Login

सावल्यांच्या कुशीत.भाग - ३७

सावल्यांच्या कुशीत
सावल्यांच्या कुशीत. भाग - ३७

"आई, दादा बोलतोय ते खरं आहे. रात्री आम्ही दोघांनीच त्यांना इथे आणलयं, बिचाऱ्या खुप घाबरलेल्या होत्या." आरव म्हणाला तसं मंगल सुधाकरकडे बघू लागली.

"काय हो... आपली मुलं बोलताय ते खरं आहे का?" मंगलने विचारताच सुधाकर उठून उभे राहिले आणि नीरव कडे रागाने बघू लागले.

"नीरव, या आरवला तुच माझ्या विरोधात भडकवलंय. मी असं काहीही केलेलं नाहीये. विनाकारण माझ्यावर आरोप केलेले मी सहन करणार नाही." सुधाकर चिडून रागाने म्हणाले.

"मी काही त्याला भडकवलं नाहीये, त्याने स्वतः पाहिलं होतं अन्वीची आई तिथे होती ते. खोटं तुम्ही बोलताय आणि आम्हाला खोट्यात पाडताय. तुम्हाला नव्हते अन्वीचं आणि माझं लग्न होऊन द्यायचं तर तेव्हाच तसं सांगायचं ना! एवढं सगळं करायची काय गरज होती." नीरवचा सुद्धा आता बोलताना आवाज चढला होता.

"माझ्यावर आवाज चढवून बोलतो काय, माझ्यावर आरोप करतो ना, हे घर, हा वाडा, शेती सगळं काही माझं आहे. तुम्ही सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. माझ्याच घरात राहून माझ्यावर आरोप केलेले मी सहन करणार नाही. निघा सगळे...." सुधाकर चिडून म्हणाले.

"ठिक आहे तुमची इच्छा आहे ना, आम्ही इथे नाही राहायचं... तर आम्ही हा वाडा सोडून जातो. पण त्याआधी मी पोलिसांना बोलावून त्यांना तुमची सगळी कारस्थान सांगणार आहे, अन्वीचा खून तुम्हीच केला आहे हे मी स्वतः पोलिसांना सांगतो." नीरव.

"तुझ्याकडे काय पुरावा आहे मिच तिचा खून केला आहे याचा!" सुधाकर.

"पुरावा तर नाहीये, पण तुम्हाला रोज रात्री कसले कसले भास होतात, कधी कधी तुम्ही बिछरल्यासारखे वागतात. भिंतीकडे बघून एकटेच बडबड करतात. याचा अर्थ काय आहे." नीरव.

"असं काहीच होत नाही, तू खोटं बोलतोय. इतके दिवस माझ्यापुढे तुझा आवाजही निघत नव्हता पण आज ही बाई इथे आली आणि तू मला उलटं बोलायला लागला. हिला मी सोडणार नाही." सुधाकर म्हणाले आणि सुगंधा कडे धाव घेऊ लागले तसं नीरवने त्यांना अडवलं. आणि सुगंधा सुद्धा घाबरून मागे झाली.

"नीरव, अरे काय आहे हे....? आपल्या घरात कधीच असे वाद होत नव्हते, मग आज अचानक या मागच्या सगळ्या गोष्टी उकरून काढायची काय गरज आहे तुला? तुझं लग्न झालंय, एवढी छान बायको मिळाली आहे. रहा ना तिच्यासोबत सुखी. कशाला उगाच नको ते विषय काढतोय." मंगल सुद्धा रागाने म्हणाली. त्याचवेळी ती वेदिकाकडे बघू लागली, तिला वाटले की वेदिका काही बोलेल पण वेदिका शांत उभी होती. ती कोणालाच काही बोलत नव्हती.

"आई, माझा संसार तेव्हाच सुखाचा होईल जेव्हा अन्वीच्या आत्म्याला शांती मिळेल. आणि तिच्या आत्म्याला तेव्हा शांती मिळेल जेव्हा तिच्या खुन्याला शिक्षा होईल." नीरव.

"मग आता तू काय तुझ्या बाबांना जेलमध्ये पाठवणार आहे का?" मंगल.

"मी कोण आहे त्यांना जेलमध्ये पाठवणारा, त्यांना काय शिक्षा द्यायची ते अन्वीच बघून घेईन. आई अगं तिचा आत्मा आपल्या सभोवताली फिरतोय. तिच बाबांना त्रास देतेय. आम्हाला सुद्धा कधी कधी जाणवतं की ती आमच्या आजूबाजूला आहे. मला तर कधी कधी तिची हाक सुद्धा ऐकू येते." नीरव.

