सवाष्ण
"अग रेश्मा एक विचारू कां तुला? रेश्माच्या सासूबाई रेश्माला विचारत होत्या."
"अहो आई विचारा नां. त्यात काय मोठसं."
तू आणि तुझ्या मैत्रिणी मिळून जे हळदीकुंकू ठेवलं आहे. त्यात विधवा, परित्यक्ता यांनाही आवर्जून बोलावलं आहे म्हणे तुम्ही.
हो नां आई, ही बघा पत्रिका यात आम्ही लिहिले आहे,
आपल्या सख्यांमध्ये विधवा, सधवा, परित्यक्ता असा भेदाभेद करून "महिला शक्ती"चे खच्चीकरण करणाऱ्या रूढी, परंपरांना फाटा देऊन "महिला शक्ती"चे संघटन व सबलीकरण करण्याचे कार्य करण्याच्या उद्देशाने आमचे सावित्रीबाई फुले महिला मंडळ हळदी कुंकवाच्या निमित्ताने स्नेह मिलन सोहळा आयोजित करत आहे. तेव्हा आमच्या या महिला मंडळाच्या उपक्रमाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व हळदी कुंकू व वाणं घेण्यासाठी उपस्थित राहावे.
सीमाताईंनी ही पत्रिका वाचली आणि खरचं त्यांना आपल्या सुनेचे कौतुक वाटले.
आणि हो आई, यात पहिला मान तुमचा असेल. रमणचे बाबा म्हणजे माझे सासरे गेल्यापासून तुम्ही सारख्या गप्प गप्प असता. दरवर्षी संक्रांतीला तुम्ही किती छान अगदी सजून नथ घालून माझ्यासोबत हळदी कुंकवाला यायच्या. माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या सुद्धा,
"अग रेश्मा तुझ्या सासूबाई आणि तू अगदी बहिणी बहिणी वाटता बघ."
बाबा गेल्यानंतरची ही तुमची पहिलीच संक्रांत. मी सारखी पाहत आहे, खिडकीतून हळदीकुंकवाला जाणाऱ्या स्त्रिया दिसल्या, की तुम्ही आणखीनचं अस्वस्थ होता. पण काही नाही, आज कुंकू लावून वाणं देण्याचा पहिला मान मी तुम्हाला देणार आहे.
"नाही ग रेश्मा हळदी कुंकू, वाणं हे सवाष्ण स्त्रियांसाठी आहे."
अहो आई, असा विचारही तुम्ही मनात आणू नका. समाजातल्या बऱ्याच लोकांच्या मनात अजूनही रुतून बसलेल्या अनेक रूढी, परंपरा, कुप्रथा यात बदल झालाच पाहिजे आणि असे केवळ म्हणून उपयोग होणार नाही. प्रत्येकाने स्वतः पासून त्याची सुरुवात केली पाहिजे. तेव्हा आई चला मी तुमची छान तयारी करून देते.
सीमाताईंच्या चेहऱ्यावर आज प्रथमच रेश्माला हास्य दिसले.
खरंच गुणाची गं माझी सुनबाई!! म्हणत सीमाताईंनी रेश्माला जवळ घेतले. रमण हे सर्व दुरून पाहत होता. खरंच त्यालाही त्यामुळे खूप बरं वाटलं.
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा