Login

सावल्यांच्या कुशीत. भाग - ३५

सावल्यांच्या कुशीत
सावल्यांच्या कुशीत. भाग - ३५

सकाळी मंगल झोपेतून उठली आणि बाजूला पाहिलं तर सुधाकर तिथे नव्हते. तिला वाटलं की ते तिच्या आगोदर आवरून खाली गेले असतील, मग ती पण खाली आली आणि खाली येताच पाहिलं तर समोर बेडवर सुधाकर झोपले होते आणि चटईवर नीरव झोपला होता. सुधाकरच्या विचित्र वागण्याची तिला थोडी फार कल्पना होती पण नीरवला खाली झोपलेलं पाहून तिला धक्काच बसला. ती काळजीपोटी घाईघाईने त्याच्याकडे गेली आणि त्याला उठवलं.

"नीरव, हे काय... तू असा इथेच का झोपला आहे? तुझं आणि वेदिकाचं काही भांडण वगैरे झालं आहे का?" मंगलने काळजीने विचारलं. मंगलच्या आवाजाने नीरव उठून बसला आणि एक क्षणभर रात्री काय झालं ते आठवू लागला. ते आठवून तो परत सुधाकर कडे बघू लागला. त्याला असं शांत बघून मंगल परत विचारू लागली.

"नीरव, मी काहीतरी विचारतेय तुला. तू काहीच का बोलत नाहीये?" मंगल.

"आई, रात्री बाबा परत काहीतरी विचित्रच वागत होते. मी स्वतः पाहिलं होतं. अचानक त्यांची तब्येत पण बिघडली होती, मग त्यांनाही इथेच झोपवलं आणि मी पण इथेच झोपलो." नीरव म्हणाला. त्याच्या रूममध्ये अन्वीची आई आली आहे हे त्याने मुद्दामच मंगलला सांगितले नाही. सुधाकरच्या बाबतीत ऐकून तिचा चेहरा सुकला.

"नीरव, ऐक ना माझं... आपण जाऊया ना शेतातल्या घरी राहायला, इथे जर असं काही ना काही घडतंय तर काय करायचं या वाड्यात राहून!" मंगल.

"हो आई, फक्त आठ दिवस थांब. मग आपण नक्की तिकडे राहायला जाऊ. मी आलोच अंघोळ करून येतो." नीरव म्हणाला आणि लगेच त्याच्या खोलीत गेला. तो आत आला तेव्हा सुगंधा आणि वेदिका नुकत्याच उठून बसल्या होत्या.

"मामी, झोप आली ना तुम्हाला इथे!" नीरवने सुगंधाला विचारलं.

"हो झोप तर लागली मला, पण आता मी इथून बाहेर कसं पडू? तुझ्या बाबांनी मला इथे पाहिलं तर माझं काही खरं नाही." सुगंधा.

"तुम्ही इथेच बसून रहा, आजिबात बाहेर येऊ नका. आई बाबा शेतात गेले की मग आपण बोलू, मलाही तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे आणि खुप प्रश्न विचारायचे आहे. आता त्यांच्या समोर मी शाळेत जातो. ते गेले की मग मी लगेच घरी येईल. तोपर्यंत तुम्ही आजिबात या खोलीच्या बाहेर येऊ नका." नीरव.

"मी बाहेर येणार नाही पण जर आत कोणी आलं तर?" सुगंधाने घाबरून विचारलं.

"आमच्या खोलीत सहसा कोणी येत नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा!" नीरव.

"हो काकी, तुम्ही बसा इथेच. मी पटकन कामं आवरून परत इथे येते." वेदिका म्हणाली आणि खाली गेली. तिच्या मागोमाग नीरव सुद्धा खाली गेला. रात्री व्यवस्थित झोप झाली नव्हती त्यामुळे खरं तर त्याला आजिबात फ्रेश वाटत नव्हते. तरीही तो नाईलाजाने शाळेत गेला.

घरातली सगळी कामं झाल्यावर मंगल आणि सुधाकर पण शेतात गेले. मग वेदिका पण तिची कामं करून पटकन सुगंधासाठी जेवण घेऊन गेली. तिचं जेवण झाल्यावर वेदिकाने नीरवला फोन करून घरी बोलावले. नीरव पण थोड्या वेळातच घरी आला.

नीरव घरी आला तेव्हा वेदिका आणि सुगंधा त्याच्याच खोलीत बसल्या होत्या.

"मामी, आता तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते मनमोकळेपणाने बोला, आता इथे कोणीच नाहीये त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण त्याआधी अन्वी नेमकी कुठे आहे ते मला सांगा!" नीरव.

"तिच्याबद्दलच सांगायचं आहे नीरव, अन्वीने कधीच तुला धोका दिला नाही. तिला तुझ्याशीच लग्न करायचं होतं पण तुझ्या बाबांना ते मान्य नव्हतं." सुगंधा.

"पण ते तर तयार झाले होते ना आमच्या लग्नाला, उलट अन्वीनेच मला नकार दिला होता. मग तरीही तुम्ही असं का बोलताय?" नीरव.

"नाही हे सगळं खोटं आहे. अन्वीला तुझ्या बबांनीच तसं करायला सांगितले होते. त्यांनी तिला धमकी दिली होती. जर तिने तुला नकार दिला नाही तर त्याचे परिणाम मला भोगावे लागतील, असं सांगितलं. त्यामुळे तिने तुला घाबरून नकार दिला. त्यानंतर त्यांनी स्वतः तिचा खून केला. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीला माझ्या घरातून ओढून नेलं. तिला इथे काल मी ज्या खोलीत होती तिथेच त्यांनी तिला फासाला लटकवले आणि मारून टाकली आणि तिथेच तिला जमिनीत गाडलं. माझेही हातपाय बांधून ठेवले होते. नंतर मलाही धमकी दिली होती, जर मी तुला सांगितले तर ते मलाही मारून टाकतील." सुगंधाचं बोलणं ऐकून नीरव आणि वेदिका एकदमच सुन्न झाले. नीरवला थोडा फार अंदाज आला होता. त्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसला.

"माझे बाबा माझ्या बाबतीत असं काही करू शकतील याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. खुनी आहेत ते...." नीरवला बोलताना अगदीच गहिवरून आले होते.

"तुझा विश्वास नसला तरी हे खरं आहे नीरव. तुझं लग्न झाल्यावर एक दिवस मी खूप मोठं धाडस करून इथे तुझ्याशी बोलायला आली होती. त्यावेळी मी वेदिकाला विचारलं की तू कुठे आहेस ते, त्यानंतर ती जेव्हा तुला आत बोलवायला गेली त्याचवेळी तुझे बाबा तिथे आले आणि त्यांनी मला तिथून हाकलून दिले आणि आताही तू मला भेटू नये म्हणून त्यांनी मला मागच्या खोलीत डांबून ठेवलं होतं. जर तू वेळेवर आला नसता तर माझ्या अन्वी प्रमाणे त्यांनी माझा सुद्धा जीव घेतला असता. तसंही मी मरायला घाबरत नाही, आणि जगू तरी कोणासाठी... पण मला तुझ्यापर्यंत खरं काय आहे ते पोहचवायचं होतं आणि तुझ्या मनात अन्वीबद्दल असलेला राग दूर करायचा होता. एवढं एकच उद्दिष्ट ठेऊन मी जगत आली आहे. आता खरं काय आहे ते तुला समजलं आहे, आता मी मेले तरी काही हरकत नाही." सुगंधा.

"असं बोलू नका मामी, तुम्हाला जगायचं आहे. तुमच्या मुलीला न्याय द्यायचा आहे. तिला न्याय मिळाला तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल." नीरव.

"कोण देईल माझ्या मुलीला न्याय?" सुगंधा.

"मी देईन, ती तुमची मुलगी होती पण माझ्याशी सुद्धा तिचं काहीतरी नातं होतं. मी तिच्यासोबत माझ्या भविष्याची स्वप्न रंगवली होती. त्या स्वप्नांचा माझ्याच बाबांनी चुराडा केला. आता त्यांना जाब विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही." नीरव म्हणाला. त्याला किती दुःख झाले होते हे वेदिका समजू शकत होती. तिने त्याचा हात हातात घेत त्याला धीर दिला आणि प्रत्येक गोष्टीत मी तुमच्यासोबत आहे असा विश्वासही तिने नीरवला दिला.