सावल्यांच्या कुशीत. भाग - ३४
"सोड मला, मला नको ना मारू माझी चुक झाली मला माफ कर!" सुधाकर हात जोडून भिंतीकडे बघत बोलत होते. नीरव परत परत तिथे कोणी दिसतंय का ते बघत असतो पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही. सुधाकर स्वतःचं डोकं जोरजोरात भिंतीवर आपटत होते. ते आपटून झालं की स्वतःच मागच्या भिंतीवर आपटताना त्याला दिसत होते.
सुधाकर रडतही होते आणि मध्येच हात जोडून समोर बघत होते. तोंडात फक्त एकच वाक्य होतं, मला माफ कर. ते बघून नीरवला धक्काच बसला. ते असं का वागताय याचा त्याला काहीच अर्थ लागेना.
थोडा वेळ तो तिथूनच त्यांच्याकडे बघत होता पण नीरवला आता त्यांची अवस्था बघवेना, तो पुढे गेला आणि सुधाकरांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला.
"बाबा, थांबा! काय करताय तुम्ही हे? काही झालंय का?" काही असेल तर सांगा मला पण असं भिंतीवर डोकं आपटून नका घेऊ, त्याने तुम्हालाच त्रास होईल." नीरव म्हणाला पण सुधाकर काहीच ऐकत नव्हते. ते विचित्र काही तरी बोलत होते...
"तू पुन्हा का आलीस? का मला शांत जगू देत नाहीस! सोड मला! मी म्हातारा झालोय आता, जरा तरी दया कर माझ्यावर!" सुधाकर रडवेल्या सुरात बोलत होते. आता नीरवने परत मागे वळून पाहिले, तर या वेळी त्याला एक छाया दिसली... अगदी अस्पष्ट, पण नक्कीच तिथे काहीतरी होतं. एका स्त्रीचा चेहरा, केस अस्ताव्यस्त, डोळे लालसर... आणि चेहऱ्यावर केवळ एकच भाव होते ते म्हणजे सूड!
ते बघून नीरव घाबरून मागे सरकला. आणि त्या क्षणी, एक थंड वाऱ्याची झुळूक खोलीभर पसरली. खोलीतील लाईट एक क्षणासाठी फडफडली... आणि बंद झाली. सगळीकडे अंधार पसरला.
आता नीरवला फक्त सुधाकरचा ओरडण्याचा आवाज येत होता. "मला माफ कर." नीरवला तर काहीच कळत नव्हते. तो सुधाकरशी बोलत असतो पण ते जणू काही वेगळ्याच जगात होते. त्याचं बोलणं त्यांना ऐकूच जात नव्हते.
थोड्या वेळाने परत लाईट आली आणि नीरव समोर बघू लागला... सुधाकर जमिनीवर कोसळलेले होते आणि त्यांच्या कपाळातून रक्त येत होतं.
पण... सर्वात भयानक गोष्ट म्हणजे, भिंतीवर लाल अक्षरात लिहिलेलं असतं.... "मी माझ्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही." ते लाल अक्षर अगदी रक्तासारखंच दिसत होतं.
ते वाक्य वाचून नीरव घाबरून मागे सरकला. त्याला ते बघून गरगरायला लागले पण तरीही स्वतःला सावरून तो पटकन सुधाकरकडे गेला आणि त्यांना हलवून बघू लागला. पण सुधाकर शुद्धीत नव्हते. मग त्याने त्यांना आवाज दिला.
"बाबा, उठा... काय होतंय तुम्हाला? डोळे उघडा बाबा." नीरवने आवाज देऊनही सुधाकर उठले नाही. ते बघून नीरव सगळीकडे नजर फिरवून बघू लागला.
"को....ण...? कोण आहे इथे?" नीरव ओरडला, पण आता फक्त खोल शांतता होती. भिंतीवरचं ते रक्ताने लिहिलेलं वाक्य, अजूनही ठळक दिसतं होतं....
"मी माझ्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही."
"मी माझ्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही."
नीरवने कसं बसं सुधाकरला उचललं आणि बेडवर ठेवलं. मग पटकन डाॅक्टरांना फोन केला. थोड्या वेळातच डाॅक्टर आले. त्यांनी दार वाजवताच नीरवने दार उघडले.
"काय झालं नीरव, एवढ्या रात्री बोलवलं... कोणाला बरं नाहीये?" डॉक्टरांनी दारातूनच विचारलं.
"ते बाबांच्या कपाळाला काहीतरी लागलं आहे, जखम झाली आहे आणि त्यातून रक्त येतंय आणि ते बेशुद्ध आहे." नीरव घाबरत म्हणाला तेव्हा डॉक्टर पण लगेच आत आले आणि सुधाकर जिथे होते. तिथे गेले आणि त्यांच्याकडे बघू लागले. त्यांना बघून डाॅक्टर अजूनच गोंधळून गेले आणि नीरवकडे बघू लागले.
"नीरव, यांच्या कपाळावर तर कसलीही जखम नाही दिसत आणि रक्त तर आजिबातच नाहीये, मग तू असं का बोलतोय?" डॉक्टर म्हणाले तेव्हा नीरव परत सुधाकरकडे बघू लागला तर आता त्यालाही जखम किंवा रक्त असं काहीच दिसत नव्हते. ते बघून त्याला तर खूपच मोठा धक्का बसला.
"डॉक्टर, पण हे कसं शक्य आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. बाबांच्या कपाळातून रक्त येत होते. आणि त्याच रक्ताने इथे या भिंतीवर नाव....." नीरव बोलता बोलता भिंतीकडे हात करतो आणि बघतो तर आता तिथे ते नावही नसतं. ते बघून नीरवला आता चक्कर यायची बाकी राहिली होती. तो परत सुधाकर जवळ गेला आणि त्यांच्या डोक्याला, कपाळाला हात लावून खात्री करून घेऊ लागला. पण त्याच्या हाताला पण आता काहीच रक्त वगैरे लागलं नाही आणि सुधाकरला सुद्धा कुठे जखम दिसली नाही. ते बघून नीरव खूपच शाॅक झाला.
नीरवच्या मनात गोंधळाच वादळ आता चांगलंच उसळलं होतं. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं पाहिलं होतं, सुधाकरच्या कपाळातून वाहणारं रक्त, आणि त्या रक्तात लिहिलेलं नाव! पण आता ना रक्त होतं, ना जखम, ना नाव! हे सगळं आठवून त्याने दोन्ही हातांनी डोकं गच्च धरलं आणि डाॅक्टरांकडे बघू लागला.
"डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे पाहिलं ते खरंच खरं होतं पण आता असं का होतंय काय माहीत. हे काहीतरी चुकीचं आहे... हे... हे खरं नाहीये!" नीरव गोंधळलेल्या नजरेने बघत म्हणाला.
"नीरव, शांत हो." डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. तसं तो शांतपणे त्यांच्याकडे बघू लागला.
"कधी कधी डोक्यावर आघात झाल्यावर किंवा काही मानसिक ताण असल्यावर अशा प्रकारचे भास होत असतात. तू जास्त टेंशन घेऊ नकोस. तुझे बाबा पूर्णपणे ठीक आहेत." डॉक्टरांनी त्याला समजून सांगितले पण नीरवचा मेंदू काही ते स्वीकारायला तयार नव्हता. तो थोडा मागे सरकला आणि परत एकदा खोलीभर नजर फिरवू लागला. त्याचं असं वागणं बघून डाॅक्टर त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. खरं तर आता ते ही घाबरलेच होते.
"नीरव, मी जातो...." डॉक्टर एवढंच म्हणाले की नीरव काही बोलायच्या आतच पटकन त्यांनी तिथून पळ काढला. नीरव मात्र अजूनही गोंधळून त्या भिंतीवर बघत होता.
"हे कसं शक्य आहे? मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. नक्की काय प्रकार आहे हा!" नीरवला खूपच भिती वाटली. शेवटी कसं बसं त्याने मनातले विचार झटकून टाकले आणि झोपायला म्हणून तिथेच हाॅलमध्ये खाली चटई टाकली. तो जेव्हा चटईवर झोपला तेव्हा त्याने सुधाकर कडे पाहिलं तर ते शांत पडून होते. ते बेशुद्ध आहे की झोपलेले हेच त्याला कळत नव्हते. त्याच्या डोक्यात सारखे तेच विचार चालू होते. शेवटी त्याने डोळे बंद करून जबरदस्तीने झोपायचा प्रयत्न केला. अगदी पहाटेच्या वेळी त्याचा डोळा लागला.
क्रमशः