सावल्यांच्या कुशीत. भाग - ३३
नीरव आणि आरव हळूहळू आवाज न करता पावलं टाकत वाड्याच्या मागे आले आणि त्या खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले. तोच नीरवने दाराला कान लावला आणि आतून कसला आवाज येतोय का याचा कानोसा घेऊ लागला. तोच आरवने त्याला हळू आवाजात विचारलं.
"दादा, आतून कसला आवाज येतोय की नाही?" आरवने विचारताच नीरव मागे झाला आणि त्याच्याशी बोलू लागला.
"आत बहुतेक कोणीच नाहीये, आणि असलं तरी झोपले असावं. कारण आजिबात आवाज नाही येत." नीरव.
"आवाज येत नाही तर मग जायचं का आपण दार उघडून आत!" आरवने विचारलं.
"हो चल पण मोबाईलची टाॅर्च असूदे, म्हणजे आपल्याला काही असेल तर ते दिसेलही आणि अजून एक आत गेल्यावर सगळीकडे बारीक लक्ष असूदे." नीरव म्हणाला तसं आरवने मोबाईलची टाॅर्च लावली मग नीरवने हळूच दाराचं कुलूप उघडलं आणि दोघेही दार उघडून आत गेले आणि सावधगिरीने आजूबाजूला बघू लागले.
आत पुढच्या बाजूला कोणीच दिसत नव्हते म्हणून ते दोघेही मागच्या खोलीत गेले आणि तिथे सगळीकडे टाॅर्च लावून पाहिलं तर त्यांना एका कोपऱ्यात कोणीतरी झोपलेलं दिसलं. ते बघून ते हळूहळू जे कोणी झोपलेलं होतं तिथे जाऊ लागले.
"दादा, कोण असेल इथे?" आरवने हळूच कानात विचारलं. तसं नीरवने त्याच्या तोंडावर बोट ठेऊन त्याला शांत रहा म्हणून सांगितले आणि नीरव हळूच पुढे झाला आणि झोपलेल्या व्यक्तीचा चेहरा बघू लागला. तो चेहरा बघून नीरवला खूप मोठा धक्का बसला. तो लगेच मागे झाला आणि आरवकडे बघू लागला.
"आरव, या अन्वीच्या आई आहेत... या इथे कशा काय? यांना कोणी इथे डांबून ठेवले असेल का?" नीरव.
"काहीही काय दादा, त्या कशा इथे असतील? दुसरेच कोणीतरी असेल!" आरव.
"तुला खोटं वाटतंय ना माझं मग तू स्वतःच बघ. म्हणजे तुला समजेल!" नीरव म्हणाला तसं आरव लगेच पुढे आला आणि त्याने पाहिलं तर ती खरोखरच अन्वीची आई होती. तिला बघून त्यालाही धक्का बसला.
"दादा, या खरंच अन्वीच्या आई आहे. आता काय करायचं?" आरव.
"आता आपण त्यांना आपल्यासोबत घरी जाऊ, मग या इथे कशा आल्या ते त्यांनाच विचारू!" नीरव म्हणाला आणि त्याने अन्वीच्या आईला उठवलं.
"मामी, उठा..." नीरवने सुगंधाला हळूच हाताने हलवत उठवलं. तो पहिल्यापासूनच तिला मामी म्हणायचा. नीरवच्या आवाजाने सुगंधा लगेच दचकून उठली आणि घाबरून अंग आकसून घेतले.
"मला सोडा इथून, मी कोणालाच काही सांगणार नाही. हवं तर मी इथून लांब निघून जाईल पण मला सोडा." सुगंधा घाबरून बोलत होती ते या दोघांनी ऐकलं आणि त्यांना अजूनच धक्का बसला. नीरवने लगेच हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवला.
"मामी, मी तुम्हाला सोडवायलाच आलो आहे. हे बघा माझ्याकडे बघा, मी नीरव आहे." नीरव म्हणाला तसं सुगंधाने त्याच्याकडे पाहिलं त्या मोबाईलच्या टाॅर्च मध्ये त्याचा चेहरा चमकला आणि तिची भिती गायब झाली.
"नीरव, किती वेळा मी तुला भेटायचा प्रयत्न केला पण मला तुझ्यापर्यंत पोहचता आले नाही. मला तुला काहीतरी सांगायचं आहे नीरव." सुगंधा रडत रडत बोलू लागली.
