Login

सावत्र नाही ती तर आपलीच भाग 1

सावत्र नाही ती तर खुप प्रेमळ आहे
सावत्र नाही ती तर आपलीच भाग 1

©️®️शिल्पा सुतार

मंदिरात बाजूच्या हॉल मधे लग्न लागत होत.  दोघांच लग्न म्हणजे एक फॉर्मलीटी होती. एक गरज म्हणून दोघ तयार झाले होते. त्याच्या घरी करायला कोणी नव्हतं. तर तिला कोणाचा आधार नव्हता. तिची आई पण भावाकडे रहात होती. भाऊ वहिनी तिचा राग राग करत होते. वय वाढत होत. आई ही काळजी करत होती. तिने ही शेवटी लग्नाला होकार देवून टाकला.

लग्न विधी सुरू होत्या. हे लोक ओळखीचे नाहीत. काय होणार आहे माझ काही समजत नाही. ती काळजीत होती. मला जमेल का यांच्या सोबत रहायला. यांना दोन मुल आहेत. ते मला स्विकारतिल का. सासुबाई कश्या असतिल? त्या त्रास देतील का? बरेच प्रश्न तिच्या मनात होते.

तिने त्याच्या कडे आज पहिल्यांदाच व्यवस्थित बघितल. मुळचा बिझनेसमेन तो कॉन्फीडन्ट होता. रूबाबदार एकदम. त्याने ही तिच्या कडे बघितल. तिने पटकन खाली मान घातली.

मंगलाष्टक सुरू झाले. लग्न लागल. दोघांनी एकमेकांना हार घातले. गुरुजींनी तिचा हात त्याच्या हातात दिला. तो पुढे झाला. तिचा जवळ सोफ्यावर बसला. ती थोडी बाजूला सरकली. घरचे सगळे अभिनंदन करत होते.

दोघांच्या घरचे खुर्चीवर बसुन प्रोग्राम बघत होते. पुढच्या पूजा झाल्या. फेरे झाले. त्याने तिला. कुंकू लावल. मंगळसूत्र घातल. ते चांगल चार तोळ्याच्या वर असेल. पाटल्या, बांगड्या, अंगठी, कानातले, नथ, पायातल्या साखळ्या सगळेच दागिने दिले.

तिकडची परिस्थिती चांगली दिसते आहे. तिने अंदाज बांधला. त्यातल्या त्यात तिला समाधान वाटल.

दोघ उठले मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. जेवणाचा बेत छान होता. सगळ आवरल. ते निघाले.

नवरी प्रियांका, तिची आई थोड रडली. बाकी सगळे प्रॅक्टिकल होते. "काळजी घे बेटा. आपल समजून रहा."

" हो आई. चांगल रहावच लागेल. मला कोणाचा आधार नाही. तू ही नीट रहा. आता मी नाही तुझ्या कडे बघायला." ती परत रडत होती.

" हे बघ नाराज होऊ नकोस. तुझ्या घरचे चांगले दिसता आहेत."

" हो आई."

ती कार मधे येवून बसली. तो त्याच्या मोबाईल मधे बघत होता. बाजूला त्याची बहीण बसली होती . चला त्याने ड्रायवरला सांगितल. कार निघाली. ती अजूनही खिडकीतून आईकडे बघत होती. रडत होती. त्याने तिचा हात थोपटला. रडू नकोस. मी आहे.

तिला बर वाटल. समजूतदार दिसता आहेत.

नवरदेव रघुवीर तसा चाळीशीतला. ती तिशीच्या आसपास. अगदी प्रॅक्टिकल लग्न. त्याला घर सांभाळायला कोणी तरी हवी होती. आईच वय झालेल. त्या नेहमी आजारी असायच्या. झोपून होत्या. अडनिड वयातले दोन मुल. बायको कॅन्सरने गेलेली. अलका ताई अधून मधून येत होती. तिला ही तिचा संसार होता.

प्रियांकाचा तर प्रॉब्लेम वेगळा होता. ती नोकरी करत होती तिथे तीच एका मुलावर प्रेम बसल होत . दोघांनी लग्न करायच ठरवल. सोबत वेळ घालवू लागले.  तिला दिवस राहिले. ती घाबरली. त्याने धोका दिला. त्याच आधीच लग्न झालेल होत. घरच्यांनी तिला समजवून मोकळ करून घेतल.

तो पर्यंत सगळीकडे बातमी पसरली होती. घरची परिस्थिती कठिण होती. त्यात लग्न जमत नव्हतं. वडलांच आजारपण त्यात खूप कर्ज झाल. इतक करूनही ते वारले. भाऊ वहिनीला ती जड झाली होती. मी आईला सांभाळेल पण हिला नाही. ति आणि आई वेगळी रहात होती. लोक त्रास द्यायचे रात्रीचे दार वाजवायचे. तिला समजल अस रहाण्यात धोका आहे. तिने स्वतः साठी स्थळ बघायला सुरुवात केली. या वयात स्थळ मिळत नव्हते.

आईच्या मावस बहिणीने हे स्थळ सुचवल. श्रीमंत लोक आहेत स्वतः चा बिझनेस आहे. सांभाळायला कोणी नाही. आईने होकार कळवला.

ते भेटायला आले. त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली. ते प्रियांकाशी बोलले. "दोन मुल आहेत त्यांच्याकडे बघायच.  आई म्हणेल ते ऐकायच. घरात कसली कमी नाही. तुला हव ते तू कर. फक्त वाद, भांडण चालणार नाही."

तिने होकार दिला. "तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बद्दल?"

हो.

"माझी चूक झाली. पण त्या नंतर मी कोणाशी मैत्री केली नाही. या पुढे ही अस होणार नाही. "

"काही हरकत नाही."

" नंतर कोणी काही बोलणार नाही ना." तिने विचारल.

"काळजी करू नकोस. "

खरेदी वगैरे झाली. लगेच एका महिन्यात लग्न झाल. आज ती सासरी निघाली होती.