सायलीची फुले भाग चौथा (अंतिम)

एका तरल प्रेमाची गोष्ट
सायलीची फुले. भाग ४ (अंतिम)

मागील भागात आपण पाहिले दिवाकरने अजूनही कमलचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला नाही. गोदावरीला ही गोष्ट समजते. आता पाहूया पुढे.


"मालूऽऽ मालूऽऽ आहेस का घरात?" गोदावरीने बाहेरूनच आवाज दिला.


"गोदावरी आत ये ना." राधाबाई तिला आवाज देऊ लागल्या.


"नको मावशी, देवळात जायचे होते. सोबत मालूस न्यायचे आहे." गोदावरी बाहेरूनच म्हणाली.

मालू आणि गोदावरी दोघी देवळात जायला निघाल्या.


"मालू, वहिनी कशी वाटली?” गोदावरी म्हणाली.


"वहिनी छानच आहे; पण तू माझी वहिनी असलेली जास्त आवडले असते मला." मालू पटकन बोलून गेली.


"मालू, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते. आता माझे एक काम करशील?” गोदावरी हळूच म्हणाली.


"हो, काय काम आहे?" मालूने विचारले.


"उद्या शुक्रवार आहे. तू तुझ्या दादाला घेऊन पहाटे देवीच्या देवळात येशील? दोघेच या.” गोदावरी म्हणाली.


"बरं. पण घरी काय सांगू?" मालन विचारात पडली.


"मालू जमेल ना तुला? माझ्यासाठी एवढे करशील?" गोदावरी हळवी झाली होती.


"बरं, मी जमवते काहीतरी." दोघीजणी काही वेळाने घरी आल्या.

________


"आई मला काल रात्री स्वप्न पडले. देवी मला दर्शनाला बोलावत होती." रात्री जेवताना मालन म्हणाली.

"मालू त्याला दृष्टांत म्हणतात. उद्याच दर्शन घेऊन ओटी भर देवीची." यमुनाबाई म्हणाल्या.


"दादा तू येशील ना सोबत? " मालन म्हणाली.


"बरं, जाऊ आपण दोघे." दिवाकरने होकार भरला.


ठरल्याप्रमाणे हिरवे परकर पोलके घालून मालन तयार झाली. दिवाकर आणि मालन मंदिरात पोहोचले. देवीचा गाभारा सायलीच्या मंद सुवासाने दरवळत होता. दिवाकर बाहेरच थांबला.

"दादा चल ना आतमध्ये." मालन म्हणाली.

"नको. मी इथूनच नमस्कार करेल." दिवाकर रुक्ष आवाजात बोलला.


"दिवाकर प्रत्येकाला सायलीचे फुलच मिळेल असे नाही. प्रत्येक फुलाचा गंध वेगळा, सौंदर्य वेगळे. फक्त त्यावर मनापासून प्रेम करता यायला हवे." गोदावरी समोर आली.


"प्रेम असे ठरवून करता येते? माझे मन अजूनही त्या भातुकली आणि सायलीच्या फुलात अडकले आहे."
दिवाकर तिच्या जवळ गेला.


"दिवाकर, आता तुमच्या प्रेमावर कमलचा अधिकार आहे. तिला तुम्ही असे दूर ठेवून मला गुन्हेगार ठरवत आहात. एका स्त्रीला वैवाहिक सुख न मिळायला कारण असलेली मी मलाच नकोशी वाटत आहे." गोदावरी अश्रू आवरत बोलत होती.


"गोदावरी माझी बालसखी, प्रेयसी असे वैराण आयुष्य जगत असताना मी ते सुख उपभोगणार नाही. सायली तुझ्या केसात फुलणार नसेल तर माझ्या शेजेवर देखील दरवळणार नाही." दिवाकर निर्धार व्यक्त करत म्हणाला.


"दिवाकर तुम्ही देवा ब्राम्हणांच्या साक्षीने विवाह केला आहे. कमलचा स्वीकार केला आहे." गोदावरी शांतपणे म्हणाली.


"मी तिला आयुष्यभर सांभाळायला तयार आहे." दिवाकर म्हणाला.


"अशी? अपूर्ण?" गोदावरी आता दुखावली होती.


"समजा आज माझे सौभाग्य अखंड असते तरी तुम्ही हे केले असते?" दिवाकर गप्प बसला.


"म्हणजे आता कुठेतरी मी तुम्हाला प्राप्त होईल अशी शक्यता असल्याने तुम्ही थांबून आहात तर? मग ऐका, खरतर माझा निर्णय होत नव्हता. परंतु काल कमल माझ्याशी बोलली आणि माझा निर्णय घेणे मला सोपे झाले." गोदावरी निर्धाराने म्हणाली.


"कसला निर्णय? काय करणार आहेस तू?" दिवाकर घाबरला.


"घाबरु नका दिवाकर. मी काहीही बरेवाईट करून घेणार नाही. माझे नर्सिंग पूर्ण झाले. त्यानंतर मी पुण्यात ससून मध्ये कामाला लागले. तिथेच मला डॉक्टर अवधूत यांनी मागणी घातली. माझा भूतकाळ माहित असून देखील." गोदावरी आता दिवाकरकडे बघत होती.


"काय उत्तर दिलेस तू?" दिवाकर थोडा दुखावला.


"उत्तर कालपर्यंत नव्हते दिले; पण आज माझा होकार आहे." गोदावरी एकदम शांतपणे म्हणाली.


"काय? पण हाच पुढाकार मी घेईल म्हणून तू निघून गेली होतीस." दिवाकर चिडला होता.


"तेव्हाची गोदावरी खरच सायलीची नाजूक वेल होती. तिला उपटून शेजारी लावले असते तर लोकांनी नक्कीच तिला जगू दिले नसते. आता गोदावरी तशी नाही.


दिवाकर तुमच्या अंगणात असलेल्या अबोलीला बोलकी करा. एक सायलीची वेल तुमच्या अंगणात रुजलीच नाही असे समजा." गोदावरी एकेक शब्द शांतापूर्ण आवाजात बोलत होती.


"गोदावरी, तू माझी सखी असल्याचा अभिमान वाटतो मला. मालू चल आपल्याला निघायला हवे."


दिवाकर पुढे चालू लागले आणि गोदावरी हसून देवीला सायलीच्या फुलांचा हार घालून घरी आली.

_________


आज दिवसभर दिवाकर घरी नव्हता. कमल आपली कामे आवरून खोलीत येऊन बसली. बऱ्याच वेळाने दिवाकर आत आला. त्याने हळूच कोट अडकवला आणि कमलजवळ गेला.


"कमल, मला माफ करशील?" दिवाकर हात जोडून उभा होता.


"अहो, काय करताय हे?" कमल पटकन पुढे झाली.


"सुकलेली फुले जपायच्या नादात बहरलेला चाफा आसपास आहे हे मी विसरलो होतो."

असे म्हणून दिवाकरने आपल्या खिशातला सायलीच्या फुलांचा गजरा काढला आणि कमलच्या केसात माळला. आज सायली दोन्हीकडे दरवळत होती. गोदावरीच्या केसात आणि कमलच्या शेजेवर.


गोदावरी आज खऱ्या अर्थाने आनंदी होती. तिने डॉक्टर अवधूत यांना होकराचे पत्र पाठवले होते. तिने समोर कागद घेतला आणि सहज शब्द उमटले.


‘प्रीती अशी असावी,
मने आनंदे डोलावी.
जशी सख्याच्या दारी
सखी सायली फुलावी.’

-समाप्त-
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all