Login

सावली कोणाची? (भाग:-१)

अदृश्य सावली मागे लागलेल्या शांतनूची कथा
जलद लेखन स्पर्धा - २०२५

विषय :- झपाटलेला

शीर्षक:- सावली कोणाची?

भाग:- १

जानेवारी महिना होता. वातावरणात चांगलाच गारठा जाणवत होता. खिडकीतून गार वारा येऊ लागला. त्यामुळे लॅपटॉपमध्ये काम करणाऱ्या शांतनूला हुडहुडी भरू लागली. तो स्वतःच्या दोन्ही दंडावर हात घासत पुटपुटला, " या वर्षी थंडी खूप आहे. खिडकी बंद करतो म्हणजे गारवा जरा कमी जाणवेल."

खिडकी बंद करून तो पुन्हा काम करू लागला. तो एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर होता. त्याची वयाची तिशी ओलांडली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला तो एकुलता मुलगा होता. वडील अरूण निवृत्त सरकारी कर्मचारी तर आई पद्मा गृहिणी होती. तो दिसायला ठीकठाक होता. शांत स्वभाव,‌ अभ्यासू, मेहनती पण कमी बोलणारा आणि तो अंधश्रद्धा न मानणारा होता.

काम करता करता कधी रात्रीचे दीड वाजले ते त्याच त्याला कळले नाही. भिंतीवरील घड्याळ्याकडे त्याचे लक्ष गेले तेव्हा त्याने हाताची बोटे एकमेकांत गुंफून कडकड करत मोडली आणि आखडलेली पाठही आळोखेपिळोखे देत मोडली. त्याला डायरी लिहायची सवय होती. रोजच्याप्रमाणे त्याने डायरी लिहिली. सगळं जागेवर ठेवून लाईट बंद करून तो झोपायला बेडवरती आडवा झाला.

त्याच्या रूममध्ये खिडकीच्या काचेतून मंद प्रकाश येत होता. पण आता झोपायचे म्हटल्यावर त्याला भीती वाटू लागली. कारण लहानपणापासूनच झोपल्यावर त्याला भयंकर भीतीदायक स्वप्न पडत होती. जसजसे तो मोठा होत गेला त्या स्वप्नांनी अजूनच उग्र रूप धारण केले होते.

त्या रात्रीही नेहमीप्रमाणे दोनच्या सुमारास झोपला. दिवसभरच्या थकल्यामुळे त्याला पडल्या पडल्या लगेच झोप लागली. परंतु मध्यरात्री तीन साडेतीनच्या दरम्यान तो झोपेतून जागा झाला.‌ त्याचे डोळे सताड उघडे झाले.‌ छतावरील पंखा गोल गोल फिरत होता. खिडकीतल्या काचेतून बाहेरचा दिव्याच्या प्रकाश डोकावत होता. सगळं काही ठीक होतं पण त्याचं शरीर मात्र सुन्न पडले होते. त्याला ना हालचाल करता येत होतं ना ओरडता येत होते.

रूमच्या कोपऱ्यात कोणती तरी काळी आकृती त्याच्या डोळ्यांसमोर उभी आहे. ती अस्पष्ट, पुसट अशी आकृती मोठी होत हवेत तरंगत असली तरी त्या अंधारात ती कैद झाली असे त्याला वाटले.

खूप उशीरानंतर प्रयत्न करून तो उठून बसला.‌ पूर्ण रूमभर त्याने नजर भिरभिरत पाहिले. अंधुक प्रकाशाशिवाय त्याला काहीच दिसले नाही. आता त्याची झोप पूर्णपणे मोडली. त्याने उठून लाईटचे बटण दाबले. लाईटच्या उजेडात पुन्हा त्याने रूमभर नजर फिरवली तेव्हाही त्याला त्या रूममध्ये काहीच दिसले नाही.

"बहुतेक मला ते वाईट स्वप्न पडलं असेल. कदाचित खूप थकव्यामुळे तसे झाले असेल. सकाळी उठल्यावर गुगलवर या सर्वांचा अर्थ शोधतो म्हणजे नेमकं काय ते कळेल." तो मनात विचार करत स्वतःलाच म्हणाला‌ आणि झोपी गेला.

क्रमशः

कसली स्वप्न पडत होती त्याला? काय असेल त्या स्वप्नांचे रहस्य? शांतनू विचार करतो तसे खरंच थकव्यामुळे त्याला तसे झाले असेल की आणखी काही? काय होईल पुढे?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all