Login

सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 15)

Story Of Sambhav And Sharvari
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 15)


"अगं शर्वरी नाव आहे ना तुझं..??"


"हं.. हो.. हो.."


संजीवनी ताईंच्या प्रश्नाने संभव आणि शर्वरी दोघेही भानावर आले.. संभवने आईकडे बघितलं आणि शर्वरीने मान खाली घातली.


"बस..शर्वरी बेटा..!! वयोमानाप्रमाणे गोष्टी विसरायला होतात गं.. तू नाव सांगितलं पण खात्री करायला एकदा विचारलं मी..."


खरंतर संभव साठी पुन्हा एकदा नाव अधोरेखित केलं होतं संजीवनी ताईंनी तिचं... आणि खरंच त्याला तिचं नाव लक्षात नव्हतं..

पण आईचा शर्वरीसाठी बदललेला टोन संभवच्या लक्षात येत होता.. आणि हे सगळं प्रकरण आपल्याला चांगलंच महागात पडणार आहे ही धोक्याची घंटा वाजली त्याच्या डोक्यात.. कारण ज्या अर्थी आई एवढ्या प्रेमाने तिच्याशी बोलत आहे त्या अर्थी आईने तिला ओळखलं आहे हे समजलं त्याला..


'आई हिच्याशी एवढी गोड का बोलते आहे..?
आईला तर ही तशीही पसंत होती.. मग जसं विवाह मंडळा मध्ये सगळ्यांनी मिळून आम्हा दोघांची भेट घडवून आणली तसं आईने आत्ताही काहीतरी शक्कल लढवून हिला इथे बोलावलं असेल का..?
आणि ही ऑलरेडी दुसरीकडे जॉब करते आहे मग तिने तरी कशासाठी यावं बर इथे..'


संभवच्या डोक्यात तर वेगळेच विचार चालू होते.. प्रत्यक्षात तसं काही नव्हतं तरीही तर्क लावला होता त्याने..


'मी ही किती मूर्ख आहे.. कर्णिक व्हिला वाचूनही इथपर्यंत आले.. अगदी विषाची परीक्षा घेतल्यासारखंच केल आहे मी.. आणि हे तेच कर्णिक आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या आईंनाही माझं स्थळ मिळालं असेलच कदाचित.. कविता काकूने तेवढं काम बरोबर केलं असणार.. आणि या मॅडमनी मला ओळखलं असेल म्हणून मघापासून निरीक्षण करत होत्या का माझं..??
कधी एकदा इथून बाहेर पडते असं झालंय मला...'


शर्वरी ही मनोमन स्वतःला शिव्या घालत होती... एकंदरीत काय तर.. दोघांनाही अगदी विचित्र पेचामध्ये पडल्यासारखं झालं होतं एवढ नक्की..!!


"आधी कुठे जॉब करत होतीस तू शर्वरी..?"
तसं तर तिच्याबद्दलची सगळी माहिती वाचली होती तरीही उगीच विचारलं संजीवनी ताईंनी.


"ज्वेलरी शॉप मध्ये.."


"मग तो जॉब का सोडायचा आहे..??"


"तिथे अचानक पुण्याला ट्रान्सफर करण्यात आली माझी.. आणि मला तिकडे शिफ्ट होणं शक्य नाही.. म्हणून दुसरा जॉब शोधत होते मी.. तर माझ्या मैत्रिणीने तुमच्या केअरटेकर जॉबची जाहिरात मला पाठवली..."


"बरं.. बरं.. हरकत नाही.."


संभव शांतपणे दुसरीकडे बघत हे संभाषण ऐकत होता.. शर्वरीला जॉब न देण्यासाठी काय योग्य कारण देता येईल याचा विचार चालू होता त्याचा...


"संभव तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार तिला.."
संजीवनी ताईंनी आता बॉल त्याच्या कोर्ट मध्ये टाकून दिला...


"हं.. आधी जो जॉब करत होता त्यापेक्षा हे काम पूर्णपणे वेगळं आहे.. तरीही अशा जॉब साठी का आलात तुम्ही..??"


आता संभवच्या या प्रश्नाचा मात्र संजीवनी ताईंना राग आला.. काही का झालेला असेना पण शर्वरी इथे पर्यंत येऊन पोहोचली होती ना.. मग याने कशाला बरं असं विचारायचं.. असा विचार त्यांच्या मनात आला..

आधीच एक तर तो नकार कळव म्हणाला होता.. आता नशिबाने मुलगी स्वतःहून घरापर्यंत येऊन पोहोचली आहे तर तिला जाऊ द्यायचं नव्हतं संजीवनी ताईंना...


**********


लेखिका: अस्मिता कुलकर्णी

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all