Login

सावट लघुकथा

एका संसारावर गैरसमजामुळे सावट आले.
सावट

अमृता आणि ऋषीकेश एकाच काॅलेजमधे शिकत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. दोघांची कॉलेजच्या दिवसांपासूनच सुरू झालेली प्रेमकथा आता पाच वर्षांनी लग्नाच्या रेशीमगाठीत बांधल्या गेली. दोघेही खूप खुश होते.


त्यांचं नातं इतकं मजबूत होतं की, त्यांना असं वाटतं होतं की जगात काहीही झालं तरी ते दोघं कधीच एकमेकांपासून वेगळं होणार नाहीत. पण आयुष्य नेहमीच असं सोपं नसतं. किती तरी दिसणारे न दिसणारे खाच खळगे आपल्याला पार करावे लागतात. सध्या तरी प्रेमाच्या धुंदीत असलेल्या अमृता आणि ऋषीकेशला हे खाच खळगे जाणवले नाही.

****
अमृता रोजच्या कामांमध्ये गुंतली होती. तिचं करिअर अजूनच बहरत होतं. दुसरीकडे ऋषिकेशनेही स्वतःच्या व्यवसायात प्रगती करायला सुरुवात केली होती. दोघेही खूप व्यस्त होते, पण एकमेकांसाठी वेळ काढायचा ते मनापासून प्रयत्न करत होते.

एके दिवशी, अमृताला तिच्या ऑफिसमधील नवीन सहकारी, कबीर, जो तिच्या हाताखाली नियुक्त झाला होता. तो अमृताला खूप मदत करत असे.. कबीर आणि अमृतामध्ये कामावरून वारंवार बोलण्याचे प्रसंग वाढले होते. ऋषिकेशला हे थोडं खटकायला लागलं होतं कारण तो पाहत होता की, अमृताचे आणि कबीरचे अनेकवेळा फोनवर संभाषण होत होते.

*****
प्रेम कधी कधी खूप पझेसिव्ह होतं.ऋषीकेशचं तसं झालं होतं.

त्या दिवशी रात्रीच्या जेवणाच्या वेळी, ऋषिकेशचं मन कुठेतरी हरवलं होतं.

अमृताने ऋषीकेला शांत शांत बघून विचारलं,

"काय झालं, ऋषि? तू इतका शांत का आहेस?"

"काही नाही, बस असंच. तुझं ऑफिस कसं चाललंय?"

अमृताने हसत म्हटलं,


"छान चाललंय. नवीन प्रोजेक्ट खूप आव्हानात्मक आहे, त्यात कबीरची मला खूप मदत होते. आम्ही छान काम करत आहोत. काम करताना जे ट्युनिंग जुळायला हवं तसं छान. ट्युनिंग आमचं जुळलय."

ऋषिकेशचा चेहरा थोडा कठोर झाला. त्याने विचार न करता प्रश्न अमृताला विचारला.

"तू आजकाल कबीर बद्दल बऱ्याचदा बोलतेस. काही खास आहे का त्याच्यात?"

अमृताला हा प्रश्न अनपेक्षित होता. ती थोडी नाराज झाली.

: "ऋषि, तू हे काय विचारतो आहेस? तो फक्त माझा कलीग आहे. आम्ही प्रोजेक्टसंबंधीच बोलत असतो.”

“पण तुम्ही आजकाल खूप वेळ एकत्र घालवता. माझ्या मनात का नाही शंका निर्माण होणार?”

मृताने आश्चर्यचकित होऊन विचारलं,

"ऋषी तू माझ्यावर संशय घेतो आहेस का? तुला खरंच असं वाटतं?"


त्याच रात्री दोघांच्या मनात अस्वस्थता वाढली. ऋषिकेशच्या मनात संशयाचे विचार सतत येत होते. त्याच्या डोक्याने आता सारासार विचार करणं बंद केलं होतं.अमृताच्या मनात दुःख आणि राग होता की, ऋषिकेशला तिच्यावर विश्वास नाही का? ही गोष्ट तिला अपमानास्पद वाटते होती.

काही दिवसांनी, अमृताला फोनवर कबीरचा एक मेसेज आला होता.

"संध्याकाळी कॉफी घेण्यासाठी येशील का? काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे." कबीर

ऋषिकेशने हळूच अमृताचा फोन पाहिला आणि हा मेसेज वाचला. त्याचा राग अनावर झाला. त्याने न थांबता अमृताशी बोलण्याचा निर्णय घेतला.

ऋषिकेश रागाने अमृताला म्हणाला,

"मग, आता कबीर बरोबर कॉफी प्यायला जातेय?”

अमृताने आश्चर्यचकित होऊन विचारलं ,

“ कबीर बरोबर?”

ऋषीकेशने रागाने तिच्या समोर फोनवरचा मेसेज दाखवला.

"ऋषि, तू माझा फोन चेक केलास? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? कबीर माझा फक्त कलीगआहे तेही आम्ही एकाच प्रोजेक्ट वर काम करतो आहोत म्हणून.”
अमृताच्या स्वरात राग होता.


"मी काय करू? तुझं आणि त्याचं काय चाललंय हे समजत नाही का मला!"

अमृताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला हे सर्व खूप वेदनादायक होत होतं. ती जोरात बोलली.

"कबीर आणि माझ्यात काहीही नाही, ऋषि. तो फक्त माझा मित्र आहे. तू माझ्यावर संशय घेणं थांबव. आपण एकमेकांवर विश्वास ठेवलाच नाही, तर आपलं हे नातं कसं टिकेल? मला कधीच वाटलं नव्हतं की तू कधी असा माझ्यावर संशय घेशील.”

अमृता न जेवताच उठली आणि आपल्या खोलीत गेली. ऋषीकेशही जेवला नाही.त्याने रागाच्या भरात अमृताने केल्याला सगळा स्वयंपाक डस्टबीन मध्ये टाकला. रागाने त्याची एक भुवई उडत होती.


काही दिवसांनंतर, कबीरने त्याच्या या नवीन जॉबसाठी तिला धन्यवाद देत होता कारण कबीरचं प्रोफाईल आणि अनुभव बघून तिनेच कबीरच्या नावाला संम्मती दिली होती. अमृताने एरवी ही गोष्ट ऋषिकेशला सांगितली असती पण आता तिने मुद्दामच सांगण्याची टाळलं. ऋषीकेशचं मन अजूनही शांत नव्हतं.

एके दिवशी, कबीरने स्वतः ऋषिकेशची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्याने ऋषिकेशला भेटून सर्व गोष्ट स्पष्ट करायच्या ठरवलं. त्याच्यामुळे अमृता आणि ऋषीकेश यांच्यात भांडणं नको व्हायला असं त्याला वाटलं.

ऋषीकेश महत्प्रयासाने कबीरला भेटायला तयार झाला.

***

त्या दिवशी कबीर आणि ऋषीकेश काॅफीशाॅपमधे भेटले.


कबीर हसत म्हणाला ,

"तू खूप नशिबवान आहेस ऋषिकेश. अमृतासारखी जबाबदार आणि विश्वासू व्यक्ती तुला लाईफ पार्टनर म्हणून मिळाली आहे. माझं तिच्याशी फक्त कामाचं नातं आहे. माझ्या मुळे तुमच्यात भांडणं होतात आहे हे ऐकून मला वाईट वाटलं. आता मी दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न केला. पुढच्या महिन्यात नवीन कंपनी जाॅईन करतोय."

ऋषीकेश आश्चर्यचकीत झाला. तो काहीच बोलू शकला नाही.

“ ऋषीकेश आत्ताच हा संशयाचा वळवळणारा किडा काढून फेकून दे. एकाच प्रोजेक्ट वर काम करताना अशी मैत्री होते पण ती फक्त एक कलीगग म्हणून मैत्री होतं असते. त्याचा भलता अर्थ काढू नको.मला वाटतं तुझ्या मनातलं किल्मीष आता दूर झालं असेल.”

कबीर एवढं बोलून निघून गेला.

ऋषिकेशला आपली चूक समजली. त्याने लगेचच अमृताशी माफी मागण्याचा निर्णय घेतला.

ऋषिकेश अश्रू भरल्या डोळ्यांन फोनवर म्हणाला ,

"अमृता, मी खूप मोठी चूक केली. माझा संशय फक्त एक गैरसमज होता. मला माफ करशील का?"

अमृता शांतपणे म्हणाली,


"ऋषि, नात्यात विश्वास असायला हवा. मी तुला माफ करते, पण आपण यापुढे असं कधीच होऊ द्यायचं नाही."


ऋषिकेशने आणि अमृताने एकमेकांवर विश्वास ठेवण्याचं वचन दिलं. गैरसमज दूर झाले, आणि त्यांच्या नात्याला पुन्हा नवीन उमेद मिळाली. त्यांचं प्रेम आता अधिक घट्ट झालं होतं.

संसारात अनेकदा संशय निर्माण होतात.त्याचं निराकरण योग्य पद्धतीने केलं तर संसार विखुरण्या पासून वाचवू शकतो.

___________________________________
लेखिका – मीनाक्षी वैद्य