सायलीची फुले भाग तिसरा

एका तरल प्रेमाची गोष्ट
सायलीची फुले. भाग ३

मागील भागात आपण पाहिले गोदावरी पुण्याला निघून जाते. केशवराव दिवाकरचे लग्न ठरवतात. आता पाहूया पुढे.


“शुभमंगल सावधान!”

अखेरची मंगलाष्टक संपली आणि अंतरपाट दूर झाला. समोर कमल उभी होती. दिवाकर मात्र तिच्याकडे तटस्थ नजरेने बघत होता. त्याने कमलच्या गळ्यात हार घातला आणि विधी पूर्ण झाले.


कमल सासरी आली. देवाचे सगळे झाल्यावर कमल आणि दिवाकर मुंबईला जायला निघाले. तेरा चौदा वर्षांची कमल आणि अठरा एकोणीस वर्षांचा दिवाकर.


"दिवाकर, कमल लहान आहे. तीस समजून घे. एकमेकांना आधार देऊन संसार करा." राधाबाई त्याला समजावत होत्या.


दिवाकर फक्त मान डोलवत होता. बोटीतून प्रवास सुरू झाला.


"मुंबई खूप मोठी असेल ना?" कमल उत्साहाने म्हणाली.


दिवाकर फक्त हुंकार देऊन बोलत होता. कमल एकटीच बडबड करत असताना दिवाकर मात्र शांत होता. जणूकाही तो कुठेतरी हरवला होता.


मुंबई बघूनच कमलने आनंदाने गिरकी घेतली. फक्त ऐकलेली आगगाडी प्रत्यक्ष दिसली होती. घोडागाडी, ट्राम असे सगळे काही नवलाईचे होते.


"अहो, आपले घर कुठेय?" कमलने विचारले.


"मुंबईत खोली असते घर नाही." दिवाकरने रुक्ष उत्तर दिले.


कमल चाळीत आली आणि लवकरच सगळी कामे सफाईने करू लागली. तरीही दिवाकर दूर राहायचा हे तिला खटकत होते. तिची मैत्रीण सगुणा किती गंमती सांगत होती. पण त्यातील काहीच होताना दिसत नव्हते. दिवाकर फक्त शरीराने तिच्यासोबत होता. मन मात्र दुसरीकडेच होते त्याचे.


एक दिवस कमल खाली गेली असता तिला सायलीची फुले दिसली. ती आनंदाने नाचत फुले घेऊन आली. मस्त गजरा विणला आणि संध्याकाळी दिवाकर यायच्या वेळी ती केसात गजरा माळून छान तयार होऊन वाट बघत होती. दिवाकर घरी आला. कोट खुंटीला अडकवून तो मागे वळला आणि त्याने हाक मारली.


"कमल, इकडे ये."


"थांबा चहा मांडते." कमल लाजून म्हणाली.


"कमल, पुन्हा सायलीची फुले दिसली तर तुझा माझा आहे तेवढा संबंध देखील संपला."


दिवाकर रागाने बाहेर निघून गेला. कमलने केसातला गजरा काढला आणि गुपचूप तो केरात टाकून दिला. दिवस वाऱ्याचा वेग घेऊन पळत होते. जवळपास वर्षभराने दिवाकर आणि कमल गावी जायला निघाले. कमलने सगळ्यांसाठी जे जमेल ते सगळे घेतले. बोट, एस टी आणि बैलगाडी असा प्रवास करून दिवाकर आणि कमल गावी पोहोचले.


"सूनबाई थांबा, दुष्ट काढते." तुकडा घेऊन राधाबाई बाहेर आल्या.


आपला लेक अन् सुनेला बघून त्यांना प्रचंड आनंद झाला होता. मालू देखील ‘वहिनी, वहिनी’ करत भोवताली नाचत होती.


सगळे छान दिसत असले तरी राधाबाईंच्या अनुभवी नजरेतून काही गोष्टी सुटल्या नव्हत्या. तांब्या भरून पाणी देताना कमलने दिवाकरला आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घेतली होती. खरेतर ह्या नव्या दिवसात ह्याच संधी जोडपी शोधत असतात. परंतु आपली सून तेच टाळत असल्याचे त्यांनी एका स्त्रीच्या नजरेतून जाणले होते.


"कमल, पोळ्या लाटायला घेऊया." राधाबाई तिला जवळ बसवत म्हणाल्या.


"राधे, हो बाजूला इतके लाड नकोत बरे. आता नातवाचे तोंड दाखवा म्हणावे." आजेसासुबाई म्हणाल्या.


त्या असे म्हणताच कमलच्या डोळ्यात आलेले पाणी तिने लपवले. रात्रीची जेवणे आटोपली आणि कमल भांडी घासायला बसली. राधाबाई ह्याच संधीची वाट बघत होत्या.


"कमल, दिवाकर जपतो ना तुला?" त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवून विचारले.


"हो. फिरायला नेतात, खर्चाला पैसे देतात, रागावत नाहीत." कमल खाली मान घालून बोलत होती.


"कमल, माझ्याकडे बघ. मुलगी नवऱ्यासोबत वेळ घालवते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळे तेज असते. तुमच्यात सारे ठीक आहे ना?" राधाबाई खोदून विचारत होत्या.


"हो, सारे ठीक आहे." कमल मोजकेच उत्तर देत होती.


कारण गेले वर्षभर ती फक्त दिवाकर सोबत एका छताखाली रहात होती. ते खऱ्या अर्थाने नवरा बायको झालेच नव्हते अजूनही. फक्त हे रहस्य कोणालाच समजू नये याची काळजी कमल घेत होती.


दिवाकर मागच्या परसदारी जाऊन बसला होता. माधवकाका आणि त्यांच्या परसात दोन्हीकडे सायलीचा वेल फोफावला होता. त्यावर फुललेला फुलांचा मंद सुवास सगळीकडे दरवळत होता.


त्यामागून पैंजण वाजल्याचा तो आवाज आणि नंतर त्याच्या कवेत असलेली गोदावरी, तिचे काळेभोर डोळे, धडधड करणारे हृदय वाढलेले श्वास सगळे काही अवती भवती जाणवत होते. त्याने हळूच सायलीची फुले गोळा केली आणि आत निघून आला.


थोड्या वेळाने कमल आत आली. दिवाकर झोपून गेला होता. झालेल्या प्रवासाने कमलदेखील दमली होती. लवकरच तिला गाढ झोप लागली.


दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाकर देवळात गेला. कमल अंघोळ आटोपून बाहेर आली. तिने खोली आवरून बाहेर जाऊ असे ठरवले. दिवाकर वाचत असलेले पुस्तक कमलने उचलले आणि त्यातून सुकलेली सायलीची फुले बाहेर पडली.


एकेक फुल हलक्या हाताने वेचून तिने पुस्तक पुन्हा नीट ठेवून दिले.


“कमल, मावशीकडे जाऊन ये. गोदावरी आली आहे चार पाच दिवसांपूर्वी." सकाळची कामे आटोपल्यावर राधाबाई तिला म्हणाल्या.


कमल नीटनेटके पातळ नेसून मावशीकडे गेली.

"अगोबाई, कमल? कधी आलीस?" सुमन आनंदाने तिला जवळ घेत म्हणाली.

"कालच आलो. यांना सुट्टी आहे महिनाभर." कमल लाजून म्हणाली.

"बरं. तू आत गोदावरी जवळ बैस, मी आलेच खायला घेऊन." सुमन तिला आत घेऊन गेली.


पुण्यातील शिक्षण गोदावरीस आत्मविश्वास आणि विचार दोन्ही देऊन गेले होते.


"कमल, कशी आहेस?" असे म्हणताच कमलच्या डोळ्यात पाणी जमा झाले.


"गोदावरी ताई, बाईचा नवरा तिचा झालाच नाही तर ती बाहेरून सुखी असते." कमलने उत्तर दिले.


"कमल, होईल सगळे नीट. माझ्याकडे बघ. आज मी स्वतः च्या पायावर उभी आहे. तुझेही आयुष्य लवकरच फुलेल."


गोदावरी तिला हळूवार समजावत होती. थोडावेळ मावशीकडे घालवून कमल परत गेली. गोदावरी मात्र अस्वस्थ झाली होती. तिने वाचत असलेले पुस्तक मिटले आणि एक पत्र लिहायला घेतले.


काय करेल गोदावरी? दिवाकर आणि कमल यांचे नाते फुलेल का?

वाचा अंतिम भागात.

©®प्रशांत कुंजीर.
________

🎭 Series Post

View all