Login

सावल्यांच्या कुशीत. भाग - ३८

सावल्यांच्या कुशीत
सावल्यांच्या कुशीत. भाग - ३८

"अन्वी.... तू sss" सुगंधा थरथरत्या आवाजात म्हणाली तसं सगळे भिंतीकडे बघू लागले. तर आज सगळ्यांना समोर अन्वी दिसत होती. तिच्या मागे भिंतीला धुराचे वलय दिसत होते आणि तिच्या पांढऱ्या कपड्यांवर हलकासा धुक्याचा थर होता. केस पूर्ण मोकळे सोडलेले, आणि त्यावर वाऱ्याचा न जाणवणारा झोत चालू असल्यासारखे ते चेहऱ्यावर उडत होते. तिचे डोळे खोल दिसत होते आणि त्याखाली काळसर छटा पण होत्या… डोळ्यांमध्ये वेदना आणि राग यांचा संगम स्पष्ट दिसत होता.

तिच्या सभोवतालच्या भिंतींवर एक विचित्र थंडी पसरली होती. समोर बसलेल्या सगळ्यांना तिला बघून अंगावर सरसरून काटा आला.

कुणीच काही बोललं नाही. वातावरण इतकं जड झालं होतं की कोणाच्याही तोंडातून शब्द फुटायला तयार नव्हते.

अन्वीचा चेहरा हलकेच उजळला पण त्या तेजात प्रेम नव्हतं, शांती नव्हती… होती तर केवळ अपूर्णता आणि प्रतिशोधाची झलक होती. ती फक्त सुधाकर कडे पाहत होती. त्यांच्याकडे पाहताना तिची नजर अशी होती की जणूकाही ती त्यांचा जीवच घेणार आहे.

तिच्या मागे असलेल्या धुराच्या वलयातून एखाद्या जुन्या वासासारखा मंद पण विचित्र गंध दरवळत होता… आणि तिचं अस्तित्व आता पूर्णपणे त्या खोलीत दिसलं होतं.

तिला बघून सगळे स्तब्ध झाले होते… कारण ही आता ती "अन्वी" नव्हती… ही होती भूत अन्वी, जी फक्त पाहत नव्हती, काहीतरी करायला आली होती!

अन्वीचं भूत अजूनही त्या धुरामधूनच दिसत होतं. ती अगदी थेट नीरवच्या बाबांकडे पाहत होती. त्यांच्या डोळ्यांत नजर रोखून.

"तुम्ही माझं आयुष्य संपवलं... एका निरपराध मुलीचा विश्वास, तिचं स्वप्न, तिचं प्रेम, तिचं भविष्य… सगळं... सगळं संपवलं तुम्ही! मी माझ्या आईचा एकमेव आधार होते, तो तुम्ही काढून घेतला. आता मी तुम्हाला सोडणार नाही." अन्वीचा आवाज आता खोल आणि घनदाट झाला होता, जणू भिंतीही तो आवाज शोषून घेत होत्या.

तिचं बोलणं ऐकून सुधाकर घामाघूम झाले होते. त्यांच्या कपाळावरून घामाचे थेंब गळत होते, आणि चेहरा पांढराफटक पडला होता. आता आपण काही तिच्यापासून वाचणार नाही असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.

"मला माझ्या नीरव पासून दूर केलं तुम्ही, मी आता तुम्हाला सुखाने जगू देणार नाही." अन्वी म्हणाली तेव्हा नीरव पुढे झाला.... पण तो काही बोलायच्या आधीच अन्वी पुढे सरकली. तिच्या हातातून हलकीशी धुराची एक लाट येऊन सुधाकरच्या पायाभोवती गुंडाळली. त्यामुळे ते तिथेच एका जागीच थिजले, त्यांना हालचाल पण करता येत नव्हती.

"तुम्ही मला मरण दिलंत… पण आता मी तुम्हाला जिवंतपणी मरणाच्या वेदना देणार आहे." अन्वी म्हणाली तसं सगळेच घाबरून सुधाकर कडे बघू लागले.

अन्वीने हवेत हात फिरवला, आणि तेव्हा अचानक सुधाकर खाली कोसळले. त्याचवेळी त्यांनी अन्वीचा खून केला होता ते दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर दिसू लागले.
अन्वीचा रडणारा चेहरा… ती रात्री अंधारात ओरडत इकडून तिकडे पळत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. पण सुधाकर काही ऐकत नव्हते. ते सगळं त्यांना डोळ्यासमोर दिसत होते.

सुधाकरला हे सगळं आठवून आता पश्चात्ताप होत होता. ते तसेच जमिनीवर पडलेले असताना रडू लागले.

"मला माफ कर अन्वी, मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी तुझा अपराधी आहे. पण झालं गेलं सोडून दे आणि मला माफ कर. मी परत कोणाशीच असं वागणार नाही." सुधाकर रडता रडताच म्हणाले.

"नाही.... मी तुम्हाला माफ करू शकणार नाही. तुम्ही माझे गुन्हेगार आहातच, पण त्यासोबत माझ्या आईचे सुद्धा गुन्हेगार आहात, तुम्ही तिला किती त्रास दिला तो सगळा मला दिसत होता पण मला तिला नीरव पर्यंत पोहचवायचे होते म्हणून मी शांत होती, पण आता सगळ्यांना खरं काय ते समजले आहे त्यामुळे तुमची माझ्यापासून सुटका नाही." अन्वी रागाने म्हणाली तसं सुधाकर गप्प बसले. हे सगळं बघून मंगल तर सुन्न झाली होती तिच्या तोंडून शब्दच बाहेर फुटत नव्हते. ती फक्त तोंडाला पदर लावून रडत होती. वेदिका सुद्धा शांत राहून समोर काय चाललंय ते पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते.

"अन्वी, बाबा तुझे गुन्हेगार आहे पण मी तर तुझा गुन्हेगार नाही ना, माझं प्रेम खरं होतं... तू जेव्हा मला सोडून जायची भाषा केली होती तेव्हा मी तुला अडवत होतो ना, मग का नाही थांबली तू? का नाही तेव्हा मला खरं सांगितलं?" नीरव डोळे भरून तिच्याकडे बघत म्हणाला.

"मी सांगितलं असतं तर तू माझ्यावर विश्वास ठेवला असता नीरव?" अन्वीने विचारलं.

"हो... ठेवला असता, जर मी आता तुझ्या आईवर विश्वास ठेऊ शकतो तर तुझ्यावर का नसता ठेवला. पण तुझाच माझ्यावर विश्वास नव्हता, तुच मला दुःख देऊन गेली. जाताना एकदाही मागे वळून पाहिले नाही. किती शोधलं मी तुला पण तू मला कुठेच दिसली नाही. शेवटी सगळं विसरून पुढे जायचा प्रयत्न केला आणि वेदिकाशी लग्न केलं. तू बाबांना तुझा गुन्हेगार आहे म्हणतेस ना, ते आहेतच तुझे गुन्हेगार पण या सगळ्यात वेदिकाचा काय दोष आहे? काय चूक आहे तिची? ती या घरात आल्यापासून तू अप्रत्यक्षपणे तिला त्रास देत होती. मग तुही तिची गुन्हेगार झालीसच ना!" नीरव म्हणाला तसं अन्वी वेदिका कडे बघू लागली.

"हो मी आहे तिची गुन्हेगार, मला तुझ्या आयुष्यात मी सोडून दुसरी कोणतीच मुलगी नको होती म्हणून मी तुम्हाला दोघांना जवळ येऊ देत नव्हती पण हिने त्यावर उपाय काढला. तिने स्वतःला ताविज घातला पण तो तुलाही जबरदस्तीने घालायला लावला. त्यामुळे मला काहीच करता आले नाही. माझं सुख मला मिळालं नाही, आता मी तुम्हाला कोणालाच सुखी राहू देणार नाही. सगळ्यांना त्रास देईल." अन्वी रागाने म्हणाली तसं सुगंधा उठली आणि तिच्या समोर येऊन उभी राहिली.

"अन्वी, चुकतेय तू.... हे सगळे लोक चांगले आहे. तू विसरली का, मंगलने तुला किती माया लावली होती आणि नीरवचं तर तुझ्यावर खूप प्रेम होते, वेदिकाचा तर यात काही संबंधच नाही. एकाच्या चुकीची शिक्षा तू सगळ्यांना नाही देऊ शकत, मी तुझ्यावर तसे संस्कार नाही केले. तू जर या सगळ्यांना त्रास दिला तर मी तुला कधीच माफ करणार नाही." सुगंधा म्हणाली तेव्हा अन्वी अजूनच रागावली.