"तू म्हणतोस ते जरी खरं असलं तरी त्यांनीच अन्वीचा खून केला आहे या गोष्टीवर माझा विश्वास नाही बसत. ती इथून निघून गेल्यावर तिच्या बाबतीत काही वेडंवाकडं झालं असेल, त्यानंतर आता तिला त्याचा पश्चात्ताप होत असेल म्हणून तिचा आत्मा इथे आपल्याभोवती घोटाळत असेल." मंगल.

"हा मलाही तेच म्हणायचं आहे, ती इथून एवढी तोऱ्यात निघून गेली आहे ना मग काय गरज आहे तिला इकडे भटकायची आणि आपल्या मानगुटीवर बसायची." सुधाकर म्हणाले. आणि त्याचवेळी ते धाडकन जमिनीवर पडले. यावेळी मंगल त्यांच्याकडेच बघत होती त्यामुळे ते आपोआप पडलेले तिने स्वतः पाहिलं आणि आता पहिल्यांदा ती घाबरली.

"पाहिलंस ना आई, हे आता कसं पडले ते मी तर त्यांना हातही नाही लावला आणि आरव तर ते बघ अजूनही दारातच उभा आहे." नीरव म्हणाला तसं मंगलला सुद्धा धक्का बसला.

"नीरव, खरं खरं सांग... हा काय प्रकार आहे." मंगल घाबरून म्हणाली.

"आई, बाबांनीच अन्वीचा खून केला आहे. तुला माहितीये का मी अन्वीला अंगठी दिली होती आणि त्यानंतर तिचं एक पत्रही होते. ते ती इथून जाताना तिच्याकडेच होतं मग त्या वस्तू मला आपल्या वाड्याच्या मागच्या खोलीत कशा मिळाल्या, तिच्या वस्तू चालत तर नाही ना येऊ शकत आणि बाहेरचं कोणी तिथे येऊही शकत नाही. ते तर झालंच पण एक दिवस मला माझ्या खोलीत जुन्या कपाटात तिचा फोटो आणि डायरी सापडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ती डायरी तिथून गायब झाली. माझ्या खोलीतल्या वस्तू अशा अचानक कशा गायब होतील." नीरव.

"अहो, आता तरी काय खरं आहे ते सांगा मला. मी नेमकं कोणावर विश्वास ठेऊ हेच कळत नाहीये मला!" मंगल रडवेल्या सुरात म्हणाली तसं सुधाकर सावरून बसले.

"मंगल, माझ्यावर विश्वास ठेव... मी असं काहीच केलं नाही." सुधाकर म्हणाले तसं मंगल खाली बसली आणि दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून बसली. तिला काय करावं काहीच सुचत नव्हते. तिला असं बसलेलं बघून सुगंधा पुढे आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला.

"मंगल, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. मी इथे आल्यामुळेच तुमच्यात वाद झाले आहे. मी जाते इथून आणि परत कधीच तुमच्या घरी येणार नाही, माझ्या मुलीला न्याय नाही मिळाला तरी चालेल." सुगंधा.

"मामी, काहीही काय बोलताय तुम्ही. तुम्ही येण्याने काहीच नाही झालं, उलट काही गोष्टींचा उलगडा झाला आहे. नाही तर आमचं आयुष्य असंच भास आभासातच चाललं असतं आणि नेमकं काय झालयं ते आम्हाला कळलंही नसतं." नीरव.

"नीरव, पण माझ्यामुळे तुमच्यात भांडणं होताय ना. ते नाही बरं वाटत मला." सुगंधा म्हणाली तोच सुधाकर पटकन कोणाला काही कळायच्या आतच पुढे आले आणि त्यांनी सुगंधाचा हात ओढला आणि तिला बाहेर ढकलू लागले.

"तुला कळतंय ना, हे तुझ्यामुळे होतंय मग निघ इथून. परत तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस." सुधाकर म्हणाले आणि जोरात सुगंधाला ढकलून दिले. त्याचवेळी सगळेच तिला पकडायला पुढे जाणार तोच पुर्ण वाडा अगदी भुकंपाचा धक्का बसल्यासारखा हालू लागला आणि वाड्याच्या खिडक्या, दारं जोरजोराने आपटू लागले. घरात एकदम वादळ आल्यासारखं घरातल्या वस्तू पण कोसळू लागल्या. ते बघून सगळेच घाबरले. अचानक असं कसं झालं हेच कोणाला समजेना. त्याचवेळी समोरच्या भिंतीकडे बघून सुगंधाचा चेहरा खुलला आणि डोळ्यात अश्रू दाटून आले.