Login

सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 7)

Story Of Sambhav Sharvari
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 7)


मागील भागात:

"शर्वरी..!! झोपली ना जुई...?"
मनीषा ताई कपडे कपाटात ठेवून शर्वरी कडे वळत म्हणाल्या.


"हो..." शर्वरी डोळे बंद ठेवूनचं म्हणाली.


"बरं झालं... बोलायचं होतं मला तुझ्याशी...!!"


पण आईच्या या वाक्यावर मात्र अचानक तिला विवाह मंडळ आठवलं आणि सोबतच संभवही.. नक्कीच आईला त्या विषयावर बोलायचं असणार हे ओळखलं तिने.

आता पुढे:


"मला झोप आली आहे आई..उद्या बोलू..."

शर्वरी विषय टाळायचा प्रयत्न करत म्हणाली. आईकडे दुर्लक्ष करून तिने पांघरूण झटकलं.. आणि आडवी होत उशीवर डोकं टेकवलं...

पांघरूण अंगावर घेणार होती पण तोपर्यंत आईने पुढे येऊन ते पांघरूण बाजूला केलं... आणि शर्वरी शेजारी बसली.


"आई...अगं..?"


"उद्या बोलू वगैरे ही सगळी नाटकं आहेत फक्त आत्ताचा विषय टाळण्याची...
काय झालं आज विवाह मंडळात..." मनीषा ताई उत्साही आवाजात म्हणाल्या.


"तू जे ठरवून मला तिथे पाठवलं होतं तसंच झालं.."


"मी काय ठरवून पाठवलं होतं..??
फक्त एकदा कविताला भेटून घे.. एवढचं तर म्हणणं होतं माझं..."


"काही सांगू नकोस तू मला..!! खोट आहे हे..
ते संभव कर्णिक तिथे येणारं हे माहिती होतं तुला म्हणून इतकी मन धरणी केलीस माझी आणि आजचं मला विवाह मंडळात जायला भाग पाडलसं.." शर्वरी फुरंगटून म्हणाली.


"तुला काय समजायचं ते समज शर्वरी..!! पण मी खोटं बोलत नाहीये.. बरं ते सगळं जाऊ दे गं..
ते कर्णिक कसे वाटले तेवढं सांग.."


"आई ते चांगलेच आहेत.. म्हणजे पर्सनॅलिटी वरून तरी चांगले वाटले.. बाकी मला माहिती नाही...
पण उगीच माझ्यावर जबरदस्ती करू नका.. नाही करायचं मला दुसरं लग्न..!!"


"खूप शहाणी आहेस.. दुसरं लग्न करायचं नाही मग काय करायचं आहे तुला..?? कसं घालवणार आहेस पूर्ण आयुष्य..? आत्ताच घरात काय परिस्थिती आहे हे तुला कळतंय.. तुझी वहिनी फार काही पटवून घेईल असं वाटत नाही.. "


"आई काही वर्षात स्वतःच्या पायावर उभी राहीन मी.. म्हणजे सध्या कमावते आहे..पण मी आणि जुई दोघी आपलं आपण राहू इतपत स्वतंत्र होईन मी..
त्यानंतर हा प्रश्नच येणार नाही.."


"अगं बाई.. तुला वाटतं तसं नाहीये गं.. इतकं सोपं नाही हे सगळं.. फक्त दोघींनी आयुष्य काढणं फार अवघड आहे.."


"आणि मग दुसरं लग्न करणं सोपं वाटतंय का तुला आई..??"


"अगं बाई, नशिबाने हे कर्णिकांचं स्थळ चालून आलयं.. गर्भ श्रीमंत आहेत.. सगळं उत्तम आहे.. माणसंही चांगली आहेत.. कविताने सगळं सांगितलंय मला.. आता तू काहीतरी न्हाट लावू नकोस..
होकार दे आणि रिकामी हो.."


"सॉरी आई.. सध्या तरी माझा नकारचं आहे.. आणखी काही वर्षांनी बघू.." शर्वरी आडवी होत म्हणाली.


"आत्ताच 31 वर्षांची आहेस तू.. आता आणखी किती वर्षे थांबायचं... "


"गुड नाईट आई..!! उद्या मला जॉबला जायचं आहे..
तू ही झोप गं.. खूप काम असतं तुला... नको ते विचार करत बसू नको.. चांगलं चालू आहे आपलं.. लग्न करून कशाला पुन्हा आफत ओढवून घ्यायला लावते आहेस...?"


शर्वरी डोळे मिटून घेत म्हणाली आणि मनीषा ताईंना मात्र चिडल्यासारखं झालं.. इतके प्रयत्न करूनही शर्वरी काही लग्नासाठी तयार होत नव्हती.. पण कर्णिकांचं स्थळ त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं.. काही ना काही शक्कल तर लढवावी लागणार होती.


************


लेखिका: अस्मिता कुलकर्णी

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"