"मी आलो होतो तुमच्या घरी पण तुम्ही घरी नव्हत्या." नीरव.
"तू माझ्याकडे येणार हे तुझ्या बाबांना कळलं होतं म्हणून तर त्यांनी मला जबरदस्तीने इथे डांबून ठेवलं आहे." सुगंधाने सांगितले तेव्हा नीरव तिच्याकडे गोंधळून बघू लागला. त्याच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या. सुगंधाला इथे त्याच्या बाबांनीच डांबून ठेवले होते हे तर त्याला समजलेच होते पण ते का आणि कशासाठी हेच त्याला कळत नव्हते. पण आता खूप रात्र झाली होती त्यामुळे त्याने सुगंधाला काही प्रश्न विचारायचे टाळलं.
"मामी, आपण यावर सकाळी बोलू, आता तुम्ही माझ्यासोबत आमच्या घरी चला. इथे नका थांबू." नीरव.
"नाही, मी तुमच्या घरी आले तर तुझे बाबा मला जगू नाही देणार." सुगंधा घाबरून बोलली.
"असं काही नाही होणार, मी आहे ना... मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही तुम्ही चला." नीरव म्हणाला. सुगंधा नाही नाही म्हणत असताना सुद्धा नीरव तिला जबरदस्तीने तिथून बाहेर घेऊन आला आणि आरवला त्याने दाराचं कुलूप लावायला सांगितलं. मग ते दोघेही तिला घरी घेऊन गेले.
घरी आल्यावर आरव त्याच्या खोलीत गेला तर नीरव सुगंधाला घेऊन त्यांच्या खोलीत आला, तो खोलीत आला तेव्हा वेदिका जागीच होती आणि त्याची वाट पहात होती. तो सुगंधाला घेऊन आल्या आल्या वेदिका लगेच उठून त्याच्याकडे गेली. ती काही बोलायच्या आतच नीरवने बोलायला सुरुवात केली.
"वेदिका, या अन्वीच्या आई आहेत. आजची रात्र त्यांना इथेच आपल्या खोलीत असूदे." नीरव.
"हो पण या आता यावेळी तुम्हाला कुठे भेटल्या?" वेदिकाने तिला ओळखलं आणि विचारलं.
"आता ते मी तुला सकाळी सांगतो. आता फक्त त्यांना इथे राहूदे, त्या इथे आपल्या खोलीत झोपल्या तर तुला काही प्राॅब्लेम नाही ना!" नीरव.
"नाही, मला कशाला प्राॅब्लेम असेल. मावशी... या बसा तुम्ही आणि तुम्ही काही खाल्लं आहे का? नसेल खाल्लं तर मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते." वेदिका म्हणाली.
"हो गं बाळा, खरंच खूप भूक लागली होती मला सकाळी थोडंसं खायला भेटलं होतं, त्यानंतर काहीच नाही खाल्लं." सुगंधा.
"बरं बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी खायला आणते." वेदिका म्हणाली तोच नीरवने तिला अडवलं.
"वेदिका, त्यांच्यासाठी खायला मी आणतो, तू त्यांना तुझी एखादी साडी दे आणि जमलं तर त्यांना अंघोळीला पण दे, म्हणजे त्यांना बरं वाटेल." नीरव म्हणाला तसं वेदिका हो म्हणाली आणि तिने सुगंधाला गरम पाणी काढून अंघोळीला दिलं आणि तिची साडी नेसायला दिली. तोपर्यंत नीरव सुगंधाला खायला घेऊन आला. सुगंधाच्या पोटात अन्न गेल्यावर तिला बरं वाटलं, आता तिचा चेहरा पण जरा फ्रेश दिसू लागला.
"तुम्ही दोघी झोपा, मी बाहेर हाॅलमध्ये झोपतो." नीरव म्हणाला आणि बाहेर गेला. तो बाहेर हाॅलमध्ये आला त्याचवेळी सुधाकर पण तिथे आले. त्यांना बघून नीरव पटकन एका कोपऱ्यात उभा राहिला आणि ते काय करताय हे बघू लागला. तर ते काहीतरी विचित्रच वागत होते. त्यांचं ते वागणं बघून नीरवला जबरदस्त धक्का बसला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा