सारखं म्हणून मी आणून ठेवलेत ना.” पंकज म्हणाला
“अरे जाशील ना दुकानात, एवढं काय त्याच्यात. सध्या दोन-दोन आहे तर एक देऊन दे.” किर्ती म्हणाली
“एवढे महागडे!” पंकज म्हणाला
“म्हणजे स्वस्त असतेस तर दिले असते का?” कीर्ती रागातच आत निघून गेली.
पंकज आणि कीर्ती दोघं नवरा बायको. शर्विल आणि सान्वी त्यांचे मुलं. पंकज नोकरीनिमित्त शहरात राहत होता. त्याचं गाव शहरापासून तासभराच्या अंतरावरच होतं. गावी त्याचे आईवडील राहात होते. दुसऱ्या दिवशीचा रविवार होता म्हणून दोघेजण गावी जाणार होते. गावी पंकजची बहिण माहेरी आलेली होती.तिचीही भेट होईल आई-वडिलांची ही भेट होईल म्हणून दोघेजण दुसऱ्या दिवशी निघणार होते.
आज कधी नाही ते पंकज कीर्तीला आवरसावर करू लागत होता. घर आवरताना त्यांना बरंच सामान आईसाठी द्यायचं म्हणून बाजूला काढलं होतं.
दुसऱ्या दिवशी सगळे पंकजच्या घरी गेले आणि संध्याकाळी परत घरी आले.
क्रमश:
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा