Login

सावत्र नाही ती तर आपलीच भाग 2

सावत्र नाही ती तर खुप प्रेमळ आहे
सावत्र नाही ती तर आपलीच भाग 2

©️®️शिल्पा सुतार

ती रस्त्याने गप्प बसुन होती. रघुवीर बहिणी सोबत काहीतरी बोलत होते. ते घरी आले. बंगला छान मोठा होता. त्याला लाइटिंग केलेली होती. आजूबाजूला बगीचा होता. मध्यभागी कारंजा होता. कार मेन दरवाजा समोर थांबली. अलकाताई पळत आत मध्ये गेली. तिने स्वागताची तयारी केली. तोपर्यंत प्रियंका आत मध्येच बसून होते. रघुवीर बाहेर उभे होते.

घरात काम करणारे बरेच लोक कार कडेच बघत होते. नवी नवरी कशी असेल याची सगळ्यांना उत्सुकता होती. प्रियंकाला काही सुचत नव्हतं. "कोण कोण असेल घरात? मी रोज इथे काय करणार आहे." ती विचार करत होती. तिला रडू येत होत. उगीच लग्न केल.

" वहिनी आत चल." अलका ताईने आवाज दिला.

तिला कार बाहेर येता येत नव्हतं. रघुवीर तिकडुन आला. कारचा दरवाजा उघडला. ती हळूच खाली आली. लाल रंगाच्या शालू आणि दागिन्यांन मधे ती खूपच छान दिसत होती. पदर सावरून ती त्याच्या जवळ उभी होती.

दोघांना बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी होती. नवीन मालकिन तर खूपच तरुण आहे, सुंदर आहे.

अलकाताईंनी दोघांना ओवळलं . दोघ घरात आले. आईच्या खोलीत गेले. त्या उठून बसल्या. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद होता. "पोरी ये बस माझ्या जवळ. रघुवीर तुझी बायको छान आहे." त्यांनी तिला बांगड्या दिल्या.

" आई आधीच खूप बांगड्या आहेत." ती हळूच म्हणाली.

"असू दे. प्रेमाने रहा दोघ."

ते बाहेर आले. दोन मुलं आत्याच्या बाजूला उभे होते.

अनिकेत आठवीत होता. निधी तिसरीत होती. दोघं मुलं दिसायला गोड होते. ती त्यांच्या कडून बघून हसली. जवळ भेटायला गेली. ती निधीला भेटली. अनिकेतने तोंड फिरवल. त्याने निधीचा हात धरला. तिला पुढे येऊ दिला नाही. दोघ त्यांच्या रूममध्ये निघून गेले.

" वहिनी तु नवीन आहे ना म्हणून ते लाजता आहेत." अलका ताई  बोलल्या.

ती काही म्हटली नाही

रघुवीर रूम मध्ये निघून गेले. ती सोफ्यावर बसली होती.

"चल वहिनी आराम कर." त्या दोघीजणी एका रूममध्ये आल्या. ती घरातल्या लोकांबद्दल माहिती विचारत होती.
मुलांबद्दल विचारत होती. मुलांना काय आवडतं काय नाही. कसा आहे स्वभाव. तसे दोघं मुलं छान होते. आजकाल अनिकेत जरा चिडचिड करत होता. निधी शांत होती.

नंतर तिने रघुवीर बद्दल माहिती विचारली. ते स्वभावाने फार समजूतदार होते हे समजल्यावर तिला बरं वाटलं.

सासुबाई तर नेहमी आजारी असायच्या. त्या झोपलेल्या असायच्या. ति कपडे बदलून झोपली. दुसरं लग्न असल्यामुळे इतर कार्यक्रम नव्हते.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. ती लवकर उठली. आवरून झाल. घरात काम करायला बरेच लोक होते. किचनमध्ये गेली तरी काही काम नव्हतं. ती डायनिंग टेबलवर चहा घेत बसलेली होती.

समोरच्या पडद्याआडून निधी तिच्याकडे बघत होती. छोटीशी निधी गोड होती.

"अरे कोण आहे तिकडे. ये इकडे." तिने हाक मारली. निधी तिच्याजवळ येऊन बसली. तिने तिच्या गालावर ओठ टेकवले.

"काय नाव तुझं?"

"निधी." तिने सांगितलं.

मुद्दामून तिला बोलत करायला प्रियांका नाव विचारत होती.

"चल मी तुझी तयारी करून देऊ का? तुझी अंघोळ झाली का?"

"हो अंघोळ झाली आहे."

प्रियांकाने तिची वेणी घालून दिली. दुसरी वेणी होतच आली होती. तेवढ्यात अनिकेत आला. तिला हाताला धरून ओढत होता. "निधी तुला काय सांगितल होत चल इथून. ही सावत्र आई आहे. ती तुला मारेल." तो ओरडला.

" असू दे ना अनिकेत हिला माझ्या जवळ. मी काही करणार नाही . " प्रियांका बघत होती हा असा काय बोलतो आहे.

" काही गरज नाही तिची वेणी घालायची. मी बघेन तीच. ती माझी बहिण आहे. " तो रागा रागाने बोलत होता.

तेवढ्यात रघुवीर बाहेर आले. त्यांनी अनिकेतच वागण बघितल. " काय चाललय हे अनिकेत? ही काय वागण्याची पद्धत आहे का? माफी माग आईची. "

प्रियांका पटकन उठून उभी राहिली.

अनिकेत तिच्या कडे रागाने बघत त्याच्या रूममध्ये निघून गेला. निधी घाबरलेली होती ती प्रियांकाला चिकटली. तिने तिला कडेवर घेतल.

"सॉरी प्रियांका. अनिकेत नीट वागत नाही. " रघुवीर म्हणाले.

" काही हरकत नाही. " ती म्हणाली. रघुवीर बाहेर गेले.

निधी अजून तिच्या जवळ होती. "काकू मी रूम मधे जाऊ का? अनिकेत दादा बोलवतो आहे. " तिने घाबरत विचारल.

" जा, पण मी काकू नाही तुझी आई आहे. मला आई म्हणायचं."

"हो आई, दादा चिडला आहे. मी बघून येते. तू आम्हाला मारशील का?" तिने निरागस पणे विचारल.

" नाही, मी तर निधीचे लाड करणार. कारण तू गोड मुलगी आहेस. "

ती खुदकन हसली. "मी दादाला सांगून येते."

ती आत मध्ये गेली. अनिकेत टेबल खुर्चीवर रागाने बसलेला होता.

"निधी का गेली होती तू तिकडे? "

" दादा अरे आई छान आहे. "

"नाही ती सावत्र आहे ती आपल्याला मारेल. चटके देईल. आपल्याला तिच्याशी जास्त बोलायचं नाही. तिला त्रास द्यायचा म्हणजे ती आपोआप घर सोडून जाईल. "

" तिने माझ्या वेण्यावर किती छान घातल्या . अरे चांगली आहे ती. तू बोलून बघ तिच्याशी. "निधी बोलली.

" तिच्यामुळे आज मला बाबा रागवले. " अनिकेतने रागाने सांगितल.

" कोणी सांगितलं हे अनिकेत. मावशीने सांगितलं आहे ना. हे वागणं चुकीच आहे." अलका ताई आत येत बोलली.

"आत्या तू पण तिच्या बाजूने बोलू नकोस." तो रागाने बाथरूम मधे निघून गेला.



0

🎭 Series Post

View all