सावल्यांच्या कुशीत. भाग - ३९ (अंतिम भाग)
"आई... एवढं सगळं होऊन सुद्धा तू याच लोकांची बाजू घेतेय. मला किती क्रुरपणे मारलं होतं त्याचं काहीच कसं वाटत नाही तुला." अन्वीचा रागीट आवाज आता रडवेला होत चालला होता.
"मी सगळ्यांची नाही बाजू घेत. तू विनाकारण ज्यांना त्रास देतेय. त्यांच्याबद्दल बोलतेय मी. काही लोकांमध्ये नसते माणुसकी पण आपण आपली माणुसकी नाही सोडायची." सुगंधा.
"माझ्यात आता कसलीही माणुसकी नाही उरली आई, कारण मी आता माणूसच नाहीये." अन्वी.
"ठिक आहे, तुला शिक्षा द्यायचीच आहे ना मग ती मला एकट्याला दे, मी एकटाच तुझा गुन्हेगार आहे. बाकी सगळ्यांना तू सोडून दे." सुधाकर घाबरलेल्या आवाजात बोलले.
"तुम्हाला शिक्षा हवी आहे ना मग तुम्ही आज रात्री बारा वाजता वाड्याच्या मागच्या खोलीत यायचं, तुम्ही जसा माझा जीव घेतला तसाच मी सुद्धा तुमचा जीव घेईल आणि येताना एकट्यानेच यायचं, जर तुमच्या सोबत दुसरं कोणीही असलं तर त्याचा सुद्धा मी जीव घेईल. बोला... आहे का कबूल?" अन्वी म्हणाली.
"हो कबूल आहे, जर माझा जीव घेतल्याने माझं कुटुंब सुखी होणार असेल आणि तुझ्याही आत्म्याला शांती मिळणार असेल तर मी तयार आहे, असंही तुला मारून मी पापच केलं आहे आणि माझ्या पापाचे भोग मी भोगायलाच पाहिजे." सुधाकर बोलत होते तेव्हा सगळे त्यांच्याकडे बघत होते. त्यांचं बोलून झाल्यावर अन्वी लगेच सगळ्यांच्या नकळत तिथून गायब झाली. समोर जे काही चाललं होतं ते पाहून मंगलला प्रचंड धक्का बसला होता. अन्वी बोलल्याप्रमाणे खरंच ती सुधाकरचा जीव घेईल का? या विचारानेच तिचं डोकं सुन्न झालं होतं.
थोड्या वेळाने परत सगळ्यांचे लक्ष भिंतीकडे गेले आणि पाहिलं तर तिथे अन्वी नव्हती. मग सुगंधा पुढे आली आणि ती त्या भिंतीवर हात फिरवू लागली.
"माझी अन्वी.... असे बोलून ती हुंदके देत रडू लागली. तिला रडताना बघून वेदिका तिच्या जवळ आली आणि तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"अन्वी नसली म्हणून काय झालं, मी आहे ना... मला तुमची अन्वीच समजा आणि आजपासून तुम्ही इथेच राहायचं. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही." वेदिका म्हणाली तसं सुगंधाने डोळे पुसले आणि तिच्याकडे बघू लागली.
"नाही गं पोरी, मी माझ्याच घरी ठिक आहे." सुगंधा म्हणाली.
"मामी, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. हवं तर हे माझं प्रायश्चित्त समजा. पण तुम्ही इथेच रहा." नीरव म्हणाला तसं सुधाकरने सुद्धा सुगंधाला इथेच रहा म्हणून विनवणी केली. मग सुगंधा पण राहायला तयार झाली.
अर्ध्या रात्री घड्याळाचा काटा बारावर गेला आणि तो क्षण आला. अन्वीने बोलावल्याप्रमाणे सुधाकर घराबाहेर पडले. ते चालले तेव्हा मंगल खुप रडत होती. ती त्यांना जाऊच देत नव्हती पण त्यांनी तिला कसं बसं समजावलं आणि ते घराबाहेर पडले.
सुधाकर वाड्याच्या मागच्या, धुळीने झाकलेल्या अंधाऱ्या खोलीत गेले आणि अन्वीला आवाज दिला.
"तू सांगितल्याप्रमाणे मी आलोय अन्वी" ते थरथरत्या आवाजात पण ठामपणे म्हणाले.
आत काही क्षण शांतता होती. अचानक एका कोपऱ्यातून गार वाऱ्याची झुळूक आली, आणि त्या वाऱ्यातून अन्वीचं रूप हळूहळू समोर आलं. तिच्या डोळ्यांत वेदना, आणि चेहऱ्यावर निस्तेज भाव होते.
"तुम्ही तयार आहात का, तुमचा शेवट स्वीकारायला?" अन्वीने शांतपणे विचारलं.
"हो. मी एक पाप केलं, आणि त्या पापाचे परिणाम फक्त तुला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागले. घरात जे काही होतंय त्याला मीच जबाबदार आहे. मी तुझा जीव घेतला, आता तू माझा जीव घे... मी तयार आहे."
सुधाकर शांतपणे म्हणाले.
सुधाकर शांतपणे म्हणाले.
अन्वी थोडा वेळ गप्प राहिली. नंतर ती पुढे आली. मग तिचा हात सुधाकरच्या छातीकडे सरकला… पण तिने स्पर्श नाही केला. त्यांना स्पर्श करायच्या आधीच तिच्या डोळ्यांत पाणी साठलं आणि ती मागे सरकली.
"तुमचा पश्चात्ताप खरा आहे. तुम्हाला जेवढी शिक्षा द्यायची होती तेवढी देऊन झाली आहे.... आता तुम्ही फक्त माझ्या आईचा छान सांभाळ करा आणि सगळे तिची काळजी घ्या, तिला एकटं वाटणार नाही. असं आपलेपण तिला द्या, म्हणजे माझा आत्मा मुक्त होईल. आणि एक वचन द्या इथून पुढे दुसऱ्या कोणाचंही आयुष्य तुमच्या हातून अशा प्रकारे संपायला नको. आणि जर मी परत आले... तर मला प्रेम द्या." अन्वी म्हणाली तेव्हा सुधाकर गहिवरले.
"अन्वी... तू परत येशील?" सुधाकर म्हणाले.
"हो... पण तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल." एवढं बोलून अन्वीचा आत्मा शांतपणे हवेत विरघळला. त्या खोलीतील वाऱ्याचा वेग थांबला, आणि वातावरणात एक शांतता पसरली जणू काही बराच काळ अडकलेलं काहीतरी मुक्त झालं होतं.
तेच अंधाराचे सावट, तेच गूढतेचे थर… पण आज त्यात भीती नव्हती, होती एक स्वीकाराची झुळूक.
अन्वीचा आत्मा त्याच क्षणी हवेत विरघळत म्हणाला...
"माझं आयुष्य सावल्यांच्या कुशीत हरवलं... पण आज, त्या सावल्यांनी मला कवेत घेतलंय… आणि मी शांत झोप घेते आहे." एवढं बोलून ती पुर्णपणे गायब झाली.
सुधाकरने डोळ्यातले अश्रू पुसले आणि तिथून बाहेर पडले. ते घरी आले तेव्हा समोर पाहिलं तर सगळेच रडत होते. त्यांना ते गेल्याचं दुःख आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
ज्या माणसांना आपण घराबाहेर काढायला निघालो होतो आज तिच माणसं आपल्यासाठी किती रडताय हे बघून त्यांचे सुद्धा डोळे भरून आले. त्यांनी दारातूनन मंगलला आवाज दिला.
"मंगल..." त्यांच्या आवाजाने सगळेच दाराकडे पाहू लागले. सुधाकरला समोर बघून सगळेच आश्चर्य चकित झाले. नीरव पटकन पुढे गेला.
"बाबा, तुम्ही... नक्की तुम्हीच आहात ना!" नीरव म्हणाला.
"हो मीच आहे, अन्वीने मला माफ केलं आणि तिनेच घरी जायला सांगितले. ती म्हणाली की तुम्हाला तुमची चुक कळली तेच खुप आहे. आणि जाताना हे ही म्हणाली की मी परत येईन पण त्यावेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल." सुधाकर म्हणाले तसं सगळेच त्यांच्याजवळ आले. ते सुखरूप आले म्हणून सगळेच खूश झाले. त्याचवेळी वेदिकाला उलटी सारखं होऊ लागलं. म्हणून ती बाहेर गेली तर तिला कोरड्या उलट्या होऊ लागल्या. ते बघून सुगंधा हसली आणि म्हणाली.
"माझी अन्वी नक्कीच परत येणार.... नीरव आणि वेदिकाच्या बाळाच्या रूपात..." सुगंधा म्हणाली तोच घरात एक छानशी थंड हवेची झुळूक आली आणि ती सगळ्यांना सुखावून गेली.
समाप्त....
सौ. रोहिणी किसन बांगर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा