सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 11

Reality is different than imagination

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 11

मागील भागात आपण पाहिले की,नेहा रमेशला दोन दिवसाचा अवधी देते. पण त्या नंतर ती त्याच्याशी कामापुरतं बोलत असते,हा रमेशचा वीक पॉइंट असतो, त्याला ती जर बोलली नाही की,अस्वस्थ व्हायचे आणि मग शेवटी हार मानुन तो तिच्या गोष्टी पटत नसल्या तरी हो म्हणायचा.

रमेशने ही गोष्ट त्याच्या खास मित्राबरोबर डिसकस केली आणि त्यावरुन त्याने  त्याचा निर्णय तिला सांगितला,तो असा होता की मी तिच्या बरोबर कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवणार नाही,हे मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे आणि अजून एक अट होती की लग्न साध्या पद्धतीने म्हणजे रजिस्टर केलं तरी चालेल.

नेहा-"अरे पण मला मुलांची अपेक्षा आहे,आपण IUI करु म्हणजे तुझ्या मनासारखं पण होईल,तंत्रज्ञानाची मदत घेऊ".

नेहा-" सॉरी रमेश, मला तुला दखवायच्ं नव्ह्तं,पण माझ्या समोर दुसरा पर्याय नव्हता,But I love you, तू पुन्हा एकदा तुझं माझ्यावरच प्रेम व्यक्त केलं  आणि माझी निवड किती बरोबर आहे हे ही सिध्द केले ".

रमेश-"तू मला या जन्मात राम नाही होऊ दिलसं, ह्या गोष्टीची मला नेहमी खंत वाटेल"

नेहाने तिच्या आईवडीलांना व सासू सास-यांना ही गोष्ट सांगितली पण अटीचा तिने कुठेही उल्लेख केला नाही,तिने विचार केला ,इथे आपण दोघेच तर रहातो,कुणाला काय कळणार आणि IUI नी सरोज गरोदर राहिली तर कुणाला काही संशय ही येणार नव्हता.

ठरल्याप्रमाणे लग्न साध्या पध्दतीने झाले,तिचे सासू सासरे खुश होते,आईवडीलांची द्विधा मनस्थिती होती ,सरोजच्या आईने मात्र तिच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली म्हणून आभार मानले.

या सर्व गोष्टी मध्ये रमेश निर्विकार होता, तो नेहाला म्हणत होता ,हे सगळं तुझ्या साठी सहन करतोय. लग्न करून सरोज नेहा बरोबर तिच्या घरी आली म्हणून खुश होती,सारखी ताई ताई करत होती,तीही सरोजची काळजी घेत होती.घरातल्या घरात एक छोटीशी सत्यनारायणाची पुजा घातली,सासुबाईंची 

इच्छा होती मोठी घालायची पण रमेशच्या विरोधामुळे त्या शांत बसल्या.

सासू सासरे दोन तीन दिवसांनी गावी जाणार होते, सरोजला स्वतंत्र रुम देण्यात आली . नेहा आणि रमेश त्यांच्या रूम मध्ये झोपायला निघाले ,तसे तिच्या सासूबाई रमेशला म्हणाल्या,नवीन सुनबाईंच्या रूम मध्ये झोपायला जा,तसा रमेश रागाने नेहाकडे पाहू लागला,नेहा म्हणाली,आज राहू द्या,दमले असतील ते, रमेश रागाने निघून जातो.

बेडरूम मध्ये गेल्यावर रमेश तिला म्हणतो -"तू सांगितलं नाही का माझ्या  अटींबद्दल त्या सगळ्यांना "

नेहा-"तुला तर माहित आहे ,ते थोडी नेहमीसाठी इथे रहाणार आहे,दोन दिवसांनी जातील गावाला,तोपर्यंत शांत रहा आणि उद्या तू सरोजच्या रूम मध्ये कुणाला संशय नको यायला म्हणून जा झोपायला ,तू सोफ्यावर झोप आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे,फक्त उद्याचाच दिवस प्लीज़ "

रमेश-" तू मला पूर्ण पणे यात अडकवून टाकलय,अजून काय काय होणार आहे माहित नाही,रितसर लग्न करून मी आता कोणत्याही गोष्टीला नकार देऊ शकत नाही."

रागातच रमेश झोपतो,तिच्याकडे पहातही नाही,एक क्षण नेहाला वाटते ,हा माझ्या पासून दूर तर जाणार नाही ना,ही तिची भिती खरी ठरते का,हे आपल्याला नंतर कळेल.

दुस-या दिवशी सकाळी, रमेश ऑफीसला जातो, तिथे कुणाकडून आणि कसं कळलं माहित नाही ,की तयार त्याने दुसरं लग्न केलं आहे. जेवताना त्याचे मित्र त्याला म्हणतात ,एकीला सांभाळतांना नाकी नऊ येते ,तू दोघींना कसं हँडल करतो माहित नाही, मजा आहे बाबा तुझी .

त्यावर तो काही न बोलता निघून जातो,त्याचे मित्र म्हणतात ,हा का गेला असा,अरे काही नाही रे दोन माल आहे ना आता त्याच्याकडे,मग आता त्याला आपली काय गरज.

दुसरा मित्र -" देव त्याचं भलं करो"

आधीचा मित्र-"तुला त्याचा लई कनवाळा "

मित्र-"अरे दोन बायका असल्या की शांती बिलकुल लाभत नाही ,दोघींच्या मध्ये बिचा-या नव-याचं मरण होतं,म्हणून बोललो"

मित्र-"अरे मी तर असं ऐकलं त्याच्या आधीच्या बायकोने हट्ट करून त्याला लग्न करायला लावलं,तिच्या हट्टाखातर त्याने लग्न केलं,त्याचं खुप प्रेम आहे तिच्यावर,जी दुसरी बायको आहे ती तिचीच मैत्रीण आहे"

मित्र-"काहीही असू दे ,आता लग्न झालेय म्हटल्यावर तो चान्स थोडा सोडणार आहे,मुल काय असचं होईल"

असं म्हणून सगळे हसतात,तो दारापर्यंत जाइस्तोवर त्याच्या कानात कुजबुज सगळी गेली होती,तरी तो शांत होता.

ऑफिस संपल्यावर त्याची घरी जायची इच्छा नव्हती, म्हणून तो जरा वेळ बागेतच बसला , 8.00 वाजले तर घरी जायला निघतो.

घरी पोहोचल्यावर आई  -"रोज असाच उशीर होतो का"

रमेश-"नाही,आज  थोडं काम  होतं, तुम्ही जेवलात का"

आई-"नाही अजून ,तुझीच वाट पाहत होतो "

रमेश-"आलोच मी फ्रेश होऊन "

फ्रेश होऊन येतो ,तर सरोज सुध्दा तिथेच असते .

सगळे जेवायला बसतात , जेवणात शिरा बघून तो विचारतो -"आज काय विशेष?"

आई-"सरोज ने पहिल्यांदा शिरा बनवला आहे,कसा झालाय ,सांग पाहू,म्हणजे नेहाने थोडी मदत केली होती "

सरोज लाजून खाली मान घालते.

रमेश-"ठिक आहे,पण नेहा तुला माहित आहे ना मला तुझ्या हातचा आवडतो ,तुच करत जा"

नेहाला सगळ्यांसमोर काही बोलता येत नाही,ती डोळ्याने त्याला शांत बस असे सांगते.

जेवल्यावर तो त्यांच्या रूम मध्ये निघून जातो,इकडे सासूबाई नेहाला सरोजला तयार करायला सांगतात ,त्या थोडी रूमची सजावट स्वत: करतात ,आता मात्र नेहाला असं वाटतं की आपण खरच बरोबर निर्णय घेतला का,पण मग मला कशाच्ं वाईट वाटतय, माझा रमेश वर पूर्ण विश्वास आहे,अस ती मनाला समजावते.

ती सरोजच आवरते ,तिला बेडवर बसवते तर सासू बाई म्हणतात -"जा,आणि त्याला पाठवून दे आणि सांग वर्षाच्या आत नातवंड आलं पाहिजे"

नेहा चिडूनच जाते,रूममध्ये गेल्यावर रमेशला सांगते -"तुला बोलवलय्ं आईंनी आणि हे पण म्हणाल्या वर्षाच्या आत मुल झालं पाहिजे"

रमेश तिच्याकडे रागाने बघत-"तुझ्यामुळे झालय्ं आणि भोगावं मला लागतय्ं "

असं म्हणून तो तरा तरा निघून जातो,आई बाहेरच असते.

आई-"सांभाळून जरा ,पोरगी भोळसट आहे जरा आणि वर्षाच्या आत आम्हांला आजी आजोबा करा म्हणजे आम्ही सुटलो"

रमेशला खुप काही बोलण्याची इच्छा होती,पण शांत बसला ,त्याने विचार केला,उद्या सकाळी हे जाणार तर आहेत ,मग कशाला विषय वाढवा.

रमेश सरोजच्या रूममध्ये जातो,दार लावतो,सरोज त्याला दूध देते, तो तिला विचारतो ,कुणी सांगितल ,ती म्हणते ,आईनी सांगितल.

रमेश बेड जवळ खुर्ची घेऊन बसतो-" तुला आवडत का दूध?"

सरोज-"हो"

रमेश-"मग तू पी"

सरोज-"पण तुम्हांला"

रमेश-"नको मला तू पी"

सरोज-"पण तुम्ही दूध नाही पिल तर मला त्रास कसं देणार"

रमेश-"तुला कुणी सांगितल आता हे"

सरोज-"आई बोललेली,लग्न झाल्यावर असच असतं,पण नवरा म्हणजे देव असतो , त्याने काही केलं तरी ओरडायचं नाही"

रमेश-"अजून काय काय सांगितल,नेहा ताईचं सगळं ऐकायच , मग काही दिवसांनी बाळ झाल्यावर आम्ही दोघी त्याला सांभाळू ,मला मूल खुप आवडतात,मुले म्हणजे देवाघरची फुले असं बाबा म्हणायचे".

इतक्यात रमेशचा फोन वाजतो , तो जाणुन बुजुन फोन उचलत नाही.

रमेश मनातल्या मनात म्हणतो,खरचं किती निरागस आहे ही.

रमेश-"सरोज ,तुला झोप येत असेल ना ,तू झोप ,मी झोपतो सोफ्यावर "

सरोज-"झोपायचं मग तुम्ही मला त्रास नाही देणार ना"

रमेश-"नाही ग,झोप तू आरामात ,गुड नाईट"

सरोज-"गुड नाईट"

रमेश -" तू बाथरूम मध्ये जाऊन कपडे बदलून झोपू शकते ,नाही तर तुला झोप नाही येणार"

सरोज-"बरं"

रमेश सोफ्यावर दुसरीकडे तोंड करून झोपण्याचा प्रयत्न करतो.

तितक्यात त्याला बाथरूम मधून काहितरी पडल्याचा आवाज येतो ,तू उठून बघतो तर सरोज साडीत पाय अडकून पडलेली असते.तो तिला उठ्वतो , तर ती त्याच्या कडे बघत रहाते.

तिला सांगतो -"उद्या पासून तू नेहमी सारखा ड्रेस घालत जा"

सरोज-"मला नाही जमत साडी काढायला"

रमेश विचार करतो ,नेहाला बोलवाव म्हणजे ती बदलून देईल,पण नंतर विचार करतो , मला येवढा त्रास देते तिलाही झाला पाहिजे , डोळे बंद करुन तिला साडी बदलायला मदत करतो, मनातल्या मनात नेहाची माफी पण मागत असतो.

त्यानंतर दोघेही आप आपल्या जागेवर जाऊन झोपतात.

इकडे नेहाची कंडीशन वेगळीच असते,तिचा रमेश वर पूर्ण विश्वास आहे,पण तरीही एक अनामिक धाकधूक आहे, रमेश बदलला तर शेवटी किती ही झाल तरी एक पुरुषच आहे,म्हणून ती फोन लावत असते ,तिच्या मनात नाही नाही ते विचार येत असतात आणि इकडे हा फोनही उचलत नसतो. तिला एक क्षण असं वाटतं जाऊन बघावं ,पण सासूबाई असताना बरं नसतं दिसलं,असा विचार करत करत तिला झोप लागली.

(कोणतीही बायको इतकी पुढारलेली नसते की ,ती तिच्या नव-याला दुस-या कोणत्या स्त्री बरोबर वाटून घेईल, नेहाने निर्णय तर घेतला,पण आता तिला या गोष्टींचा त्रासही होतोय, रमेशने ज्या अटींवर लग्न केलेले तो त्याच्या वर ठाम राहील का , तो सरोजच्या निरागस पणामुळे तिच्या वर प्रेम तर करायला लागणार नाही, पुढे काय होईल याची उस्तुकता असेल तर वाचत रहा)

दुस-या दिवसाची सकाळ काय घेऊन येईल हे पाहुया पुढच्या भागात...

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all