Login

सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 6)

Story Of Sambhav And Sharvari
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 6)


शर्वरी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांमधील मुलगी होती. वडील प्रमोद दीक्षित हे एका बँकेमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करत होते.. तिची आई मनीषा या गृहिणी होत्या.. तरीही घरबसल्या काही ना काही उद्योग करून थोडेफार पैसे कमवायच्या...

भाऊ शौनक आणि वहिनी माधुरी दोघांचाही प्रायव्हेट जॉब होता... भाऊ तिच्या पेक्षा मोठा असला तरी त्याचं लग्न शर्वरी नंतर झालं होतं त्यामुळे त्याला अडीच वर्षाचा एक मुलगा होता.. वेदांग नावाचा.


घर जरी दुमजली असलं तरी आता जुनं झालं होतं.. अगदी पुढच्या काही वर्षात रीनोवेशनला येणार होतं इतकं जुनं घर होतं ते..

घरात खालच्या मजल्यावर हॉल, किचन आणि एक रूम होती.. आणि वरच्या मजल्यावर एक दादा- वहिनीची खोली आणि उरलेल्या जागेमध्ये छोट टेरेस होतं.. ती वरची खोली सुद्धा जेव्हा शौनकचं लग्न करायचा विचार चालू होता तेव्हा बांधून घेतली होती...


शर्वरी ठरल्याप्रमाणे भाजी आणि केक घेऊन घरी आली.
दोन्ही मुलं केकची वाट बघतच बसली होती.

बाकी वहिनीने तिच्या आईच्या वाढदिवसाची विशेष अशी काही तयारी केली नव्हती.. आणि अर्थात हे शर्वरीला अपेक्षित होतचं.. तिच्या आईची ही असली काही अपेक्षा नव्हती माधुरीकडून.. त्या होता होईल तेवढं सुने सोबत जमवून घेण्याचा प्रयत्न करत असायच्या..


पण माधुरी मात्र घरात वावरताना अगदी हातचं राखून वावरायची...शर्वरी आणि जुईची जबाबदारी कायमस्वरूपी आपल्यावर येते की काय असं वाटायचं माधुरीला... त्यामुळे ती स्वतः ही शर्वरीच्या दुसऱ्या लग्नासाठी प्रयत्न करत होतीचं..


इकडे कविता ताईंनी मात्र आपलं काम चोख बजावलं होतं.. शर्वरी बाहेर पडल्यानंतर जसा त्यांनी संजीवनी कर्णिकांना फोन केला होता तसाच फोन इकडे मनीषाताईंना ही केला होता...


त्यामुळे फक्त विवाह मंडळामध्ये जाऊन यावं.. एवढी शर्वरी कडून अपेक्षा करणाऱ्या मनीषा ताईंना तर आज वाढदिवसाची लॉटरी लागल्यासारखं वाटत होतं.. त्यात संभव कर्णिकांच्या स्थळाबद्दल ऐकून तर त्यांना अगदी आकाश ठेवणं झालं होतं.. कुठल्याही परिस्थितीत हे स्थळ आपल्या हातातून जाऊ नये असचं वाटत होतं त्यांना.
कधी एकदा सगळी निजानीज होते आणि शर्वरी सोबत बोलते असं झालं होतं त्यांना..

शेवटी एकदाचा त्यांचा छोटे खानी वाढदिवसाचा कार्यक्रम आणि जेवणं उरकली.. वेदांग, शौनक आणि माधुरी वरच्या खोलीमध्ये निघून गेले.. प्रमोद रावही कपडे बदलून बाहेरच्या हॉलमध्ये अंथरूण घालून झोपायची तयारी करत होते..


शर्वरी जुईला थोपटत होती.. आणि स्वतः मात्र भिंतीला डोकं टेकून डोळे बंद करून बसली होती. आजचा सुट्टीचा दिवस तर असाच संपला होता.. उद्यापासून पुन्हा रुटीन सुरू...
लोखंडी कपाटाचा आवाज आला.. आणि सोबतच बांगड्या किणकिणल्या.. तेव्हा आईचं आली असणार हे लक्षात आलं तिच्या..


"शर्वरी..!! झोपली ना जुई...?"
मनीषा ताई कपडे कपाटात ठेवून शर्वरी कडे वळत म्हणाल्या.


"हो..." शर्वरी डोळे बंद ठेवूनचं म्हणाली.


"बरं झालं... बोलायचं होतं मला तुझ्याशी...!!"


पण आईच्या या वाक्यावर मात्र अचानक तिला विवाह मंडळ आठवलं आणि सोबतच संभवही.. नक्कीच आईला त्या विषयावर बोलायचं असणार हे ओळखलं तिने.


******************


लेखिका: अस्मिता कुलकर्णी

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all