Login

सावत्र....

सावत्र आई व मुलाची कथा
लघुकथा

शीर्षक:- सावत्र....

"सावत्र ऽ ऽ सावत्र ऽ ऽ.." त्याचे हे शब्द तिच्या कानात उकळते तेल कानात भासून सतत तेच ते शब्द घुमत होते.

रस्त्याने ती एखाद्या यंत्रावत चालली होती. कुठे जातोय याच तिला भान नव्हतं. जणू प्राण नव्हतंच तिच्या अंगात. समोर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या हाॅर्न वाजवून तिला बाजूला होण्याचा इशारा करत होत्या ; पण ती मात्र आपल्याच तंद्रीत होती. शेवटी गाडीतलेच वैतागून गाडीच्या खिडकीतून डोकावून तिला चार शिव्या हासडून गाडी वळवून जात होते. पण तिला मात्र काहीच फरक पडला नव्हता. ती फक्त चालत राहिली.वाट मिळेल त्या रस्त्याने.

दूरवर मंदिरातील घंटा नाद झाला. हळूहळू तो नाद वाढू लागला तशी तिची पावले आपोआपच त्या आवाजाच्या दिशेने वळली. मंदिर जसं जसे जवळ येऊ लागले तसतसे तिचा उर भरून येऊ लागला. सुकलेले ओठ थरथरू लागले आणि डोळे आसवांनी काठोकाठ भरून आले. आभाळ दाटून आल्यावर कधीही पाऊस कोसळेल अशी अवस्था तिच्या डोळ्यांतील आसवाची होतं.

मंदिरातील भव्य दुर्गामातेची मूर्ती समोर तिने नतमस्तक होऊन आपल्या आसवांना वाट मोकळी करुन दिली.

थोडा वेळ रडल्यानंतर ती शांत झाली. तिथेच एका खांबाला पाठ टेकवून बसली. अजूनही कंठ दाटून येत होता.

तिच्या डोळ्यांसमोर सकाळचा प्रसंग तरळला.

"हे माॅम, ही बघ तुझी होणारी सून. मी बोललो होतो ना तुला हिच्याबददल. हीच ती ज्युली. माझं हिच्यावर प्रेम आहे आणि मला हिच्याशीच लग्न करायचे आहे. थोडे पैसे दे, हिच्यासाठी मला गिफ्ट घ्यायचे आहे." अबोलीचा मुलगा रवी ज्युलीच्या खांद्यावर हात ठेवत जवळ ओढून घेत हसत म्हणाला.

तिच्याकडे पाहून अबोलीच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिचा चेहरा पाहून ती कशी आहे हे तिला चांगलच समजलं होतं. त्याने आधी सांगितल्यावर तिने तिच्याबद्दल चौकशी करून माहिती मिळवली होती तेव्हा ती कळलं होतं की ती काय करते. आता तिला प्रत्यक्षात पाहिल्यावर ऐकलेल्या गोष्टीवर तिची खात्री पक्की झाली.

ज्युलीने बटबटीत मेकअप केला होता, तिने इतके तोडके कपडे घातले होते की ज्यातून तिचे बरंच अंगप्रदर्शन होत होते. ती तोंडात चिंगळ चघळत कुत्सितपणे हसत त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली,"ओ डार्लिंग, चल ना पटकन, शाॅपिंगला उशीर होतोय. तू एवढा मोठा झालास तरी तुझ्या आईसमोर हात पसरतोस हे मला पटलं नाही."

"अगं, तसं काही नाही, ज्युली. थांब मी लगेच घेऊन येतो पैसे." तो तिला म्हणाला.

"माॅम, चल दे लवकर पैसे. आम्हाला उशीर होतोय." तो अबोलीवर आवाज चढवत म्हणाला.

"तुला पैसे मिळणार नाहीत. त्यात हिच्यावर उधळायला तर मी देणारच नाही. ही कशी आहे तुला नाही माहित. तू हिचा नाद सोड. अरे ही चांगली नाहीये. हिने तुझ्यासारख्या कित्येक श्रीमंत मुलांना नादी लावून त्यांना लुबाडले आहे." अबोली पोटतिडकीने त्याला समजावत म्हणाली.

"ए रवी, असा अपमान करण्यासाठी मला इथे घेऊन आला आहेस का तू? रहा तू तुझ्या आईच्या पदराला चिटकून. चालले मी." अबोलीने केलेला अपमान सहन न झाल्याने ज्युली रागात मोठ्या फणकाऱ्याने म्हणाली आणि जाऊ लागली.

"थांब, ज्युली. तू कोठेही जाणार नाहीस." जाणाऱ्या तिचा हात धरत रवी तिला थांबवत म्हणाला.

"माॅम, माफी माग ज्युलीची. तू तिचा अपमान केलास. आणि हो पटकन पैसे दे. नाही तर.." रवी गुरगुरत डोळे मोठे करून तिच्यावर धावून जात अबोलीला म्हणाला.

"मी का माफी मागू हिची? खरं आहे तेच बोलले मी. या बाजारबसवीसाठी तर एक छदाम देणार नाही मी. तुझ्या डॅडनी मोठ्या विश्वासाने हे वैभव माझ्या हाती सोपवले आहे. ते असेच नाही मी तुला उधळू देणार. सध्या तर हिला बाहेर काढ तू. ही असली घाण माझ्या घरात चालणार नाही." अबोलीही जळजळीत कटाक्ष ज्युलीवर टाकत चिडत रवीला म्हणाली.

"खूप झालं, रवी! तुझ्या माॅमने खूप इन्सल्ट केला माझा. आता एक क्षणही मी इथे थांबणार नाही आणि हो इथून पुढे तू माझ्याकडे न आलेलच बरं. गुड बाय." असे तणतणत म्हणत ज्युली खांद्यावर अडकलेली पर्स सावरत रागाने निघून गेली.

रवीने रागारागाने आधी अबोलीकडे पाहिले व नंतर ज्युलीला अडवण्यासाठी तिच्या मागे गेला. बऱ्याच विनवण्या केल्यानंतरही ती थांबली नाही.

ती निघून गेल्यावर तो तावातावाने आत येऊन अबोलीवर धावून येत म्हणाला,"झालं तुझं समाधान. शेवटी तू तुझा सावत्रपणा दाखवून दिलंस. लोक बरोबर बोलतात सावत्र आई खरी आई कधीच होऊ शकत नाही. दे ते तिजोरीच्या चाव्या. माझं मी घेतो पैसे. इतके दिवस तुझे ऐकले तेच खूप झाले. माझं आयुष्य आहे, हे घर माझं ही आहे. इथे कोण राहील, कोण नाही हे माझं मी ठरवेन. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तुझे नाक खुपसणे मी खपवून घेणार नाही. माझं मी पाहून घेईन. आणि हो तुलाही या घरात जागा नाही. तू माझ्या नजरेसमोर ही नकोस आता."

त्याने तिच्याकडून चाव्याचा जुडगा हिसकावून घेतला आणि तिजोरीतले पैसे घेण्यासाठी तो निघून गेला.

त्याच्या इतक्या जहाल बोलण्याने अबोलीच्या काळजाला घरे पडले. ती जागीच कोलमडून पडली. डोळ्यांतून झरझर पाणी वाहू लागले.

तो परत आला तरी ती तिथेच होती हे पाहून त्याचा पारा आणखीनच चढला. त्याने तिच्या दंडाला धरून फरफटत घराबाहेर आणत तिला ढकलून दिले. तिचा कंठच फुटत नव्हता. फक्त एकटक त्याच्याकडे पाहत होती.

त्याने घराला कुलूप लावले आणि तिरस्काराने तिच्याकडे पाहत निघून गेला.

आता वर्तमान -

अबोली मंदिरात खांबाला डोकं टेकवून बसली होती. संध्याकाळी झाली तरी ती तिथेच बसून राहिली.

इकडे रवी मोठ्या आनंदाने पैसे घेऊन ज्युलीकडे आला. तो दारावर टक टक करणार तोच तिच्या रूममधून हसण्या -खिदळण्याचा आवाज आला.

त्याने रागात दरवाज्याला लाथ मारून दार उघडले. तर ज्युली नको त्या अवस्थेत एका तरूणाच्या मिठीत होती. हे पाहून रवीचे हृदय तुटले. त्याला खूप राग आला.

"छी! इतकी नीच असशील असे मला वाटले नव्हते. माझी माॅम खरे बोलत होती. पण मीच मुर्ख होतो, तुझ्या प्रेमात इतका आंधळा झालो होतो की त्या बिचारीचे बोलणे ऐकले नाही." रवी तिच्या कानशिलात लगावत क्रोधाने लाल होत म्हणाला.

"कळलं ना तुला आता, चल फुट इथून. तुझ्यासारख्या आईच्या पदराला धरून चालणाऱ्याची मलाही गरज नाही." ज्युली गाल चोळत तिरमिरीत म्हणाली आणि तिने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

तो तेथून बाहेर पडला आणि घरी आला. पण त्याचे मन आता पश्चात्तापाच्या आगीत होरपळत होते. राहून राहून त्याला अबोलीबरोबरचे वागणे, बोलणे आठवत होते. त्या सरशी त्याला स्वतःच्याच कृत्याची लाज वाटू लागली. तो स्वतःचाच चेहरा ओंजळीत घेऊन ओक्साबोक्शी रडू लागला.

त्याला लहानपणापासूनचे अबोलीने त्याच्यासाठी जे केले ते आठवू लागले. तसे पुन्हा तिच्या आठवणीने तो व्याकूळ झाला. त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिचं अस्तित्व त्याला जाणवत होतं. ती नाही तर ते घर त्याला खायला उठलं होतं.

"नाही रवी, असं बसून चालणार नाही. तुला माॅमला शोधलं पाहिजे. भेटली की तिची पाय धरून माफी मागेन." तो डोळे पुसत बाईक व मोबाईल घेऊन तिला शोधायला निघाला. एव्हाना अंधार पडू लागला होता.

खूप शोधाशोध केल्यावरही त्याला ती कुठेच भेटली नाही. तो निराश झाला. हताश होऊन तो त्याचं मंदिरात आला जिथे ती थोड्या वेळापूर्वी आली होती.

दुर्गामातेच्या मूर्तीसमोर गुडघे टेकवून खाली मान घालून होत जोडत कापऱ्या स्वरात तो म्हणाला,"माझ्याकडून खूप मोठी झाली, माता. यशोदा समान आईचा मी अपमान केला. तोंडाला येईल ते बोललो. ती मला ज्युलीचा आरसा दाखवत होती तर तिलाच मी चुकीचे ठरवले. एवढंच नाही तर तिला फरफटत घराबाहेर काढले. किती मोठे पाप घडले माझ्याकडून. माता, ती कुठे असेल तर माझी तिची भेट घडवून दे. तिचे पाय धरून माफी मागायची आहे मला. कृपा कर माता, कृपा करं."

मातेच्या चरणावर डोकं टेकवून तो रडत विनवणी करत होता.

त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. त्या ओळखीच्या मायेच्या स्पर्शाने त्याच्या चेहऱ्यावर हसू तरळले. तो पटकन मागे फिरून तिच्या कमरेला विळखा घालून माफी मागत ओक्साबोक्शी रडू लागला.

"मी चुकलो आई, मला माफ कर. तू खरी आई आहे माझी. तुला सावत्र म्हणालो, किती बोललो, वाईट वागलो. अपमान केला. तू वाट्टेल ती शिक्षा दे, मी भोगायला तयार आहे." तो रडत आर्जव करत म्हणाला.

"तुझी चूक तुला कळली यातच सर्व आलं, रवी. लवकर तुला खरं कळलं हे चांगलंच झालं. आणि राजा, आई ही आईच असते रे, जरी ती सावत्र असली तरी ती आईच असते. मुलं चुकतं असेल तर त्याला योग्य मार्गावर आणणे तिचे कर्तव्य आहे रे. ते जाऊ दे. तू घरी जा. खूप उशीर झालाय." ती मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याचे डोळे पुसत म्हणाली.

"हो उशीर तर खूप झालाय, आई. ते घर तुझंही आहे, आई. आपण दोघे मिळून जाऊ, चल." तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला.

तिने जाण्यास नकार दिला. तेव्हा त्याने तिच्या पायांवर डोके टेकवले. अश्रूंनी तिचे पाय भिजून गेले. त्याच्या डोळ्यांत व चेहऱ्यावर पश्चात्तापाचे भाव होते.

तिलाही गलबलून आलं. तिने त्याला छातीशी कवटाळून घेतले. दोघेही मनसोक्त रडले. शांत झाल्यावर दोघेही पुन्हा आपल्या घरट्याकडे निघाले.

त्या माय-लेकराच्या मिलापाने मंदिरातील दुर्गामातेची मूर्ती हसरी दिसत होती.

समाप्त -

आई आईच असते. भलेही ती सावत्र असली तरी यशोदा बनून आपल्या लेकराची काळजी घेते. चांगले -वाईट समजून सांगते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती मुलाची चूक मोठ्या मनाने माफ करते.

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0