सायलीची फुले भाग दुसरा

एका तरल प्रेमाची गोष्ट
सायलीची फुले. भाग २


मागील भागात आपण पाहिले दिवाकर आणि गोदावरी एकमेकांना आवडत असूनही त्यांचे लग्न होऊ शकत नाही. त्यानंतर जवळपास वर्षभराने दिवाकर परत येतो. आता पाहूया पुढे.


"आई, माधव काकांकडे कोणी पाहुणी आलीय का?" दिवाकर हळूच म्हणाला.


"पाहुणी? नाही रे कोणीच नाही." राधाबाईंनी उत्तर दिले.

"मग कोणी आश्रित आहे का?" दिवाकर म्हणाला.

"दिवाकर, गोदावरी परत आली आहे. आलवण नेसून." हुंदका दाबत राधाबाई म्हणल्या.


दिवाकर काहीच न बोलता गप्प बसला. त्याने रात्री जेवण झाल्यावर शतपावली करायला बाहेर पडल्यावर सरळ माधव काकांच्या घराचा रस्ता धरला.


"माधव काका आहात का घरी?" बाहेरूनच दिवाकरने आवाज दिला.


"अगबाई दिवाकर? कधी आलास पुण्यावरून?" सुमन काकी बाहेर आली.


"आता थोड्या वेळापूर्वी आलोय काकू." दिवाकर शक्य तेवढे आत डोकावत होता.


परंतु नेमके माधवकाका घरी नसल्याने त्याला जास्त थांबता आले नाही. माजघरात दारा आडून गोदावरी दिवाकरकडे बघत होती. दिवाकर गेला आणि सुमनकाकू आत येताना बघून गोदावरी पटकन जायला निघाली.


"गोदे, पोरी विस्तवाशी खेळ नको. तुला वरून वाईटसाईट बोलते; पण पोटातील माया आटत नाही." सुमन पुढे होत म्हणाली तसे पदराचा बोळा तोंडात कोंबून गोदावरी हुंदका दाबून निघून गेली.


"मी काय म्हणते, गोदावरीस काही दिवस विमा वन्स घेऊन जातील तर बरे." घरी परतलेल्या माधवरावांना जेवताना तूप वाढताना सुमन म्हणाली.


"सुमन, दादाची पोर मला जड नाही." माधवराव चिडले.


"अहो गोदीस जन्म दिला नसला तरी लेकच आहे माझी. पण दिवाकर घरी आला होता. त्याची नजर संपूर्ण घरात फिरत होती. विझलेला विस्तव पुन्हा पेटू नये इतकेच." सुमन हळू आवाजात म्हणाली.


माधवराव हातावर पाणी घेऊन उठले.

दुसऱ्या दिवशी दिवाकर मुद्दाम सकाळी लवकर उठून मागच्या दारी जाऊन बसला. गोदावरी देवपुजेला फुले तोडायला आली.


"सांभाळून, काही फुले खूप उंच असतात." अचानक आवाज कानावर आला आणि गोदावरीच्या अंगावर काटा फुलला.


“सगळीच फुले काही देवाच्या गळ्यात असलेल्या हारात जात नाहीत. काहींच्या नशिबी निर्माल्य होणेच असते." गोदावरी बोलत मागे वळली तर तिच्या अगदी समीप दिवाकर उभा होता.

त्याचा कातीव पुरुषी देह, तिच्यावर रोखलेली नजर आणि मोगऱ्याचा धुंद सुवास! क्षणभर काळ थांबला होता. तितक्यात काहीतरी चाहूल लागली आणि गोदावरी पटकन आत निघून गेली.


माधवराव मात्र समोरचे दृश्य बघून आपल्या पत्नीचा इशारा समजले. परंतु प्रकरण नीट हाताळायला हवे होते. त्यांनी निरोप पाठवून केशवरावांना बोलावून घेतले.


"सुमन, केशव आलाय. जरा चहा मांड." आता सूचना देऊन माधवराव पुढे झाले.


"माधवा, काय काम काढलेस एवढे?" केशवराव हसत म्हणाले.


"अरे आता दिवाकर एवढा शिकून आलाय. लग्नाचे बघावयास हवे." माधवराव अंदाज घेऊ लागले.


"होय. तुझ्या पाहण्यात आहे का एखादी मुलगी?" केशवराव म्हणाले.


"म्हणून तर बोलावले तुला. सुमनच्या बहिणीची मुलगी कमल अगदी दिवाकर साठी शोभून दिसले.” माधवराव आपला विचार मांडत म्हणाले.


इकडे ही बोलणी चालू असताना गोदावरी परसात आंब्याला पाणी घालत होती.


"सायलीच्या वेलाने आंब्याला सोडले नाही तर किती छान बहरला आहे." गोदावरी विचार करत होती.


"मालू, सायलीची फुले घेऊन जा गजरा करायला."
तिने ओट्यात फुले तोडली आणि मालनला हाक मारली.


"नकोच मुळी. मला नाही आवडत सायली." मालन नाक उडवत बोलली.


"मालू, फुले योग्य हातांनी गुंफली तरच सुंदर दिसतात." दिवाकर मागून आला.


"जा बाबा, तुम्ही दोघे फारच कोड्यात बोलता." मालन रागाने निघून गेली.


"दिवाकर मला विसरून जा. तुम्हाला सायलीच्या फुलांची शपथ आहे." दिवाकर पटकन जवळ आला तसे गोदावरी डोळ्यात पाणी आणून बोलत होती.


"गोदा, काय केलेस हे? आजपासून पुन्हा कधीच सायलीच्या फुलांना हात लावणार नाही.” दिवाकर जाताना म्हणाला.


"आणि मी कधीच सायली माझ्यापासून दूर करणार नाही." गोदावरी काहीतरी निर्धार करत म्हणाली.


इकडे केशवराव आनंदाने घरी आले.

"राधाबाई ऐकलेत का? माधवने स्थळ सुचवले आहे दिवाकरसाठी." त्यांनी आल्या आल्याच विषय काढला.


"अगोबाई, कोण आहे मुलगी? खर तर आज गोदावरी ह्या घरची सून.." राधा नकळत बोलून गेली.


"नियती पुढे आपण काही करू शकत नाही राधा." केशवराव देखील क्षणभर स्तब्ध झाले.

______


"सुमन वहिनी आहेस का घरात?" बाहेरून विमलने आवाज दिला.

"अगोबाई, वन्स अशा अचानक?" सुमन पळतच भाकर तुकडा घेऊन आली.


विमल आत्या आल्याने गोदावरी आनंदी होती. पुण्याच्या एका प्रसिद्ध शाळेत विमल शिक्षिका होती.


"गोदावरी, आत्या आलीय. ये बघू बाहेर." गोदावरी समोर आली.


तिला ह्या रूपात पाहून आत्याला रडू कोसळले. संध्याकाळी जेवण झाल्यावर विमलने विषय काढला.


"दादा, गोदावरीची काहीतरी सोय लावायला हवी."


"विमल, आम्ही आहोतच की." माधवराव जरा चिडले.


"दादा चिडू नकोस. परंतु ती स्वतः च्या पायावर उभी राहिली तर तुमच्यानंतर देखील काळजी नसेल." विमल आत्या समजावत होती.


"वन्स तुमच्या मनात काय आहे?" सुमनने विचारले.


"वहिनी, गोदावरीस मी सोबत घेऊन जाते. तिला पुढे शिक्षण घेऊ देत." विमल आत्याने प्रस्ताव मांडला.


ह्याला माधवरावांनी मान्यता दिली.


"गोदावरी, इकडे ये." विमलने तिला बोलावले.


त्यांच्या तिघांनी ठरवले ते तिच्या कानावर घातले.


"आत्या,कधी निघायचे? मला सामानाची बांधाबांध करायला लागेल.." गोदावरी खाली मान घालून म्हणाली.


"उद्याच निघतोय आपण." विमल आत्याने सांगितले.


दुसऱ्या दिवशी गोदावरी राधा, मालू आणि इतर सगळ्यांना भेटून आली.

"मालन,ही एवढी पुडी दादाला देशील?" आपल्या डोळ्यात असलेले पाणी रोखत गोदावरी म्हणाली.


मालन मानेने हो म्हणाली आणि गोदावरी तिच्या हातात एक पुरचुंडी देऊन झटकन निघून गेली. मालनने हळूच उघडून पाहिले. आतमध्ये सुकलेली सायलीची फुले होती. दिवाकर दूर जाणाऱ्या गोदावरीस बघूनही काहीच करू शकत नव्हता. त्याने फक्त मालनने दिलेली पुरचुंडी गुपचूप घेतली आणि आपल्या ट्रँकेत खाली खोल ठेवून दिली.

गोदावरीचे पुढे काय होईल?
दिवाकर लग्न करेल?

वाचत रहा.. सायलीची फुले.
©® प्रशांत कुंजीर.

________

🎭 Series Post

View all