सवत माझी लाडकी भाग 3.

सवत माझी लाडकी
"बाई बाळाला घेऊन लवकर चला. इंजेक्शन द्यायला  डॉक्टरांनी बोलावलं आहे. "

मानसीने हे ऐकल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडला आणि ती सासुला म्हणाली,

"मी, येशूला डॉक्टरांकडे नेऊन आणते. मग येऊन सगळं सांगते."

पण मानसीच्या मनात हा प्रश्न होताच की एवढ्या लवकर इंजेक्शनसाठी पैसे दिले तर कोणी दिले.इंजेक्शन दिल्यावर छोट्या यशला थोडी शुद्ध आली. ते पाहून डॉक्टर म्हणाले,

"नशीब, तुमच्या बहिणीने तुम्हाला पाहिलं. थोडा अजून वेळ गेला असता तर बाळाच्या डोक्यात ताप जाण्याचा धोका अजून वाढला असता."

"बहीण ? माझी ?" मानसीने आश्चर्याने विचारलं.

"हो !शलाका देशमाने. तुमच्या मावस बहीणच ना ?"

"त्या म्हणाल्या तसं..पैसे देताना."

हे ऐकून मानसी थबकली. तिला काय बोलावं तेच समजेना. तिने काही क्षण विचार केला आणि डॉक्टरानां विनंती केली.

"मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा पत्ता मिळेल का ? मला त्याच्यां रूपातील देवदुताचे आभार मानायचे आहेत."

हे ऐकल्यावर डॉक्टरच चाट पडले. शलाकाचा काही वेळापुर्वीचा गंभीर चेहरा त्यांना आठवला आणि तिचं बोलणही.

"डॉक्टर !आता जी बाळाला घेऊन आली होती, ती माझी मावस बहिण आहे, पण माझ्या बाबांचा त्यांच्या वडिलांशी वाद झाला होता म्हणून आता आमची बोलचाल नाही आहे. पण तिच्या  बाळाला पाहिलं आणि राहवलं नाही. किती झालं तरी भाचा आहे तो माझा. काय झालं त्याला ? तो मलूल का होता?" शलाकाने डॉक्टरनां विचारलं.

"अहो ! जीवघेणा ताप आहे बाळाला. इंजेक्शननेच जाईल..पण नवऱ्याकडे पैसेच नसतात तिच्या. नेहमीची रड ह्यांची. मी तरी कितीवेळा उधारीवर औषध देणार हो. एकाला दिली की मग सगळेच अपेक्षा करतात."

डॉक्टरांनी सहज आपली बाजू सांभाळत शलाकाला मानसीच्या परिस्थिती बद्दल सांगितल तशी शलाका दोन क्षण विचार करून म्हणाली,

" बरोबर आहे तुमचं ! डॉक्टर किती लागतील इंजेक्शनला. मी देते पैसे, पण बाळाला वाचवा."  शलाका एकदम म्हणाली, तसे डॉक्टर तर चमकले, पण तिलाही तिचं आश्चर्य वाटलं.

तिच्या मनात विचार आला,कोण न कोणाची कोण ती बाई आणि तिचं बाळ.. आपण का एवढी मदत करतोय. तेव्हा शलाकाच्या समोर यशचा गोंडस चेहरा आला आणि तिला तिचा धाकटा भाऊ आठवला. तोही तर असाच वारला होता, पैशाच्या कमतरतेमुळे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे. किमान आज माझ्याकडे पैसे आहेत तर एक जीव वाचवता येत आहे तर का नाही. तिच्या मनाने तिच्याच मनाचा संभ्रम दुर केला आणि मग शलाकाने इंजेक्शनचे अर्धे पैसे दिले व घरी जाऊन परत येऊन अर्धे देईन असं म्हणून ती तिकडून लगबगीने निघून गेली.

डॉक्टरांनाही शलाका नक्की पैसे देईल ह्याची खात्री होतीच. नाहीतर मानसीकडून ते वसूल करू शकले असते म्हणून त्यांनी कंपाऊंडरला मानसीच्या घरी पाठवलं होतं.

डॉक्टर मग हे सगळं आठवून हसतचं मानसीला म्हणाले,

"तुमची देवदूत येतच आहे. थांबा थोडावेळ."

इतक्यात शलाका आत आली आणि म्हणाली,

"डॉक्टर तुमची उरलेली फी. बाळ कसं आहे हो ? दिले इंजेक्शन ? "

"या मिस देवदूत ! तुम्ही बाळाच्या आईलाच विचारा !"

डॉक्टरांनी शलाकाला पेशंट बेडच्या इकडे पडदा जवळ  उभ्या असलेल्या मानसीकडे इशारा करत म्हटलं. तशी शलाका ओशाळली. मानसीला तर एवढं भरून आलं की ती शलाकाच्या पाया पडायला वाकली. शलाकाने मानसीला थांबवलं आणि म्हणाली,

"अहो नको ! मी काही जास्त केलं नाही हो. तुमच्या बाळात मला माझ्या बाळाची छवी दिसली हो.. समजा की हे मी माझ्या बाळासाठी केलयं." हे बोलतानाही शलाकाचा स्वर कातर झाला. मानसीने मग तेव्हा थोडसं शलाकचं जवळून निरक्षण केलं.

शलाका ही प्रौढ कुमारिका होती. सुंदर आणि कर्तीसवरती असुनही योग्य वयात हिचे लग्न कसं जमलं नाही हा प्रश्न स्त्रीसुलभ उत्सुकतेने मानसीच्या डोक्यात चमकून गेला. तरी तिने तो विचार झटकून शलाकाला आपल्या घरी येण्यासाठी आग्रहाची विनंती केली.

शलाकाही थोडावेळ आढेवेढे घेत शेवटी मानसीने घातलेल्या यशच्या शपथेमुळे तिच्याबरोबर तिच्या घरी गेली.

मोहनही आता घरी आला होता. त्याला आणि आपल्या सासू सासऱ्यांना शलाकाची ओळख करून दिली आणि तिने केवढे उपकार त्यांच्यावर केले हे ही सांगितलं. शलाका मात्र ह्या सगळ्या प्रकारामुळे ओशाळली तर मानसीची सासू आणि सासरे भारावून गेले. मोहन मात्र शलाकाच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर भुलला गेला, पण त्याने स्वत:ला सावरत त्याने शलाकाचे आभार मानले.
मग मानसीने  मोहनला हळूच म्हटलं,

"अहो !जरा समोसे आणि कोल्ड्रिंक्स आणाल का ?"

एरवी घरात आल्यावर बाहेर पुन्हा जायला चिडचिड करणारा मोहन लगेच वस्तू आणायला तयार झाला. तो माळ्यावर जाऊन कपडे चेंज करत होता इतक्यात मोहनच्या आईने शलाकाला विचारलं,

"काय ग मिस्टर काय करतात तुझे?"

हे ऐकून मानसीचा चेहरा कसानुसा झाला. ती पटकन तिच्या सासूबाईंना म्हणाली ,

"आई, शलाका यांच लग्न झालं नाही आहे."

"असं होय..! माफ कर हा ! मला दिसत नाही." मानसीच्या सासूने ओशाळत म्हटलं. तिथपर्यंत सान्वी व आभाही खेळून घरी आल्या होत्या. त्याही एका अनोळखी बाईला असं घरात पाहून एकटक तिच्याकडे पाहू लागल्या. त्यांना पाहून शलाका खुदकन हसली आणि म्हणाली,

"अरे वा! मला भाच्याही गोड गोड. हे घे तुम्हाला खाऊ. "

आभा व सान्वीच्या हातात प्रत्येकी पाच रूपये दिले. एवढे पैसे एकदम पाहून दोघी खुश झाल्या आणि त्यांनी ते पैसे आपल्या आईकडे दिले. ते पाहून तर शलाका म्हणाली,

"खुप छान आहे हो गोकुळ तुमचं..मी एक बोलू का तुम्ही काही जॉब का नाही करत ? त्यामुळे तुम्हाला येणारी चणचण जरा कमी होईल. हवतर मी मदत करू का शोधायला ?"

इतक्यात कपडे करून उतरलेला मोहन म्हणाला,

"अहो !दहावी पासही नाही आहे मानसी. आणि मुलं ,घर माझे अधू आई बाबा यांना सांभाळून कुठे नोकरी करणार ती़. "

हे ऐकून शलाकाला तिचा भुतकाळ आठवला, जेव्हा तिला स्थळ यायची  तेव्हा तिचे वडील  तिच्या आईला असचं म्हणायचे,

"अहो !काय घाई आहे. करू सावकाश..घरची हालत सुधरूदे. हीच लग्न झालं तर धाकट्यांच शिक्षण कसं होणार .."

ह्या स्वार्थीपणात त्यांनी शलाकाच्या मनाचा आणि शरीराचा विचारच केला नाही. भावंड मोठी होऊन आपल्या पायावर उभी राहू लागली, तेव्हा शलाकाला समजलं की ती फक्त ए.टी.म. मशीन आहे. मग मात्र ती सावध झाली आणि तिने नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात स्वतंत्र घरोबा केला आणि संबंधही जुजबीच ठेवले. जेव्हा तिच्याकडून पेैशांचा ओघ आटला तेव्हा घरच्यांची दिखाऊ मायाही आटली.

ह्या विरूद्ध मानसीची परस्थिती होती. आई वडीलांना भावाच्या शिक्षणासाठी मानसीचं शिक्षण थांबवलं आणि दहा वर्षांनी मोठ्या मोहन बरोबर लगेच अठराव्या वर्षीच लग्न करून टाकलं. तेव्हापासुन ती संसारगाड्यातच अडकली होती.

हळुहळू शलाकाचे मानसीकडे येण जाणं वाढलं. मोहन हुशार असूनही त्याला शिक्षण नसल्यामुळे कमाईचा वाव नाही हे जाणून घेतल्यावर शलाकानेच त्याला स्पर्धा परिक्षा सुचवल्या आणि त्याची तयारीही करून घेतली. शलाकाने ओळखी काढून एका धर्मादाय संस्थेकडून  मानसीच्या सासूचं ऑपरेशनही करवलं.

ह्या सगळ्या घडामोडीत मोहन शाररीकरीत्या शलाकाकडे आकर्षित झाला.

*********************************
हे सगळं कळल्यावर आभा अजूनच फणफणत आईला म्हणाली,

"म्हणजे आई त्या शलाकाने जाणूनबुजून बाबांना आपल्या जाळ्यात ओढलं"

त्यावर मानसी हसली आणि कडवटपणे म्हणाली,

दरवेळी तिसऱ्या बाईची चूक असते असं का समजतो आपण. विवाहबाह्य संबंध बनवणारा तो तर तेवढाच जबाबदार आहे आणि त्याला संसारात हवं ते देण्यात सक्षम नसलेली बायकोही तर तेवढीच चुकीची असू शकते ना ?

"म्हणजे ? आई कसं का म्हणतेस..प्लीज काय म्हणायचं आहे तुला?

का बोलली मानसी असं ..का तिने शलाका एवजी मोहनला आणि स्वतः ला दोषी ठरवलं. हे कळेल पुढच्या भागात.