सावळी 1
"अहो वहिनी, शुभ्राला मुलगा पाहायला आल्यानंतर थोडे चांगले कपडे घालायला सांगत जा ना. तिचे कपडे तिला खूप साधे वाटतात हो. नाहीतर माझ्या ओळखीचे एक दुकान आहे तिथे घेऊन जाऊ का मी तिला?" शुभ्राची काकू शुभ्राच्या आईला म्हणाली.
"अहो वहिनी, पाच पाच हजाराचे ड्रेस आहेत ते. एका डिझायनर दुकानातून तिच्यासाठी खास ब्रॅण्डेड ड्रेस मागवले आहेत ते ड्रेस ती घालते आणि तरीही तिला ते उठावदार दिसत नाहीत त्याला मी तरी काय करू?" शुभ्राची आई काळजीने म्हणाली.
"अहो वहिनी, तसे नाही हो. आपली शुभ्रा मुलाकडच्या लोकांना छान दिसावी इतकेच माझे म्हणणे होते. बाकी आपली शुभ्रा आपल्यासाठी खूप सुंदरच आहे. तिला आपण कधीच नाव ठेवत नाही; पण कितीही स्थळं आली तरीही तिला कोणीच पसंत करत नाही त्यामुळे तिची काळजी वाटतेय हो." शुभ्राच्या काकू शुभ्राच्या आईला म्हणाल्या.
"आमची पण तीच अवस्था झाली आहे हो. मला सुद्धा तीच काळजी पडली आहे. इतकी शिकली सवरलेली आपली शुभ्रा; पण तिच्या शिक्षणाचा इथे मात्र काहीही उपयोग होत नाही. आज एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये ती जॉब करते आहे; पण तरीही तिचं दिसणं इतकं महत्त्वाचं आहे का? आपल्या काळामध्ये स्त्रिया शिकलेल्या नसायच्या म्हणून त्यांचे रूप पाहिलं जायचं; पण आता मुली शिकून आपल्या पायावर उभ्या आहेत, तरीही मुलांना रूपच पाहायचे असते असे का?" शुभ्राच्या आईने शुभ्राच्या काकूला प्रश्न केला.
"हो ना; माझेही तेच म्हणणे आहे त्यामुळेच मी तुम्हाला म्हटले की शुभ्रासाठी एखादा छान ड्रेस घेऊयात की ज्यामुळे ती त्या ड्रेसमध्ये छान दिसेल आणि मुलाकडचे तिला पसंत करतील." शुभ्राच्या काकू म्हणाल्या.
"आई, काकू लग्न इतके महत्त्वाचे आहे का? मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे, आज लाखोंनी पगार मिळवते आहे हे फार असं महत्त्वाचं नाही का तुमच्यासाठी? आता एखाद्या मुलीला कुणी पसंत करत नसेल तर त्यात मुलीची काय चूक आहे? कपडे वगैरे बदलून ब्रँडेड कपडे घालून काही तिचा मूळचा रंग बदलणार आहे का? तिचा रंग जो आहे तोच राहणार ना! मग मुलांचा दृष्टिकोन बदलायला हवा." शुभ्रा म्हणाली.
"तू म्हणतेस ते बरोबर आहे गं बाळा." असे म्हणून पुढे तिची आई बोलणार इतक्यात शुभ्राचे बाबा तिथे आले.
"शुभ्रासाठी एक खूप सुंदर स्थळ आले आहे. मुलगा मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब करतो, शिवाय त्यालाही लाखोंचा पगार आहे. मुलगा देखणा, रुबाबदार आहे. तो उंच सुद्धा आहे. आपल्या शुभ्राला अगदी शोभण्यासारखा लाखात एक मुलगा आहे. मी थोडीफार चौकशी करून आलो आहे. मुलग्याचा स्वभाव देखील खूप चांगला आहे, शिवाय तो निर्व्यसनी आहे हे मला चौकशीत समजले आहे." असे शुभ्राचे बाबा त्या मुलाचे भरभरून कौतुक करत होते; पण तिथे असलेल्या एकाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. कारणही तसेच होते. शुभ्रा थोडीशी सावळ्या रंगाची होती, शिवाय ती चार चौघींमध्ये उठावदार देखील दिसत नव्हती; पण तरी ती नाकीडोळी छान होती, उंच असून तिचे मोठे केस होते त्यामुळे या सर्वामुळे तिचा रंग जरी कमी असला तरी ती छान दिसायची; पण तरीही तिला कोणीच पसंत करत नव्हते. अगदी साधारण मुलं देखील तिला पसंत करायचे नाहीत. आता हे स्थळ आले आहे. मुलगा देखणा आहे तर हा काय पसंत करणार? असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये घोंगावत होता, त्यामुळे सगळेजण नाराज झाले होते.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा