डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 13)
काही वेळातच शर्वरी दिलेल्या पत्त्यावर पोहोचली होती..
समोर दिसणारा तो आलिशान बंगला ती काही वेळ बघतच राहिली.. मनात भरावा असा बंगला होता तो..
नंतर तिने सेक्युरिटी गार्डला स्वतःची माहिती दिली आणि त्याने आत मध्ये कॉल करून कन्फर्म केल्यावर तिला घरात जाण्याची परवानगी दिली...
त्या गेट पासून आतपर्यंत चालत जाताना देखील ती बंगल्याचचं निरीक्षण करत होती.. एका बाजूला खूप सुंदर असं लाॅन दिसत होतं.. तिथे एका कोपऱ्यात छोटासा धबधबा देखील बनवला होता.. सुंदर असा गार्डनिंग केलं होतं.. दूरवर कोपऱ्यात कोणीतरी काम करताना दिसलं तिला पण माळी असेल म्हणून दुर्लक्ष केलं तिने..
'किती छान घर आहे...! बरीच श्रीमंत पार्टी दिसते..
म्हणून फक्त मुलाला सांभाळायला देखील बरंच पेमेंट द्यायला तयार आहेत ते.. हा जॉब मिळाला तर बरं होईल...'
विचार करत करत ती मुख्य दरवाजातून आत मध्ये गेली..
डबल हाईट असलेला तो हाॅलही खूप सुंदर होता.. बऱ्याच अँटिक वस्तूही दिसल्या तिला.. काम करायला स्टाफ ही होता...
तिथे काम करणारे एका स्त्रीने तिला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि आत मध्ये निघून गेली.
थोड्याशा बिचकलेल्या अवस्थेतच शर्वरी सोफ्यावर बसली.. पण तिथलं अति सोफेस्टिकेटेड वातावरण बघून थोडं दडपण आलं होतं तिला..
गार्डनिंगचं काम संभवला खूप आवडायचं.. आज रविवार होता.. त्यामुळे संभव बाहेर गार्डनिंगचं काम करत होता... तो शक्यतो रविवार फ्री ठेवायचा कारण त्याला आरवला वेळ द्यायचा असायचा.. आरवला तो बऱ्याचदा गार्डनिंग शिकवायचा प्रयत्न करायचा.. पण आरव खूपच हट्टी झाला होता.. स्क्रीन सोडून दुसर काही करायला तयार नसायचा तो..
केअरटेकरच्या जॉब साठी एक स्त्री भेटायला येणार आहे याची कल्पना विनयने त्याला दिली होती.. त्यामुळे आता तो रेडी व्हायला जाणारच होता की, तितक्यात शर्वरी आली होती..
संभव अगदीच लॉनच्या एका कोपऱ्यामध्ये काम करत होता त्यामुळे दुरून त्याला चेहरा नीट दिसला नव्हता पण कोणीतरी स्त्री आली आहे एवढं ओळखलं त्याने... कारण शर्वरीला आतमध्ये जाताना बघितलं होतं त्याने..
आता आपण वेळ दिलेली स्त्री आली आहे म्हटल्यानंतर तो पटकन उठून मागच्या दाराने त्याच्या रूम कडे निघून गेला होता..
सरलाने आत मध्ये फोन करून संजीवनी ताईंना कळवलं होतं.. त्यामुळे त्या काठीच्या आधाराने हळूहळू चालत हॉलमध्ये आल्या.. आणि त्यांच्या येण्याची चाहूल लागल्यानंतर शर्वरी उठून उभी राहिली.
"नमस्ते .." शर्वरी त्यांच्यासमोर हात जोडत अदबीने म्हणाली.
"बस बस...!!"
त्या त्यांच्या नेहमीच्या त्या मोठ्या खुर्चीत बसत तिला म्हणाल्या.. पण शर्वरी कडे बघून त्यांना तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं.. कुठे हे मात्र नक्की समजेना त्यांना..
आधीच्या केअर टेकर पेक्षा वयाने ती बरीच लहान होती.. हे काम जमेल की नाही अशी किंचित शंका आली त्यांच्या मनात...
"नाव काय तुझ..??"
"शर्वरी दीक्षित.."
हे नाव ऐकल्यानंतर मात्र त्यांच्या लक्षात आलं तिला कुठे बघितलं असेल...
"सरला जरा इकडे ये.." घाईने त्यांनी सरलाला हाक मारली.
"काय मॅडम..??"
"माझा मोबाईल रूममध्ये राहिला आहे तेवढा आण.."
शर्वरी तीच मुलगी आहे का हे बघायची उत्सुकता लागली होती आता संजीवनी ताईंना...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा