मागील भागात आपण पाहिले की सुयश परत शहरात जातो. कनिका शेतात फेरफटका मारायला जाते तेव्हा तिला एक समाधी दिसते. ती त्यांच्या घराण्याच्या आईची असते. कनिका पाया पडायला तिथे जाते. आता बघू पुढे काय होते ते.
" मावशी काय झाले? अशा का बघत आहात?" कनिकाने विचारले. मावशींचा वासलेला आ काही मिटेना. त्या तिच्याकडे आणि तिच्या पाठी बघत होत्या. कनिकाने मागे वळून पाहिले. एक तेजःपुंज व्यक्ती तिच्यामागे उभी होती. त्यांच्या चेहर्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज करता येत नव्हता. पण जुन्या पद्धतीचे धोतर, डोक्यावर पगडी, अंगावर उपरणे, कपाळी गंध.. त्यांना बघून कनिका ओढल्यासारखी त्यांच्याकडे वळली. त्यांना नमस्कार केला.
" कधीची वाट बघत होतो तुझी. म्हटलं येतेस की नाही?" ती व्यक्ती बोलली.
" तुम्ही माझी वाट बघत होता?" आश्चर्याने कनिकाने विचारले.
" हो, लग्न होऊन पंधरा दिवस झाले ना? मी म्हटलं आज येशील, उद्या येशील.. पण नाहीच. शेवटी आज भेट झाली. "
" तुम्ही आहात कोण, विचारू का?"
" मी?? मी इथला विश्वस्त.."
" विश्वस्त म्हणजे?"
" समजेल हळूहळू. तू नमस्कार केलास ना?"
" हो. यांची माहिती मिळाली असती तर जास्त आवडले असते." कनिका धीटपणे त्या अनोळखी व्यक्तीशी बोलत होती. मावशी अजूनही काही बोलत नव्हत्या.
" तुला हवी आहे माहिती?"
" हो.. "
" ती माहिती तुझ्या दालनातच मिळेल. फक्त चांगल्या मनाने शोध.." बोलता बोलता ती व्यक्ती पाठी गेली आणि नाहिशी झाली. ती व्यक्ती दिसेनाशी होताच मावशींचा आ मिटला. त्यांनी परत त्या समाधीला हात जोडले आणि कनिकाचा हात धरला, " सूनबाई चला लवकर." कनिचाच्या मनात हजार प्रश्न होते पण मावशींचा आविर्भाव बघून त्या आता कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतील असे वाटत नव्हते. ती ही मग गप्प बसली. दोघी लगोलग घरी आल्या. कनिका हातपाय धुवायला गेली. मावशी तश्याच मालतीताईंच्या खोलीत गेल्या. तिथे त्या दोघींचे बोलणे झाले आणि मावशी आपल्या घरी गेल्या. कनिका, मधुरा आणि मालतीताईंसोबत जेवायला बसली. तिने बोलायला सुरुवात केली.
" आई, आज मी त्या समाधीचे दर्शन घेतले. तिथे मला एक वृद्ध गृहस्थ भेटले." ते ऐकून जेवणार्या मालतीताईंचा हात थबकला. त्यांनी बसल्या जागी नमस्कार केला.
" तरीच, तारीला काय झाले सांगता आले नाही. तुला आईची सामक्षा मिळाली पोरी. चांगला शकुन हो."
" तरीच, तारीला काय झाले सांगता आले नाही. तुला आईची सामक्षा मिळाली पोरी. चांगला शकुन हो."
" आई, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?"
" जास्त काही नाही. येणारे जाणारे सांगतील तीच. मामंजी यांच्या जन्माच्या वेळेसच गेले. सासूबाई सुद्धा यांना जन्म देऊन गेल्या. यांच्या मामांनी यांना वाढवले. त्यामुळे आम्हाला कोणी सांगणारे नव्हतेच. मग जमेल तसे कुळधर्म याला त्याला विचारून करायला लागलो." मालतीताई बोलताना मधुराने कनिकाकडे पाहिले. त्या बघण्यात, बघ मी तुला बोलले होते ना शाप आहे असा अर्थ कनिकाला दिसत होता. कनिकाने त्याकडे दुर्लक्ष केले.
" आई, पण कोणीतरी असेलच ना, ज्याला हे सगळे माहित असेल असा?"
" नाही माहित. एकतर सुरूवातीची काही वर्ष हे मामाकडे राहिले, नंतर इनमिन काही वर्षांचा संसार आमचा. नशिबाने यांच्या मामाने होते ते घरदार, शेतीवाडी याची काळजी घेतली आणि हे वयात आल्यावर सुपूर्त केले. कुठे आणि कसला वेळ मिळणार बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला." मालतीताई स्वतःची कथा सांगत होत्या. कनिका थोडी निराश झाली. मागचे आवरताना तिच्या डोक्यात तेच विचार सुरू होते. सामक्षा मिळाली म्हणजे, त्या गृहस्थांनी जे सांगितले तेच खरे असणार. सापडले काही तर ते दालनातच सापडेल. कनिका उत्साहाने तिच्या खोलीत आली. तिने तिकडची कपाटे धुंडाळायला सुरुवात केली. पहाट होईपर्यंत ती फक्त शोधत होती पण कसलाच मागोवा लागला नाही. शेवटी थकून ती पलंगावर बसली. झालेल्या श्रमाने तिने दोन मिनिटे डोळे मिटले. डोळे मिटताच कालचा तो चेहरा परत येऊन स्मितहास्य करायला लागला. तिने दचकून परत डोळे उघडले. इथे तिथे बघितले. समोरच तैलचित्र होते. कनिका उठली. तिने ते तैलचित्र हलवले. आश्चर्य म्हणजे ते दिसताना जरी मोठे दिसत असले तरी तिच्याने ते सहज उचलले गेले. तिने पाठची भिंत चाचपली. तिला ती थोडी पोकळ वाटली. कनिकाने आजूबाजूला बघितले. दिसेल न दिसेल अशी छोटीशी कळ होती तिने ती दाबली. अगदी छोटासा एक कप्पा उघडला. कनिकाने थोड्या निराशेनेच त्या कप्प्यात हात घातला. आत एक गुंडाळी होती. कनिकाने ती काढून घेतली. परत कळ दाबून तो कप्पा बंद केला. ते चित्र जागेवर लावले. आणि ती गुंडाळी वाचायला सुरुवात केली.
काय लिहिले असेल त्या गुंडाळीत, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा