Login

शाप.. भाग ५

कथा एका वाड्याची..


शाप.. भाग ५

मागील भागात आपण पाहिले की कनिकाला समाधीजवळ एक गृहस्थ भेटतात, जे तिला तिच्या दालनातच तिला हवी ती माहिती आहे असे सांगतात. त्याप्रमाणे तिला एक गुंडाळी सापडली. आता बघू पुढे काय होते ते..


" मी उमा.. ज्या अर्थी हे पत्र तू वाचते आहेस त्याअर्थी तुला नक्कीच सामक्षा झाली असणार. तू उत्सुक असणार असशील माझा, या घराचा इतिहास जाणून घ्यायला. त्याआधी तुला असे वाटत असेल ना, की तू स्त्री आहेस हे मला कसे समजले? कारण मला खात्री आहे की हे वाचणारी सून असणार या घरची, ती ही धाकटी.. माझ्यासारखी.." कनिकाची उत्सुकता शिगेला पोहोचली. ती नीट बसली आणि पुढचे वाचायला लागली.. त्या सगळ्या घटना जणू तिच्यासमोर घडत होत्या असेच तिला वाटू लागले..


तर.. मी आता सगळ्याची नीट ओळख करुन देते. हे आपले जे घराणे आहे त्याचा पूर्वेतिहास मी सांगत बसत नाही. ज्या महत्वाच्या घटना आहेत फक्त त्याच सांगते.. आमचे हे आणि त्यांचे मोठे भाऊ सदाशिवराव दोघेच होते. एका अपघातात अख्ख कुटुंबाच्या कुटुंब त्यांनी गमावले होते. घरदार सांभाळायची माहिती नव्हती त्यामुळे जवळच्या समजणार्‍या सगळ्या नातेवाईकांनी होते नव्हते ते सगळे लुबाडले होते. त्यातून हे दोघे स्वतःच्याच घरातून पळून बाहेर पडले होते. सदाशिव भाऊजी तसे खमके होते आणि आमचे हे मवाळ. आपसूकच बाहेरचं सगळे भाऊजी बघायचे आणि घरातला व्यवहार हे. पण त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी. घरातून बाहेर पडलेली ही दोन पोरं उपाशीतापाशी भटकत होती. भाऊजींनी नाना उचापती करून , व्यवहार करून दोघांची पोटे भरली. बाहेरच्या जगाचे ज्ञान घेतले. एकदा जगाची रीत समजल्यावर मात्र भाऊजींची घोडदौड सुरू झाली. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी वाडा बांधला, शेतीवाडी घेतली. स्वतःचे लग्न केले, त्यानंतर यांचे आणि माझे लग्न झाले.
सगळे सुरळीत चालले होते. जाऊबाई गरीब घरातूनच आल्या होत्या. त्या स्वभावानेही गरीब होत्या. त्यांचा सगळा वेळ घरातले आणि मुलाचे करण्यातच जायचा. त्यांचा केशव अतिशय गोड. सतत काकू काकू करत पाठी असायचा. मला तर वाटत होते मी सौख्याच्या शिखरावर आहे. पण.. हा पणच वाईट असतो नाही. शून्यातून विश्व उभे केलेल्या भाऊजींचा स्वभाव जरा गर्विष्ठ झाला होता. आधी बर्‍याच गोष्टींपासून वंचित राहिल्यामुळेच असावे, हवे ते मिळालेच पाहिजे असे त्यांचे झाले होते. आता ही घटना बघा किती क्षुल्लक. पण त्याचे परिणाम मात्र पिढ्यानपिढ्या भोगावे लागणार. झाले होते असे भावजींनी नवीन शेत घेतले होते. तिथून नदी लांब पडत होती म्हणून तिथे विहीर बांधायचे ठरले. तशी सुरूवातही झाली. पण कितीही खोदले तरी पाणीच लागेना. सगळे उपाय करून झाले. खर्च भरपूर होत होता. हे भाऊजींना सांगत होते, झाला तो खर्च सोडून देऊ,नवीन जागा बघू, तिथे विहीर बांधू. पण छे.. मी जागा निवडली आहे, आता काहिही झाले, तरी विहीर तिथे झालीच पाहिजे, असा भाऊजींनी वेडा आग्रह धरला होता. तिथेच त्यांची ओळख झाली, सिद्धबाबाशी.. बाबा कसला तो भोंदू होता मेला. त्याची ती नजर.. नको नको वाटायचे. सांगणार कोणाला आणि ऐकणार तरी कोण माझे. आडून आडून यांना सुचवले, तर म्हणे तू कशाला त्याच्या समोर येतेस? उलटून तरी काय बोलणार स्वारींना? बाईमाणूस पडले ना? त्यातून आमचे हे म्हणजे अगदी भोळासांब. अशा माणसाला बोलायचे तरी काय आणि किती? तेव्हाच मनाशी ठरवले की आता आपल्यालाच पदर खोचून उभे रहायचे आहे.
आणि खरेच तशीच वेळ आली. विहिरीला पाणी लागत नाही म्हणून त्या भोंदूने भाऊजींना नरबळी द्यायचे सुचवले. गर्वाने, प्रतिष्ठेने, पैशाने आंधळे झालेल्या भाऊजींना ते पटले. स्वारींचा अडथळा नको म्हणून त्यांनी आधीच यांना बाहेरगावी पाठवून दिले होते. जाऊबाई म्हणजे गरीब गाय. उरले होते ती मी एकटी. भाऊजींना वाटले होते की मी काय करणार? तशी थोडीफार कुणकुण मला लागली होती. पक्की काहीच माहिती नव्हती. म्हणून मला काहीच हालचाल करता येत नव्हती. शेवटी तो काळा दिवस उजाडलाच. दिवेलागणीच्या वेळेस मी आणि जाऊबाई तुळशीपाशी दिवा लावत होतो. तोच आमची शेतावरची कमळा रडत आली, माझ्या धन्याला वाचवा म्हणत. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. शेवटी कानावर आलेली बातमी खरीच होती. मी तिला घेऊन तशीच शेतावर निघाले. दिवस भरलेली गरोदर बाई ती.. तिला अशा अवस्थेत रडताना बघून भावोजींचा एवढा राग आला म्हणून सांगू. चालता चालता तिने सांगितले, काही गड्यांनी तिच्या नवर्‍याला उचलून नेले. पाठी तो भोंदू हिच्याकडे वाकड्या नजरेने बघत होता. भाऊजी होते म्हणून की काय कोण जाणे त्याने फक्त हिच्या नवऱ्यालाच उचलले. त्याच्या तोंडाला फडके बांधले आणि घेऊन गेले. गावात कोणी दाद देईल न देईल म्हणून ती मदतीसाठी माझ्याकडे आली होती. आम्ही दोघी शेतावर पोहोचलो. अमावास्येची रात्र ती. काही काही दिसत नव्हते. कशातरी अंधारात ठेचकाळत चाललो होतो. विहिरीच्या इथे मशालीचा उजेड दिसत होता. त्या उजेडात भाऊजी, तो भोंदू आणि भावजींचे ते चार खास गडी दिसत होते. कमळाचा नवरा निश्चल दिसत होता. त्याला काय दिले होते कुणास ठाऊक. कमळीला तशीच उभी करून मी ताड ताड पावले टाकत पुढे गेले. कधी नव्हं ते मला बघून भावजी दचकले.

" उमा, तू इथे काय करते आहेस? घरातले नियम तुला माहित नाहीत का?" त्यांनी माझ्यावर आवाज चढवायचा प्रयत्न केला.

" नियम माहित आहेत मला. बहुतेक तुम्हालाच काय बरं, काय वाईट हे समजत नाहीये. म्हणून नाईलाजाने मला इथे यावे लागले." घरात पदर घेऊन वावरणारी मी त्यांच्याशी कशी असं बोलू शकत होते, माझे मलाच समजेना. काहीतरी शक्ती आली होती माझ्यामध्ये.

"जास्त बोलू नकोस.. बायकांनी अक्कल शिकवावी अशी अजून वेळ आली नाही माझ्यावर." भाऊजी उसन्या अवसानाने बोलत होते. तोच मी कमळीच्या नवर्‍याकडे बघितले. त्यांची सर्व तयारी झाली होती.

" मी तुम्हाला काही शिकवायला आलेच नाही. मी आले आहे त्या दगड्याला न्यायला. हे बळी वगैरे देऊन काही होत नाही. सोडा त्याला. नका गरिबाची हाय घेऊ." माझे बोलणे ऐकून भावजींचे मन बदलत होते. हे त्या भोंदूला समजले बहुतेक. त्याने त्या गड्यांना खूण केली.
आणि............... मी व भावजी दोघेही दचकलो. हा सगळा प्रकार कमळा बघत होती. ती संतापाने पुढे आली.

" तुझ्या या फडतूस विहिरीपायी माझ्या धन्याचा बळी दिलास तू.. माझ्या लेकराने जन्माला यायच्या आधीच बाप गमावला. मी जर खरी पतिव्रता असेल ना तर "शाप" देते मी तुला आणि तुझ्या अख्ख्या खानदानाला.. जसं माझं लेकरू त्याच्या बापाला बघू शकणार न्हाई..तसं तुमच्या खानदानातलं एकबी आपल्या बापाला बघू शकणार न्हाय..शाप आहे माझा शाप." अतिताणाने कमळी बेशुद्ध झाली. हा प्रकार बघून तो भोंदू पळून गेला. आणि पुरूषत्वाचा टेंभा मिरवणारे माझे भावजी हमसून हमसून रडायला लागले. मी कसेतरी स्वतःला सावरले. कमळीला गड्यांच्या मदतीने तिच्या घरी नेले. कसेबसे मी तिला शुद्धीवर आणले. तिची माफी मागितली.. म्हटलं..
" बाई.. करणाऱ्याने केले. पण शिक्षा अख्ख्या घरादाराला नको ग देऊस.. पदर पसरते तुझ्यापुढे. मागे घे तुझा शाप."


कमळा शाप मागे घेईल का? असेल काही उःशाप यावर? बघू पुढील भागात.
तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all