Login

शिकार

एक थरारक कथा

कथेचे नाव:-शिकार

विषय :काळ आला होता पण

फेरी :- राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा




"वना ए वना..!" शेतात कापणी करायला आलेल्या वनिताला कुणीतरी हाक मारली आणि तिचा विळा तिकडेच थांबला.तिने उभं राहुन पाहिलं तर तिच्याच पाड्याची सुलक्षणा तिला हाक मारत होती.


"काय झाल गं सुले? कशाला गळा फाडती ?" वनिताने कदरवुन विचारलं.


"वने तुले माहित नाही ,नरभक्षी जनावर येऊन राहिलं की पाड्यावर..लवकर घरी जाउया. फारिस्ट वाल्यांनी  जनावर पकडेपर्यंत काळजी घ्यायला सांगितलं असा.  तवा रात पडायच्या आत घरा जायला लागलं. "सुलक्षणा म्हणाली.


"व्हयं व्हयं..येती म्या ..माज्याबिगर जाऊ नकासा.." असं वनिताने म्हटल्यावर, सुलक्षणा तिला म्हणाली.


"म्या नाय येणार हाय..मायला घेऊन जिल्याच्या डागटरकडे जायचं आहे.बिंदुच ऑपरिशन हाय.तवा तू बाकीच्यांबरूबर जा.जाता येता काळजी घे.येते म्या." 

वनिताला काम करताना मग फॉरेस्ट ऑफिसर यांच म्हणणं आठवलं. ते म्हणाले होते की जंगलतोडीमुळ हरणं कमी झाली होती त्यामुळे वाघांना शिकारही मिळत नाही आहे.अश्यावेळी भुकेजला वाघाला पाड्यावरची निजलेली माणसे सहज सोपी शिकार वाटतात .हल्ली त्यामुळेच नरभक्षक वाघाचं प्रमाण व दहशत वाढली आहे तर प्रत्येकाने आपल्या खोपटाभवती दिवा ठेवाव, जसं मशाल किंवा शेकोटी सारखं काहीतरी .

आधीच वनिताकडे काम कमी झालं होतं कारण कापणी संपत आली होती.गाठीला आता पैसा जास्त नव्हता.जो मिळाला होता, त्यात तिने मुलांसाठी कपडे आणि थोडीशी खोपट्याची डागडुजी केली होती. ती कामासाठी डोगंर माथ्यावरील पालाकडुन पायथ्याशी वसलेल्या गावात यायची.

कधी ती शेतमजुराचं काम करायची तर कधी गावात रानमेवा, मध, लाकडाची मोळी विकायची. पैसा असा तिच्या गाठीला फारसा राहायचा नाही .वनिताने नऊवारीला नेसलेल्या केळाच्या आकाराची एक गाठ  उलगडली आणि त्यात असलेली नाणी पाहिली. हाताला काही जास्त पैसे नव्हते, ज्यातुन मशालीसाठी तेल विकत घेता येईल.

मशाल रात्रभर तेवत असली तर नरभक्षक वाघ आगीला घाबरून खोपट्याकडे येत नसे. रानातील जाळ पेटवुन शेकोटी करण्याचा फायदा नव्हता कारण रात्रीच्या  वाहणाऱ्या  जोराच्या हवेने जर जाळातील ठिणगी उडाली तर गवाताने व मातीने  शाकारलेलं खोपट पेट घेण्याची शक्यता होती.

तिने दिर्घ श्वास घेतला व काम झाल्यावर मुकदमाकडे गेली आणि त्याला अजिजीने म्हणाली ,

"जरा जरूरी होती जी.मजुरीचं पैक आज मिळालं तर बरं व्हईल. पाड्यावर नरभक्षी जनावर आलया तर मशाल जाळाया तेल इकत घ्यायला पैक हवं होत जी."

मुकादमाने तिच्याकडे वर पासुन खालीपर्यंत पाहीलं.गुडघ्याच्यावर नेसलेल्या साडीतून दिसाणारे तिचे सावळे पाय आणि मासंल घोटे, तसचं शिसवी कोरलेल्या मुर्तीतून उभा केल्यासारखा वळदार बांधा, साडीतूनही उभारून दिसणारी छाती आणि मग दोन मुलांची आई होऊनही अजुनही  चेहऱ्यावर असलेली तरूणपणाची झाक हे सगळं मुकादमला आकर्षित करायचं, पण वनिता कधी कोणाला दाद लागु देत नव्हती. त्यामुळे मुकदमाला कधी तिचा फायदा घेता आला नव्हता.

तशीही ती एकटी होती.तिचा दादला तर केव्हाच देवाघरी गेला होता.वनितालाही मुकादमची नजर समजायची पण आज तिच्याकडे काही पर्याय नव्हता.कोणाकडे उधारी मागण्याऐवजी आपले हक्काचे पैसे मागणं तिला जास्त बरं वाटलं होतं.

मुकादमाने तिला डोळे भरून पाहुन नजरेनेचं विवस्त्र करून झाल्यावर काही वेळाने म्हणाला,

" वेळेच्याआधी मजुरी तुला दिली तर मग बाकीचे मजुर गप्प राहतील काय?मी काय डबोलं घेऊन फिरतो काय तुमच्यासाठी? हा! पण माझं जास्तीच काम करशील तर  मी तुला अख्खा डब्बाभरून तेल देईन. "

"कंच काम ?बोला जी ..आता करतो." वनिता उत्साहात म्हणाली.

तसा मुकादम म्हणाला, "इकडं नको ,रातच्याला तुझ्या खोपटात येऊन सांगतो. "असं म्हणुन त्याने वनिताला जवळ ओढलं.तसं वनिताने हातातील विळा त्याच्या गळ्याशी लावला.


" माझ्या वाटेला जाऊ नगं..म्या काय तुला अशीतशी वाटलीया..मुकाट माझी आतापरतुरची मजुरी दि.पुन्हा तुझ्या कामाला म्या येणार नाही. ",वनिता रागातच मुकदमला म्हणाली.

"नाही देणार जा !काय करशील !" मुकादम अजुनही आढ्यात म्हणाला .

"अरं !म्या एकटी नाहीसा.पालावरच्या माझ्या माणसांसनी कळलं तर तुझा मुडदा बसवशिल.समजलं.."वनिताने रागात तो विळा मुकादमच्या मानेवर अजुनच घट्ट धरत म्हटलं. विळ्याची धार पाहुन आणि वनिताचा अवतार पाहुन मुकादम चांगलाच चरकला.


मुकादमने घाबरून खिशातून काही नोटा काढुन वनिताच्या हातावर टेकवल्या.वनिताने आकाशाकडे पाहिलं तर सुर्य मावळतीला आला होता.ती लगोलाग वाण्याच्या दुकानातून तेल घेऊन आपल्या पाडावर आली. पाड्यावरच्या इतर कुणाला  मात्र तिने ह्याबद्दल काही सांगितल नाही.


वनिताने मशालीची वात पेटवली आणि बिनघोर झोपली तसेही आता जनावर येईल ह्याची तिला काळजी नव्हती,पण तिला काय माहित होतं, तिने मुकादमच्या आतील सापला डिवचलं होतं.

पुर्ण पाडा लवकर गपगुमान निद्रेच्या अधीन झाला.वनिताचा पाठलाग करणाऱ्या मुकदामने तिचे खोपटं पाहुन ठेवलं होतं. तो मध्यरात्री परत आला .त्याने ठरवलं,आज काही करून वनिताला हासिल करायचं. मग रानात नेऊन तिला जिवानिशी मारायचं.

लोकांना वाटलं असतं,मशालीतलं तेल संपलं असेल  म्हणुन नरभक्षी वाघाने तिच्या अंधाऱ्या खोपटावर हल्ला करून झोपलेल्याला वनिताला उचलुन नेलं  आणि तिला मारलं.


त्याला कोणी आत जाताना पाहु नये म्हणुन आधीच मुकादमने बाहेर लावलेली मशाल विझवली. रात्रीच्या गाढ झोपेत असलेल्या वनिताला मशाल विझल्याचं समजलं नाही.ती आणि तिची पोरं गाढ झोपलेली होती.हळुचं त्याने खोपट्याचं दार उघडलं.खोपट्यांना कडी अशी नसते आणि असली तरी ती काठीने काढता येते म्हणुनच मुकदमाला सहज तिच्या खोपटात शिरता आलं.


मुकादमाने खोपट्यात टॉर्च मारून वनिता कुठे आहे ह्याचा अंदाज घेतला, मग झोपेत असलेल्या वनिताचं तोंड तिच्याच पदराने करकचुन बांधायला सुरवात केली.


गाढ झोपलेल्या वनिताला काहीतरी होतय ह्याची जाणीव झाली, पण ती पुर्ण जागी होईपर्यंत त्याने तिचं तोंड बांधुन टाकलं आणि मग एकदम तिच्यावर अंगावर झोपला.    वनिताला लठ्ठ मुकादमाला स्वत:पासुन दुर करता येईना. त्याच्या वजनाने तिला घुसमटायला लागलं होतं. मुकदामने मग तिचे दोन्ही हातही आधीच त्याच्या हातात असलेल्या सुतळीने बांधायला घेतले.


तिला मदतीसाठी आवजही देता येत नव्हता, तसेच  दोन्ही हात घट्ट बांधाल्यामुळे तिच्या मुलांना जागंही करता येत नव्हतं.


मुकादम आता तिच्या अंगाशी झोंबु लागला इतक्यात वनिताला क्षणभरासाठी अजुन वजन जाणवलं आणि तिने पाहिलं तर मुकादम तिच्या अंगावरून फरफटत बाहेर जाताना दिसला.


तिला समजलं की नरभक्षी वाघाने मुकादमला पकडलंय.ती कशीतरी सरपटत चुलीजवळ गेली आणि विळीने स्वत:ला सोडवलं. दोन क्षण वनिताला वाटलं की मदतीसाठी ओरडुन मुकादमला वाचवावं. मुकदमला वाघाने तोंडातूनच पकडलं होतं आणि त्याच्या नरडीला नखं मारलं होतं.त्यामुळे आता मुकदमाला स्वत:च्या मदतीसाठी आवाजच उरला नव्हता.


वनिता मदत मागण्यासाठी म्हणुन धावत बाहेर आली आणि विझलेली मशाल पाहुन वाघाला मुकदमला फरफटत नेताना पाहुनही गप्प राहीली आणि पदराने घाम पुसत स्वतःच्या मनात म्हणाली.."बये आज तुझा काळ आला होता पण वेळ नाही."


समाप्त

©वृषाली गुडे

जिल्हा - मुंबई