Login

शाप.. उत्तरार्ध भाग २

कथा एका वाड्याची


शाप.. उत्तरार्ध भाग २


मागील भागात आपण पाहिले की कनिकाला सदाशिवरावांचा चेहरा दिसतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते. आता बघू पुढे काय होते ते.


" कनिका, एवढ्या सकाळी कुठे निघालीस?" चहा पित बसलेल्या मालतीताईंनी विचारले.

" मी जरा शेतावर चक्कर मारून येते. मागचे दोनतीन महिने जाणेच झाले नाही." कनिका म्हणाली.

" मग सुयशला किंवा स्मिताला घेऊन जा सोबत.. काल चक्कर आली होती ना तुला?"

" काही होत नाही आता मला. ते दोघेही दमून झोपले आहेत. येतेच पटकन मी." मालतीताई पुढे काही बोलायच्या आत कनिका तिथून निघाली. झपाझप पावले उचलत ती समाधीपाशी आली. काल दिसणारा तो दिवा मिणमिणत होता. तिने हळदीकुंकू वाहून समाधीला नमस्कार केला. दिव्याची काजळी झटकत असतानाच परत ते गृहस्थ आले.

" आज परत आलीस तू?"

" हो.. आणि आज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत मी जाणार नाही." कनिका ठामपणे बोलली.

" कसली उत्तरे?" त्यांच्या चेहर्‍यावर मिस्किल हास्य होते.

" आमचा शाप संपला की नाही?"

" तुला काय वाटते?"

" कोडी सोडवायला नाही आले मी. माझ्या सुयशचा जीव वाचला म्हणून खुश होते मी. तर कालच मला तो चेहरा दिसला आणि नंतर ती हरवलेली पाने.." कनिका हताशपणे बोलत होती.

" हरवलेली पाने?" त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले.

" हो.. जी कोणीतरी लपवून ठेवली आहेत. मला त्या शापावरचा उपाय सापडला आहे. पण तो चेहरा... " कनिका हताश झाली होती. " तुम्ही काहीच मदत नाही का करणार?" त्यांनी कनिकाकडे बघितले. तिला त्यांनी समाधीच्या पाठच्या बाजूला नेले. तिला तिथे बसायला सांगितले. कनिकाने डोळे मिटले. तिला समोर दृश्य दिसू लागले.

" धनी... माझं धनी.." कमळा जोरजोरात रडत होती..

" शिरपा, तान्या.. " सदाशिवरावांच्या गड्यांना उमाने हाक मारली. तसे ते दोघे पुढे धावले.

" हिला वाड्यावर न्यायला मला मदत करा. " उमा अधिकारवाणीने बोलत होती. तिघांनी मिळून कमळाला वाड्यावर नेले. तिथेच परसदारी असलेल्या एका खोलीत उमाने कमळाला ठेवले.

" तू इथेच थांब.. मी आलेच." कमळा रडून रडून श्रमली होती. तिथे बसताच ती झोपून गेली. ती झोपलेली बघताच उमा परत त्या गड्यांना घेऊन शेतावर निघाली. सदाशिवराव तिथे सुन्नपणे बसला होता.

" भावजी, दगडूचं प्रेत कुठे?" उमाने विचारले. सदाशिवराव जणू तंद्रीतून जागा झाला.

" ते.. ते.."

" भावजी त्याचे प्रेत कुठे?" उमाने आवाज चढवत विचारले.

" बाबा घेऊन गेला.." कसंबसं सदाशिवने उत्तर दिले. उमाने त्या दोन गड्यांना खुणावले. ते दोघे सदाशिवला घेऊन वाड्यावर आले. उमा विचार करत होती. दगडूवर निदान अंत्यसंस्कार तरी व्हायला हवे होते. ती अंधारात घरी जायला निघाली. विचारात चालताचालता तिचा पाय घसरला आणि ती जोरात पोटावर पडली. तिच्याखाली रक्ताचे थारोळे जमू लागले. तिची शुद्ध हरपायला लागली. ती हरपत असताना तिला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. शापाला सुरुवात झाली होती. पण तिच्या बाबतीत उलटी.. ती परत कधीच आई होऊ शकणार नव्हती याची जाणीव तिला आतपर्यंत झाली..


कनिकाने डोळे उघडले.. समोर ते उभे होते. कनिकाच्या डोळ्यात पाणी होते.

" उमाचे बाळ गेले?" त्या व्यक्तीने होकारार्थी मान हलवली.

" आणि दगडूवर अंत्यसंस्कार झाले?"

"हो.. आईने दुसऱ्याच दिवशी माणसे पाठवून त्या बाबाचा शोध घेतला आणि विधिवत अंत्यसंस्कार करून घेतले. गावातल्या लोकांच्या भितीने त्या बाबाने प्रेत पुरायचा प्रयत्न केला होता.."

कनिकाने उमाला परत नमस्कार केला. स्वतःचा गर्भपात होऊनही घराण्याचा विचार ती करत होती. आपल्याला तिच्यासारखे खंबीर होणे जमेल का?


या सगळ्याच गोंधळातून कनिकाला बाहेर पडता येईल का? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all