Login

सेरेनेडिंग माय हार्ट भाग ४

साखरपुड्या बरोबर लग्नाची देखील खरेदी करण्यास सर्वजण तयारीला लागले.
मागील भागात पाहिले की राजेशच्या घरातल्यांना सोनिया पसंत पडली होती. सोनियाला देखील राजेश आवडला होता. तशी‌ कबुली तिने नैना जवळ सांगितली होती. काकू - काका पुढच्या तयारीला लवकर येण्याकरता रजा घेत होते. आता पाहूया पुढे,

" बाबा पाहुण्यांना होकाराचे सांगून टाका." राहूल बाबांना सांगत होता.

" मुलगा तर शंभर नंबरी सोनं आहे. पण तरीही तिथे जवळपास राहाणा-या आपल्या नातेवाईकांना सांगून चौकशी करायला हवी. वेळ लागला तरी चालेलं होकार द्यायला. शेवटी मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे."

" तुमचे बोलणे पटत आहे बाबा मला. उगाच घाई करण्यात अर्थ नाही."

" म्हणून तर राहूल अश्या म्हणी बनवल्या जातात. 'अति घाई संकटात नेई.' तुला प्रत्येक गोष्टीची घाई असते." नैना राहूलला चिडवत बोलत होती.

" बर आता नको ती चर्चा. बाबा योग्य निर्णय घेतीलचं. नैना उद्या तुला निघायचे आहे. मी डाळाचे लाडू, चिवडा तुझ्याकरता बनवून ठेवला आहे. तो डबा आठवणीने बॅगेत भरुन ठेव."

" आत्ताच दे ताई माझ्याजवळ उगाच विसरला तर राहूलच्या हाती लागेल."

" हे काय ताई, म्हणजे माझ्या करता नाही बनवले का तू."

" मी कधी तुमच्या दोघांमध्ये फरक केला आहे का? हा डबा नैना करता आणि हा तुझ्यासाठी."

" बर चला मी आवरायला घेते. राहूल उद्या सातची गाडी आहे. मला सोडवायला येशील ना तू? एवढ्या सकाळी रीक्षावाला पण येत नाही."

" माझी झोप झाली तर येईल मी. रीक्षावाले सकाळी सहा वाजल्या पासूनच असतात. तुझ्यासारखे थोडीच आहे ते."

" तुला सोडवायला नसेल यायचे तर, नको येवूस. बाबांना घेवून जाईल मी. तसही तू माझ्याशी नीट जरी बोललास ना तरी बरं वाटेल मला."

पहाटेच उठून राहूल नैनाची वाट पाहत उभा होता.

" सगळे घेतले ना बरोबर. तुला इथून लागणारी पुस्तके, कपडे, खाऊ चा डबा."

" हो ताई, सगळे घेतले मी. राहूल अजून काय उठला नाही वाटतं. त्याचा आवाज पण नाही येत. बाबा तुम्ही मला सोडवायला येता का?"

" केव्हाचाचं तयार होवून तो तुझी बाहेर वाट पाहत आहे."

" खर का काय? "

" नैना ताई. आवरल का राणी सरकार तुमचे. चला निघूयात का? त्याआधी हे छोटेसे गिफ्ट कबुल करा."

नैनाला राहूलच्या बोलण्याने आनंद होतो. काल परवा भांडण करणारा राहूल आज मात्र प्रेमाने गिफ्ट आणि सरळ बोलत होता.

" वाव, हे वाॅच मला खूप दिवसापासून घ्यायचे होते. तू मला गिफ्ट देवून माझ जणू स्वप्न पूर्ण केले आहे."

" हो धन्यवाद तायडे. तुला आवडले ना. हेच हवं होत मला."

" स्वारी त्या दिवशी मी तुला जास्तच बोलले होते."

" आता माफ करायला, मी काय मोठा आहे का ? कधी मी चुकतो तर कधी तू. हेच करत बसली तर तुझी गाडी चुकेल बर का? "

" हो हो. चल निघूया आपण. बाबा, ताई येते मी."

" सावकाश जा."

" पोहचलीस की फोन कर बाळा."

" चल राहूल आली माझी गाडी. येते मी."

" हो. मी पण निघतो आता."

बाबांना एकामागून एक मध्यस्ती, तसेच चौकशी करायला सांगितलेल्या नातेवाईकांचे फोन सतत सुरु होते.

" तुम्ही सांगितलेला मुलगा खूप हुशार आहे बर का." यादव बोलत होते.

" त्याला सुपारीच्या खांडाचे पण व्यसन नाही ओ अजिबात." साने काकू सांगत होत्या.

" शांत आणि जिद्दीने नोकरीवर उच्च पदावर कार्यरत आहे." ढोले काका सांगत होते.

" सोनिया जरा इकडे ये ग. "

" काय, बाबा."

" आपण चौकशी करायला सांगणा-या लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे. तुला खरच मनापासून आवडला आहे ना राजेश. तरच आपण त्यांना होकार देवूया. नाहीतर दुसरे स्थळ पाहूया."

" कशाला बाबा नको."

" हा.. म्हणजे राजेश पसंत आहे तर. "

" हो बाबा. त्यांच्या बोलण्या आणि वागण्यात मला तुमचीचं छबी दिसते."

" आताच फोन करुन सांगून होकार कळवतो बघं."

" राम राम पाहुणे. आमच्या कडून डन आहे. हे सांगायला फोन केला आहे."

" तुमच्याच फोनची आम्ही सगळे वाट पाहत होतो. आम्हांला तशी कल्पना होतीच तुमच्याकडून "हो" असेच उत्तर येणार."

" आता मग एखादा चांगला मुहर्त काढून साखरपुडा आणि लग्नाची तारीख काढून घेवूया."

" साखरपुडा घरगुतीच करुया आपण. लग्नाचा बार धुमधडाक्यात उडवून देवू की."

" तुम्ही म्हणालं तसेच करुया. आमच्या घरच्या आंगणात मंडप टाकून साखरपुडा करुया. गुरूजींना लग्नाचा मुहर्त पण काढायला सांगूया."

" नैनाला आधीच फोन करुन सांग ग. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरली की यावं लागेलं घरी. काॅलेजात तसे आधीच सांगून ठेव म्हणावं."

" बाबा नैना ताई काॅलेजला गेलीये खरं. पण तिचे लक्ष सगळे आपल्याकडे लागलेलं आहे. सोनिया ताईला सकाळ पासून दहा वेळा फोन करुन झालाय तिचा. काय घडले? काय चालले? "

" अशीच उत्सुकता तिला तिच्या लग्नाकरता राखून ठेव म्हणावं."
" आता आपल्याला खरेदीच नियोजन करावं लागणार बाबा."

" बरोबर आहे तुझे. नातेवाईकांना, माम्या, मावश्या, चुलत्या, आत्या सगळ्यांकरता साड्या घ्याव्या लागणार."

" बाबा, सगळ्यात महत्वाचा ताईचा बस्ता आहे. तो झाला की बाकीच्यांचे पाहूया."

" सगळे होईल व्यवस्थित. कोणीही नाराज नको व्हायला. सगळेजण वापरतील अश्या सुताच्याच साड्या घेवू आपण. महाग पडल्या तरी चालतील किंमतीला मग. आपल्या घरातलं पहिलच लग्न आहे. धुमधड्याकातच झालं पाहिजे."

"बाबा इतके पण नको खर्च जेणेकरुन तुम्हांला पुढे जावून त्रास होईल. माझ्या नंतर अजून नैनाच लग्न आहे. परत आपल्याला आपल्या घरा करता लक्ष्मी देखील आणायची आहे."

" तू नको चिंता करु त्याची. तू आता फक्त आनंदात राहायचं. स्वयंपाक घरात पण फिरकायचं नाही. आता आराम करायचा. मी तुझ्या आजीला गावा वरुन बोलावून घेतले आहे. ती तिच्या सोबतीला बकुळाला पण मदतीला आणणार आहे."

" बकुळा मावशी येणार मग काय जे हवं ते खायला करुन देणार.तुम्ही चांगली युक्ती काढली."

क्रमशः

🎭 Series Post

View all