सावित्रीची लेक भाग १०
मागील भागाचा सारांश: रखमाने बनवलेले वांग्याचे भरीत खाऊन पुनमला तिच्या आजीची आठवण येते. आपल्याला मूल होऊ शकत नसल्याचे पुनम रखमा व सुमनला सांगते, तसेच ती मूल दत्तक घेणार असल्याचे सांगते. प्रगतीच्या संगोपनावरुन रखमा व पुनम मध्ये चर्चा होते.
आता बघूया पुढे….
रखमाने अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे तिला काय उत्तर द्यावे? हे पुनमला सुचत नव्हते. थोडावेळ ती काहीच बोलली नाही, मग ती म्हणाली,
"काकू, मी प्रगतीला दत्तक घेते. प्रगती शेवटपर्यंत तुमची नातंच राहील, तुम्ही केव्हाही तिला येऊन भेटू शकता. प्रगती सुट्टीत काही दिवसांसाठी तुमच्या घरी येऊन राहिली तरी चालेल. काकू माझ्या पेक्षा जास्त तुमचा अधिकार तिच्यावर राहील."
पुनमने दिलेल्या अनपेक्षित उत्तरावर रखमा काहीच बोलली नाही. रामभाऊ दारात उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत होता.
"तुम्ही यासाठीच आमच्या घरी आला होतात का?" रामभाऊने विचारले.
पुनम रामभाऊ कडे बघून म्हणाली,
"हो काका. मी खोटं नाही बोलणार. ज्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये प्रगती बद्दल सांगितलंत, तेव्हा जन्माला आल्याबरोबरचा तिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. मला एखाद्या बाळाला दत्तक घ्यायचंच होतं, तर त्यावेळी माझ्या डोक्यात एक विचार येऊन गेला की, आपण जर प्रगतीलाच दत्तक घेतलं तर……
माझा हा विचार मी माझ्या नवऱ्याकडे बोलून दाखवला, त्यावेळी तो मला म्हणाला की, पहिले तिच्या आजी आजोबांचं मत काय आहे? हे बघ आणि त्यानंतरचं अंतिम निर्णय घे. काका काकू तुम्ही नकार दिला तरी माझं काहीच म्हणणं नसेल, पण एकदा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा."
रखमा म्हणाली,
"तरी मी विचार करत होते की, या एवढ्या मोठ्या डॉक्टर मॅडम आपल्या सारख्या गरीबाच्या घरी जेवण करायला तयार कशा झाल्या? ताई मी तुम्हाला साध्या सरळ स्वभावाचे समजले होते. तुमच्या मनात तर वेगळाच हेतू दडला होता.
ताई ज्या मुलांना आई वडील किंवा कोणीच नातेवाईक नसतात, अश्या मुलांना अनाथ म्हणतात आणि त्याच मुलांना दत्तक दिलं जातं. प्रगतीला तिचे आजी आजोबा आहेत, तेव्हा ती अनाथ नाहीये. आम्ही आमच्या परीने प्रगती साठी भरपूर काही करत आहोत. आम्ही अचानक या जगातून गेलो तरी सदा भाऊजी आणि सुमन आमच्या प्रगतीला अंतर देणार नाहीत."
पुनम म्हणाली,
काकू प्लिज तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तुम्ही प्रगतीला मला दत्तक द्याल किंवा नाही देणार, हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी करत नाहीये. काकू तुम्ही प्रगतीला मला दत्तक द्यावं, म्हणून मी तुमच्या घरी जेवण केलं नाहीये. प्लिज त्याबद्दल मनात शंका बाळगू नका."
रामभाऊ म्हणाला,
"ताई आम्ही दोघे जिवंत असताना प्रगतीला तुम्हाला दत्तक का द्यावे? यावर तुमचं मत स्पष्टपणे मांडा. कदाचित त्यामुळे आम्हाला तुमच्या बोलण्यामागील अर्थ कळायला मदत होईल."
पुनम म्हणाली,
"काका मी तुम्हाला काही प्रश्न विचारते,त्याची उत्तरे तुम्ही द्या, त्या उत्तरांमध्येच तुमच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले असेल."
रामभाऊ म्हणाला,
"ठीक आहे. मग प्रश्न विचारा."
पुनम - तुम्हाला प्रगतीची काळजी वाटते का?
रामभाऊ- हो.
पुनम - का?
रामभाऊ- प्रगतीची पूर्णपणे जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही दोघे जर या जगातून गेलो, तर तिचं कसं होईल? म्हणून काळजी लागलेली असते.
पुनम- तुम्ही दोघेही या जगातून लवकर निघून जाल, असं तुम्हाला का वाटतं?
रामभाऊ- कारण आमचं वय होत चाललं आहे. कधी काय होईल? याचा भरवसा वाटत नाही.
पुनम- प्रगतीच्या भविष्याच्या बाबत तुम्ही काही विचार केला आहे का? म्हणजे तिचं शिक्षण वगैरे.
रामभाऊ- हो.
पुनम- काय?
रामभाऊ - आम्हाला तिला खूप शिकवण्याची इच्छा आहे. आम्ही मुलींच्या बाबतीत जी चूक केली, ती चूक तिच्या बाबतीत करणार नाहीये.
पुनम- कोणती चूक?
रामभाऊ- आम्ही मुलींना शिकवलं नसल्याने त्या त्यांच्या पायावर उभ्या राहू शकल्या नाही. आमच्या मुलींवर त्यांच्या सासरी जो अन्याय होतो, तो त्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. माझ्या मुली अन्यायाविरुद्ध लढू शकत नाहीयेत आणि त्यांना त्यासाठी जे शिक्षणाचं बळ आवश्यक होतं, ते मी देऊ शकलो नाही.
पुनम- प्रगतीच्या शिक्षणासाठी काही तरतूद करुन ठेवली आहे का?
रामभाऊ- अजून तरी नाही.
पुनम- प्रगतीला शाळेत कुठे प्रवेश घेणार आहात?
रामभाऊ- तिला इंग्रजी माध्यमात घालण्याचा विचार आहे, पण ती शाळा तालुक्याच्या ठिकाणी आहे.
पुनम- तालुका किती लांब आहे?
रामभाऊ- २० किलोमीटर अंतरावर आहे.
पुनम- तुमचं किती शिक्षण झालंय?
रामभाऊ- चौथी
पुनम - तुम्हाला इंग्लिश येतं का?
रामभाऊ - नाही
पुनम म्हणाली,
"काका तुम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारे मी काही मुद्दे सांगते.
तुम्हाला प्रगतीला शिकवायचं आहे, तिला इंग्रजी माध्यमात घालायचं आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा इथून २० किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही प्रगतीच्या शिक्षणासाठी अजून काही तरतूद केलेली नाही.
काका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची फी अमाप असते. तुम्ही प्रगतीसाठी फीची इकडून तिकडून जुळवाजुळव पण कराल. प्रगतीला इतक्या लांब शाळेतही टाकाल. पण काका जर तुम्हाला इंग्लिश येतच नसेल, प्रगती शाळेत काय शिकते? हे तुम्हाला कळणार नाही, शिवाय प्रगती लहान असताना तिच्याकडून अभ्यास करुन घेण्याची पूर्ण जबाबदारी तुमच्या दोघांवर असेल. हा झाला पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा, तुम्हाला प्रगतीची काळजी वाटते कारण, तुम्ही गेल्यावर तिचं काय होईल? हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. तुमचं वय झालं आहे, हेही तुम्ही मान्य केलंय.
काका तुम्ही जर प्रगतीला मला दत्तक दिलं, तर तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज राहणार नाही. मी सगळं काही ऍडजस्ट करुन घेईल. प्रगती स्वतःच्या पायावर उभी राहण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल. तुम्हाला जसं प्रगतीला वाढवायचं आहे, तसंच मीही वाढवेल.
काका, काकू तुम्हाला प्रगती सोबत येऊन रहाण्याची इच्छा झाली,तरी बिनधास्त माझ्या घरी येऊन राहू शकता."
रामभाऊ म्हणाला,
"ताई तुम्ही जे काही मुद्दे मला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे, ते पूर्णपणे मला पटले आहेत. तुमच्या बोलण्याचा हेतू मला समजला. पण ताई प्रगतीला आम्ही कोणाला दत्तक देऊ, असा विचारच आम्ही कधी केला नाही, त्यामुळे आम्ही लगेच काही निर्णय देऊ शकणार नाही.
मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की, तुम्ही दत्तक घेण्यासाठी प्रगतीचीच का निवड केली? अनाथ आश्रमात अनेक मुले असतात, त्यांच्यापैकी कोणाचीही निवड तुम्हाला करता आली असती."
पुनम म्हणाली,
"काका तुम्ही एक माणूस म्हणून खूप चांगले आहात. तुम्ही प्रगतीवर चांगलेच संस्कार केले असतील. शिवाय काहीजण मुलं दत्तक दिल्यावर सतत पैश्यांची मागणी करत बसतात. तुम्ही कधीच असं काही करणार नाही. तुमचा प्रामाणिकपणा लगेच दिसून येतो."
रामभाऊ म्हणाली,
"ताई मी जरा विचार करुन, रखमाच्या ममतेचा विचार करुन तुम्हाला आमचा निर्णय कळवतो."
पुनम म्हणाली,
"चालेल काका. तुम्ही हवा तितका वेळ घ्या. तुमच्या दोघांच्या मनात काही शंका असेल, तर बिनधास्त फोन करुन किंवा प्रत्यक्ष भेटून मला विचारु शकतात. काका नाहीतर काकूंना व प्रगतीला घेऊन तुम्ही एकदा आमच्या घरी या. माझ्या घरच्यांना एकदा भेटा, म्हणजे तुम्हाला निर्णय घेणे सोपं जाईल."
रामभाऊ म्हणाला,
"ताई ते सगळं बघू. आम्हाला थोडा वेळ द्या."
पुनम म्हणाली,
"काका, काकू मी आता निघते."
एवढं बोलून पुनम घराबाहेर पडत असताना प्रगती व तिची भेट झाली. पुनमने प्रगतीला खाऊ घ्यायला पैसे देऊ केले, तर प्रगतीने रामभाऊ कडे बघितले. रामभाऊने मान हलवून होकार दिल्यावरचं प्रगतीने पुनमच्या हातातून पैसे दिले. पुनम गाडीत बसून निघून गेली.
रामभाऊ व रखमा प्रगतीला दत्तक देण्यास तयार होतील का? बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा