Login

सत्याचा श्वास भाग - २ (अंतिम भाग)

सीआयडी टीम मिळून एक संशयास्पद मृत्यूचं गूढ उलगडतात. पुरावे त्यांना थेट खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवतात.
सत्याचा श्वास भाग - २ (अंतिम भाग)


दुसऱ्या दिवशी सकाळी सईने घेतलेल्या ठशांचे विश्लेषण पूर्ण झाले. ती सर्वांच्या समोर फाईल उघडून म्हणाली,
“हा बूटाचा ठसा गुप्त विभागातल्या फक्त तीन लोकांजवळ असू शकतो.”

नावे होती, अधिकारी देव, अधिकारी राघव आणि वरिष्ठ अधिकारी विक्रम. सगळेच अनुभवी, शिस्तबद्ध आणि दिसायला स्वच्छ प्रतिमेचे.

अभिजीत म्हणाला, “आपल्याला त्यांच्या हालचाली तपासाव्या लागतील. कोण त्या रात्री त्या ठिकाणी असू शकतं?”

गणेशनं त्यांच्या फोनच्या नोंदी काढल्या. राघव आणि देव दोघेही त्या रात्री शहराबाहेर होते. पण विक्रमचा फोन त्या जुन्या इमारतीजवळील टॉवरमध्ये नोंदला होता.
सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे वळल्या.

मीरा म्हणाली, “विक्रम एवढा मोठा अधिकारी… त्याने असं का केलं असेल?”

सई शांतपणे म्हणाली, “मला दुसरा पुरावा मिळेपर्यंत आपण कोणालाही दोषी म्हणू शकत नाही.”

त्या दुपारी टीम विक्रमला चौकशीसाठी बोलावते.
तो अत्यंत शांत, निर्धास्त आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता.

“मी त्या भागातून जात होतो, इतकंच,” तो म्हणाला.
“त्या इमारतीशी माझा काहीही संबंध नाही.”

सई त्याचं बोलणं ऐकत होती, पण तिचं मन दुसरीकडे चाललं होतं. तिला त्या खोलीतील एक जुना कागद आठवला, जो तिला काल साधा (तपासासारखा दिसत नसलेला) वाटला होता. ती परत खोलीत जाऊन तो कागद आणते.

तो कागद एका नोंद वहीतला फाटका पान होता, पण त्यावर एका प्रकल्पाची आकडेमोड, निधीची नोंद वगैरे होती.
सई म्हणाली, “हे बघा… हा प्रकल्प विक्रम यांच्या देखरेखीखाली होता.”

विक्रम थोडा हलला. “हे… हे कुठून आलं? तो कागद मी कधीच पाहिला नाही.”

अभिजीत कठोर आवाजात म्हणाला, “हा कागद मृत अधिकाऱ्याच्या हातात का होता? त्याला याचा तपास करायचा होता का?”

सईने लगेच दुसरा पुरावा काढला, खिडकीवरून सापडलेला सूत. “हा सूत देखील तुमच्या कोटशी जुळतो. आम्ही तपास केला आहे.”

विक्रमच्या चेहऱ्यावर घाम फुटला. “तुम्हाला कळत नाही…मला धमक्या मिळत होत्या…त्या अधिकाऱ्याने काही चुकीचं समजून मला अडचणीत आणणारं होतं… मी फक्त त्याच्याशी बोलायला गेलो होतो.”

पण मीरा म्हणाली, “मग का पळाला? का जबरदस्तीने खिडकीची कडी तोडली?”

विक्रम अखेर शांत बसला. खूप वेळानंतर त्याने हळू आवाजात कबुली दिली, “मी त्याला दुखावलं नाही… पण आम्ही वाद घालत असताना तो घसरून पडला. मला वाटलं, लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत… म्हणून मी तिथून निसटलो.”

सई म्हणाली,‌ “तुम्ही सत्य लपवलंत, तो मोठा गुन्हा आहे आणि पुरावे सांगतात की तुम्ही एकटे नव्हतात. तिथे आणखी कुणीतरी होतं.”

विक्रमने डोळे मिटले. “हो… प्रकल्पातील पैशांवर डोळा ठेवणारे काही बाहेरील लोक होते. ते अधिकारीवर दबाव आणत होते. पण त्यांचं नाव मला माहित नाही.”

अभिजीतने ठाम निर्णय घेतला, “गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अजून सापडलेला नाही. पण पहिली कडी आपण सोडवली आहे.”

काही तासांच्या पुढच्या तपासानंतर, विक्रमने दिलेल्या माहितीतून त्या बाहेरील लोकांचा माग काढण्यात टीमला यश मिळालं. कायद्याच्या चौकटीत सर्व कारवाई करण्यात आली.

सगळा तपास पूर्ण झाल्यावर अभिजीत म्हणाला,
“सई, तुझ्या निरीक्षणामुळे हे प्रकरण योग्य मार्गाने गेलं. तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं.”

सई शांतपणे हसली. “पुरावे कधीच खोटं बोलत नाहीत. फक्त त्यांना योग्य आवाज द्यायचा असतो.”

टीम इमारतीबाहेर आली. पावसाळा ओसरत होता.
वारा हलका सुटला होता. एका कठीण तपासानंतर, त्यांचा दिवस पूर्ण होत होता.

पण सईच्या मनात मात्र एकच विचार होता, प्रत्येक गुन्हा सावलीतून सुरू होतो… पण पुरावा त्या सावलीला प्रकाशात आणतो.