सकाळचे साडे आठ वाजले असतील. बाहेरच्या हलक्या थंडीमुळे किचनच्या खिडकीतून येणारी हवा देखील जराशी गार वाटत होती. मुग्धा किचनमध्ये कामात गुंतली होती, पण तिचे मन आणि शरीर कमालीचे थकलेले होते. घड्याळाकडे बघत ती पटापट काम संपवत होती, कारण प्रतीकचा लवकर जाण्याचा नेम ठरलेला होता.
आज नाष्ट्याला तिने मेथीचे खमंग पराठे केले होते. पराठे तव्यावर भाजले जाताच तुपाचा आणि मेथीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळला. तिने लगबगीने चहाचे 'अधण' ठेवले आणि सुनंदाबाईंच्या नाष्ट्याची प्लेट तयार केली. गरम पराठा आणि सोबत लसणाची तिखट चटणी.
सुनंदाबाई डायनिंग टेबलवर येऊन बसल्या. पहिल्या घास घेण्या आधीच त्यांनी प्लेटमध्ये निरखून पाहिले,
सुनंदाबाई डायनिंग टेबलवर येऊन बसल्या. पहिल्या घास घेण्या आधीच त्यांनी प्लेटमध्ये निरखून पाहिले,
" मुग्धा मला पराठ्या सोबत चटणी नको. दही दे. किंवा लोणी दे."
"ठीक आहे आई,"
मुग्धा हसून म्हणाली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती तयारी करायला लागली. तिला खरे तर खूप थकवा जाणवत होता. काल रात्री छोट्या चिनूने तिला अजिबात झोपू दिले नव्हते. थंडी सुरू झाल्यामुळे त्याला सर्दी-खोकला झाला होता आणि तो रात्रभर अस्वस्थ होता.
बाळाला बरं वाटावं म्हणून ती रात्रभर जागी होती. औषध देऊनही फरक पडेना म्हणून तिने मध्यरात्री त्याला रुमालाने शेकले, तेव्हा कुठे त्याला शांत झोप लागली. हे सगळे करेपर्यंत रात्रीचे अडीच वाजले होते. जरासा डोळा लागला, न लागला तोच सकाळ झाली. पण कामांना सुट्टी नव्हती.
प्रतीकला सकाळी लवकर कामावर जायचे असते. तो नाष्टा करून जातो आणि जेवणाचा डबाही सोबत घेऊन जातो. त्यासाठी आज पराठे केले होते.
थोड्याच वेळात प्रतीक तयार होऊन आला. त्याने पटकन नाष्टा केला, डबा घेतला, आईसोबत दोन-चार गोष्टी बोलला आणि कामासाठी निघून गेला.
तो गेल्यावरही सुनंदाबाई अजून पराठे खात होत्या, आणि त्यांच्या तक्रारी सुरूच होत्या. त्या बोलत मनात होत्या, पण जसे जसे पोट भरत गेले, तसा त्यांच्या तक्रारीचा सूरही वाढू लागला.
" पराठे जरा जाड लाटायला हवे होते. पराठे आहेत, पापड नाही की पोळी नाही... अगदी कागदा सारखे झाले आहेत."
"पराठ्यासोबत दही खातात. हे पण समजत नाही हिला. काय माहिती स्वयंपाक करते की चेष्टा करते."
काही वेळात, त्यांचा आवाज वाढला. "आई ग. चहा थंड झाला. मुग्धाऽऽऽ अगं, चहा थंड झाला बाई. जरा गरम करून आण."
मुग्धा किचनमध्ये काम करत होती. सुनंदाबाईंचे बोलणे तिच्यासाठी काही नवीन नव्हते. त्यांना माहीत होते की बाळ लहान आहे, ही त्याची पहिलीच थंडीची सिझन आहे आणि मुग्धाला जागरण होत आहे. अशावेळी आपण थोडी मदत करावी किंवा निदान बोल लावून त्रास तरी देऊ नये, हे त्यांना कोण समजावणार !
मुग्धाच्या लग्नाला आता चार वर्षे झाली होती. लग्न करून आली तेव्हा ती खूप स्वप्न उराशी बाळगून या घरात आली होती. सगळ्यांना आपलंसं करेन, पाण्यात साखर विरघळते तशी या घरात विरघळून जाईल... पण ते स्वप्न तिचं स्वप्नच राहिलं.
सुनंदाबाईंचं म्हणणं घरातील अंतिम शब्द होता. सासरे देखील त्यांच्या विरुद्ध काही बोलत नसत, त्यांचे फारसे कशात लक्ष नसे.
सुनंदाबाईंना मुग्धाने केलेली कोणतीही गोष्ट कधीच पसंत पडत नसे. त्यांचे नेहमीचे म्हणणे असायचे,
" मुग्धा म्हणजे फक्त काम उरकायची बघते. जरा सांभाळून निगुतीने हिला कोणतंही काम करता येतच नाही."
त्या लगेच तुलना करायच्या,
"माझी निकिता होती तर कशी चटचट काम करायची ! घर नेहमी स्वच्छ ठेवत असे, अगदी झडून-पुसून लख्ख. कपडे व्यवस्थित घडी करून प्रत्येकाच्या कपाटात जागच्या जागी ठेवत असे. कोणाला कधी रुमाल सापडला नाही की मोजे मिळत नाहीत, किंवा कॉलर नीट धुतली नाही अशी तक्रार करायला संधीच मिळत नाही. मुग्धा म्हणजे मुलखाची हळू बाई, वेंधळी. हतासर्शी काम करायला जमतच नाही. हा एवढा भांड्यांचा ढीग साचलेला असतो किचनमध्ये."
सुनंदाबाईंचे हे टोमणे मुग्धाच्या काळजावर वार करत होते. तिचे मन खट्टू झाले. पण तिने स्वतःला समजावले, 'स्वभावाला औषध नसते.' तिने त्यांचे बोलणे दुर्लक्ष करायचे ठरवले. पण बाळाच्या रात्रीच्या जागरणामुळे आलेला थकवा आणि सासूबाईंचे कठोर शब्द यामुळे तिला ते शक्य होत नव्हते.
चिनूच्या हळुवार रडण्याच्या आवाजाने मुग्धा भानावर आली. तिला लगेच धावत आत जावे लागले.
दोन दिवसांनी संध्याकाळचा काळ. प्रतीक नुकताच कामावरून घरी आला होता. हॉलमध्ये आरामखुर्चीत बसून तो मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. मुग्धा स्वयंपाकाची तयारी करत होती. किचनमधून वासासोबतच भांड्यांचा हलका आवाज येत होता. सुनंदाबाई प्रतीकच्या शेजारी बसल्या आणि त्यांनी हळूच विषय काढला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा