Login

चिऊताईचे संवर्धन

चिऊताई आणि तिचे संवर्धन
चिऊताईचे संवर्धन

सकाळची चाहूल लागते, ती पक्षांच्या किलबिलाटांनी. अगदी त्यांचे सजीवांमध्ये अस्तित्त्व आहे, हेच जणू सांगण्याचा त्यांचा खटाटोप चालू असतो, असेच काहीसे वाटते. संध्याकाळी परत त्यांच्या घरट्यात जाताना एका रेषेत कधी कधी तर बाणाच्या आकाराचे थवे उडताना पाहताना आपल्याला पण उडता आले असते, तर बरे झाले असते असेच मनात येते.

चिमणी म्हणजेच जिला सर्व चिऊताई म्हणतात. चिव चिव करत सगळीकडे उडत फिरत असते. लहानपणी तीची कविता वाचताना पुन्हा पुन्हा तिला पाहावेसे वाटायचे. अगदी चित्रकलेत पक्षांचे चित्र काढायचे म्हंटले तरी सगळ्यात आधी डोळ्यांसमोर यायची ती हीच चिमणीताई.

हळू हळू वर्षे सरत गेली. जास्त संख्येने दिसणाऱ्या चिमण्या कमी कमी होऊ लागल्या. आधुनिरणामुळे, प्रदूषणामुळे तसेच बेसुमार वृक्षतोडीमुळे तिला घरट्यांची बांधणी करण्यास अडथळा येवू लागला. पर्यायाने ती आता दिसेनाशी झाली आहे.

पक्षी हे फक्त सजीव नाहीत तर ते निसर्गाची देण आहेत. त्यांनी खाल्लेल्या फळांमुळे, त्यांच्या विष्ठेतून जमिनीवर पडणाऱ्या फळांच्या बियांमधून झाडांच्या लागवडीस ते अप्रत्यक्षरीत्या मदत करतात. त्यामुळे पाने,फुले ,फळे, सावली तर मिळतेच पण मानवाला लागणारा ऑक्सिजनही मिळतो.

दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात ती नामशेष होणार नाही ह्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात अनेक चिमण्या पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे मृत्यमुखी पडताना दिसतात. त्यामुळे शक्य असल्यास प्रत्येकाने त्यांच्या घराजवळ किंवा बाल्कनीत थोडे धान्यांचे दाणे आणि वाटीत पाणी ठेवले तर त्यांचा तो ही प्रश्न सुटेल.

शक्य होईल तिथे झाडे लावली आणि वृक्षतोड थांबवली तर त्यांचे हक्काचे घर सुरक्षित राहील. जसा प्रत्येक सजीवाला ह्या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे, तसाच ह्या आकाराने लहान असल्या तरी चिमण्यांनासुद्धा तेवढाच अधिकार आहे. तो अधिकार त्यांचा कुठेतरी हिरावल्याचे दुःख फक्त व्यक्त न करता कृतीने सर्वांनी त्यांना मिळवून देण्याचे कार्य केले तर त्यांची ओळख अबाधित राहील. फक्त 'जागतिक चिमणी दिवस' जो २० मार्च रोजी साजरा केला जातो त्या एका दिवसाठीच त्याचा विचार नको करायला. नाहीतर फक्त पुस्तकात किंवा पक्षी अभयारण्यातच त्या पाहायला मिळतील.

त्यांचे संवर्धन करण्यासाठी आधी पोषक वातावरण निर्माण करण्याची जास्त गरज आहे. मांजाच्या धाग्यात अडकल्यामुळे तसेच अनेक उघड्या असलेल्या विद्युत वायरीमुळे चिमण्यांना त्यांचा जीव गमवायला लागतो. तर अशा गोष्टींवर निर्बंध घालणे अति आवश्यक आहे.

विविध व्याख्यान, पथनाट्य, चित्रकला किंवा साहित्य स्पर्धा आयोजित करून त्यांची जनजागृती केल्यास जास्तीत जास्त लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देता येईल.

© विद्या कुंभार

सदर लेखाचे हक्क हे लेखिकेकडे आहेत ह्याची नोंद घ्यावी.