Login

सावल्यांच्या कुशीत. भाग - ३६

सावल्यांच्या कुशीत
सावल्यांच्या कुशीत. भाग - ३६

सुधाकर शेतात माणसांना कामाला लावून मग आंब्याच्या झाडाखाली येऊन निवांत बसले. मंगल सुद्धा तिच्या कामात व्यस्त होती. तिचं काही सुधाकर कडे लक्ष नव्हते. सुधाकर बसले त्याचवेळी त्यांच्या पाठीत वेदना होत असल्याचे जाणवले आणि त्यांना डोकं सुद्धा थोडं जड वाटू लागले, म्हणून त्यांनी तिथेच झाडाखाली पाठ टाकली आणि थोड्याच वेळात त्यांचा डोळा लागला. तर लगेच त्यांच्या फोनची रिंग वाजली. मग ते उठले आणि वैतागून फोन उचलला आणि बोलू लागले.

"अरे बंड्या, तुला आत्ताच फोन करायचा होता का! चांगली झोप लागली होती मला. एकतर अंग पण दुखतंय माझं, जरा सुद्धा आराम करू देत नाही." सुधाकर वैतागून म्हणाले.

"झोपताय काय मालक, मी आता तुम्हाला बातमी सांगितली तर तुमची कायमची झोप उडेल." बंड्या म्हणाला.

"अशी काय बातमी सांगणार आहे तू?" सुधाकर.

"ती सुगंधा तुमच्या घरी तुमच्या लेका सोबत आणि सुने सोबत मस्त गप्पा मारतेय. मी आत्ताच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय." बंड्याचं बोलणं ऐकून सुधाकर ताडकन उठले.

"काय??? तू खरं सांगतोय ना नक्की!" सुधाकर.

"हो नक्की खरं सांगतोय. तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तुम्ही स्वतः घरी जाऊन बघा." बंड्या म्हणाला तसं सुधाकरने फोन ठेवला आणि घाईघाईने घरी जाऊ लागले.

सुधाकर घरी आले आणि डायरेक्ट नीरवच्या खोलीत गेले. दार उघडंच होतं त्यामुळे ते डायरेक्ट आत गेले आणि समोर बघू लागले तर सुगंधा तिथेच बसलेली होती. वेदिका आणि नीरव पण तिथेच बसून होते. सुगंधाला बघून सुधाकर घाबरले. तिला बघून त्यांना रागही आला होता. त्या रगानेच ते तिच्याकडे बघू लागले.

"नीरव, ही बाई काय करतेय इथे! हिच्या मुलीने तुला फसवलं आहे तरीही तू हिला घरात कसं काय घेतलं? ते काही नाही हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढून दे, असल्या धोकेबाज लोकांचं मला तोंड सुद्धा नाही बघायचं!" सुधाकर रागाने म्हणाले. त्यांचा आवाज ऐकून सुगंधा एकदमच घाबरली पण नीरव मात्र शांतपणे त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला.

"बाबा, तुम्ही तर शेतात गेला होता ना मग तुम्हाला कसं कळलं की या इथे आपल्या घरी आल्या आहेत?" नीरवने शांतपणे विचारले.

"मला कसं कळलं ते महत्वाचे नाहीये, तू आधी या बाईला घराबाहेर काढ!" सुधाकर परत रागाने म्हणाले.

"काढतो ना... एवढी काय घाई आहे. आईला येऊद्या घरी, आई आली की मग मी स्वतःच यांना घराबाहेर जायला सांगेल." नीरव म्हणाला आणि त्याने आरवला बोलावून मंगलला घरी घेऊन यायला सांगितले. सुधाकरला तर खूपच टेन्शन आले होते. सुगंधाने नीरवला नक्की काय सांगितले असेल हाच विचार त्यांच्या डोक्यात चालू होता. ते विचारात असताना नीरवने त्यांना आवाज दिला.

"बाबा, आपण खाली जाऊया का? आई येईलच आता!" नीरव म्हणाला तसं सुधाकर लगेच खाली गेले. त्याच्या मागोमाग नीरव, वेदिका आणि सुगंधा पण खाली आले. थोड्या वेळातच मंगल पण घरी आली आणि सुगंधाला समोर बघून ती आश्चर्य चकित झाली.

"सुगंधा वहिनी, तुम्ही आज कशा काय इथे आल्या? एवढे दिवस तुम्ही होतात कुठे? आणि अन्वी... ती कुठे आहे?" मंगलने विचारताच सुगंधाच्या डोळ्यात पाणी आले.

"माझी अन्वी या जगात नाही मंगल, तिचा खून झालायं!" सुगंधा म्हणाली आणि लगेच रडू लागली. ते ऐकून मंगलला सुद्धा धक्का बसला. ती सुद्धा रडायला लागली. नीरव मंगलला धीर देत होता तर वेदिका सुगंधाला धीर देत होती. आपल्याकडे कोणाचंच लक्ष नाही हे बघून सुधाकर हळूच तिथून बाहेर जाऊ लागले पण दारात उभं असलेल्या आरवने त्यांना अडवले.

"बाबा, थांबा जरा एवढी बाहेर जायची काय घाई झाली आहे तुम्हाला! इथे काय चाललंय ते तर ऐका!" आरव.

"मला हे जे काही चाललंय ते ऐकण्याची आजिबात इच्छा नाहीये, तुम्हाला ऐकायचं आहे ना मग तुम्हीच ऐकत बसा. ही बाई इथून गेली की मग मी घरी येईल." सुधाकर म्हणाले आणि आरवला धक्का देऊन पुढे जाऊ लागले, पण त्याचवेळी आपल्याला कोणीतरी सावरतोय असं आरवला जाणवलं आणि दुसऱ्या क्षणी सुधाकर धाडकन खाली पडले. ते पडले तसं सगळेच त्यांच्याकडे बघू लागले. मंगल लगेच लगबगीने पुढे आली आणि त्यांना उठवू लागली.

"आरव, तूच धक्का दिला ना यांना!" मंगल रागाने म्हणाली.

"आई, मी नाही पाडलं... ते स्वतःच पडले आहे. मी फक्त त्यांना बाहेर जाण्यापासून अडवत होतो." आरव म्हणाला, पण सुधाकर नेमकं कसे खाली पडले असतील हा प्रश्न त्यालाही पडला होता.

"पण काय गरज होती त्यांना अडवायची, जात होते बाहेर तर जाऊन द्यायचं ना!" मंगल.

"गरज होती आई, म्हणून तर आरव त्यांना अडवत होता. तुला मामींनी अन्वीचा खून झाला हे सांगितले, मग तुला प्रश्न पडला नाही का? तो कोणी केला आणि कसा झाला?" नीरव.

"आता ती आपल्याकडे पाठ फिरवून निघून गेली होती मग त्यानंतर ती कुठे गेली, कुठे राहिली हेच आपल्याला माहीत नव्हते तर तिचा खून कसा झाला आणि कोणी केला हे कसं आपल्याला माहित असणार. मुळात तिला इथून जायची गरजच नव्हती, आम्ही तुमच्या लग्नाला परवानगी दिली होती ना मग तरीही तिने तुला डावलून दिलंच ना, ती गेली याचं दुःख होतंय मला पण तिच्या जाण्याला ती स्वतःच जबाबदार आहे. ती जर तुला सोडून गेली नसती तर आज ती इथे आपल्या सगळ्यांसोबत असती." मंगल.

"आई, ती स्वतःहून नाही मला सोडून गेली. तिला जायला भाग पाडलं. तुला ती या घरची सून आणि माझी बायको म्हणून पसंत होती, पण बाबांना ती आजिबात या घरात यायला नको होती. त्यांनी फक्त माझ्या समाधानासाठी आमच्या लग्नाला होकार दिला होता पण नंतर त्यांनीच अन्वीला धमकी दिली आणि मला नकार द्यायला सांगितले. त्यानंतर बाबांनीच तिचा खून केला." नीरव म्हणाला तसं मंगल त्याच्याकडे रागाने बघू लागली.

"तोंडाला येईल ते बोलू नकोस नीरव, तुझ्या बाबांवर असे आरोप केलेले मला सहन होणार नाही." मंगल रागाने म्हणाली.

"मी आरोप नाही करत आई, हे खरं आहे. ते फक्त अन्वीचा खून करून थांबले नाही तर त्यांनी अन्वीच्या आईला आपल्या वाड्याच्या मागच्या खोलीत डांबून ठेवले होते. तुला खोटं वाटत असेल तर आरवला विचार, रात्री आम्ही दोघांनीच त्यांना त्या खोलीतून इथे आणले आहे." नीरव म्हणाला तसं मंगल एकदमच सुन्न होऊन आरवकडे बघू लागली.