सायलीची फुले भाग पहिला

एका तरल प्रेमाची गोष्ट
सायलीची फुले. भाग १


"केशवा, अरे कुठे उलथली ही माली? कार्टी नुसती उंडारत असते गावभर." यमुनाबाई हातात छडी घेऊन मालतीला शोधत होत्या.


"माले, तू येत जाऊ नकोस बरे माझ्याकडे. आजीस आवडत नाही."


गोदा डोळे मोठे करून म्हणत असतानाच सपकन छडी मालीच्या पाठीवर उमटली आणि ‘आई गं!’ अशी किंचाळी फोडून मालू पळायला लागली. यमुनाबाईंनी तिला पकडले.


"ह्या अवदसेसोबत खेळू नकोस. किती वेळा सांगू तुस?" यमुनाबाई प्रचंड चिडल्या होत्या.


"आजी तिला नका मारू. पुन्हा नाही येणार ती इथे."
गोदावरीने आजीचे पाय धरले मात्र आजीने तिला पायाने लाथडले.


"खबरदार, पुन्हा तिकडे पाऊल ठेवलेस तर. त्या पांढऱ्या पायाच्या गोदीची सावली तुझ्यावर पडायला नको." मालनला घेऊन घरी परतलेल्या यमुनाबाई चिडून बोलत होत्या.


मालन आता तिच्या आई बाबांची वाट बघत बसून राहिली. तिचा थोरला भाऊ दिवाकर पुण्याला शिकत होता. त्याला बंदरावर आणायला केशवराव आणि त्यांची बायको राधा गेले होते.


"अहो, दिसतेय का बोट?" राधाबाई म्हणाल्या आणि केशवराव हसत सुटले.

"राधा काय हे लहान मुलासारखे? शंभर वेळा विचारला आहेस तू हा प्रश्न?" केशवराव हसले.


"तुम्हास आईची माया नाही हो कळणार." राधा लटक्या रागाने म्हणाली.


तेवढ्यात बोट आली. पाच वर्षे दिवाकर पुण्याला होता. अगदी राजबिंडा आणि उंचापुरा झालेला आपला लेक बघून राधा रडायला लागली.


"चला, घरी आई वाट बघत असेल." केशवराव म्हणाले.
सगळेजण गाडीत बसले.


"आई, माधव काकांच्या दारात सायलीची फुलं पडतात का अजून?" दिवाकर सहज म्हणाला.

"दिवाकर, गेल्या वर्षात खूप काही बदलले आहे हो. आपण आधी घरी जाऊ." सगळेजण घरी निघाले.


गोदावरी दाराआडून बघायचा प्रयत्न करत होती.


"गोदे, परसदारी भांड्यांचा ढीग पडलाय तो घासुन घे. नवऱ्यास खाल्लेस आणि आई बापाला तर लहानपणीच गिळलेस." आतून काकूंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.


गोदावरी हळूच मागच्या दारी आली. तिने आपल्या पदराला घट्ट लपेटून घेतले आणि भांडी घासू लागली.


"दिवाकर दादा. किती वाट बघत होते तुझी. पुण्याहून माझ्यासाठी काय आणलेस?" मालन त्याच्याजवळ जात म्हणाली.


"माले, पुरुष माणसांच्या असे जवळ जायचे नाही." यमुनाबाई तिला खसकन मागे ओढत म्हणाल्या.


"दिवाकरा, केवढा वाढलास रे. " यमुनाबाई नातू पाहून आनंदी झाल्या.


"राधे, मीठ मोहरी आण, दृष्ट काढते इथेच." पडत्या फळाची आज्ञा मानून राधा आत गेली.


दिवाकरची नजर मात्र काहीतरी शोधत होती. दिवाकर पायावर पाणी घ्यायला मागच्या दारी गेला. पलीकडे माधव जोश्यांचे अंगण होते. सायलीचा वेल फुलांनी लगडला होता. एक अलवण नेसलेली मुलगी पाठमोरी बसलेली त्याने पाहीले. घरात डोकावता येते का ह्याचा अंदाज घेणार तितक्यात आजी आली आणि दिवाकर पायावर पाणी घेऊन आत पळाला.


गोदावरी हळूच मागे पाहून भांडी घेऊन आत गेली. दिवाकर आल्याची चाहूल तिला लागली होती. परंतु आता ती दिवाकर सोबत बोलू शकत नव्हती. जाताना तिने हळूवार सायलीच्या वेलीवर हात फिरवला आणि दाटलेला हुंदका दाबला.


"मालू, इकडे ये. तुझ्यासाठी पुस्तकं आणलीत मी." दिवाकरने आवाज दिला.


"अय्या! पुस्तकं? माझ्यासाठी?" आपले भोकरासारखे डोळे मोठे करत मालती म्हणाली.


"हो, तुझ्यासाठी. पण माझे एक काम करावे लागेल. करशील?" दिवाकर इकडे तिकडे बघत म्हणाला.


"गोदावरी सोबत बोलायचे आहे ना दादा?" मालन अगदी हळू आवाजात म्हणाली.


"एवढी घाबरलीस का?" दिवाकर म्हणाला.


"मी गोदावरी बरोबर बोलते म्हणून आजीने मला मारले. तुलाही मारेल आजी." आपल्या हातावर असलेले वळ दाखवत मालन म्हणाली.


पुस्तके घेऊन मालन गेली. दिवाकरला मागील वर्षी सुट्टीला आला त्याची आठवण झाली. सकाळी सकाळी उघड्या अंगाने सूर्य नमस्कार घालत असलेला दिवाकर अचानक पैंजणांचा आवाज आल्याने थांबला.


माधव काकांची गोदावरी एक उंचावर असणारे जास्वंदीच्या फांदीवर असणारे फुल काढत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि पटकन दिवाकर पुढे झाला. त्याने गोदाला कवेत घेतले. तिने कंबरेला खोचलेला ओचा सुटला आणि सायलीची फुले दोघांच्या अंगावर सांडली. नुकतेच बारावे लागलेली गोदावरी लाजली.


"दिवाकर दूर व्हा. कोणी बघितले तर?" घाबरून गोदावरी दूर झाली.


"गोदावरी थांब, फुले तरी घेऊन जा." पण दिवाकरचे ऐकायला गोदावरी तिकडे नव्हतीच.


ती घरात पळून आली होती. अजूनही तिचा उर धपापत होता. दिवाकरचा उष्ण श्वास तिला कानाजवळ जाणवत होता.


"गोदा भानावर ये. तुझे लग्न ठरले आहे. सायलीची फुले क्षणभर सुगंध देतील पण नंतर काय?" गोदावरी स्वतःशीच बोलली.


दिवाकर आताही तो प्रसंग आठवून गालात हसला; पण त्याचवेळी गोदावरीचे लग्न झाले असल्याचे आठवून तो उदास झाला. त्याने हळूच पुस्तक उघडले. त्यात जपून ठेवली सायलीची फुले वाळून गेली होती.


आपली प्रिती बोलून दाखवायची संधीच नशिबाने दिवाकरला दिली नव्हती. केतकी रंगाची, चाफेकळी नाक, टपोरे डोळे आणि दाट काळे केस असणारी गोदावरी दिवाकरला लहानणापासूनच आवडत असे. भातुकली खेळताना गोदावरीच बायको हवी तरच मी खेळणार असा हट्ट दिवाकर धरत असे. केशवराव आणि माधव दोघे हसत असत.


त्यांनाही हा जोडा पसंत होता. राधा देखील गोदावरी आपली सून असणार असे गृहीत धरून चालली होती. परंतु नियती काहीतरी वेगळे ठरवत होती. एक दिवस माधवरावांची मावस बहीण रमाबाई घरी आल्या काय त्यांनी गोदावरीस मागणी घातली काय आणि माधवरावांच्या वडिलांनी होकार दिला काय. सगळेच वेगाने घडले.


भावाची पोर त्याच्या मागे माधव आणि सुमन दोघांनी वाढवली होती. आपल्याला न विचारता घेतलेला निर्णय सुमनला आवडला नाही. त्यात रमाबाईचा मुलगा चांगल्या वळणाचा नव्हता.


सुमनने विरोध करताच रमाबाई म्हणाल्या," तू काही तिची आई नव्हेस वहिनी."


तेव्हापासून सुमन गोदावरी पासून दूर झाली. दिवाकर तडका फडकी पुण्याला परत निघून गेला. आज वर्षभराने तो परत आला होता.

गोदावरीचे पुढे काय होईल? दिवाकर त्याचे प्रेम विसरेल का?
वाचत रहा..सायलीची फुले.
©®प्रशांत कुंजीर.

_______

🎭 Series Post

View all