Login

शाप.. उत्तरार्ध भाग ३

कथा एका वाड्याची


शाप.. उत्तरार्ध भाग ३


मागील भागात आपण पाहिले की समाधीजवळ कनिकाला आधी घडलेल्या घटना दिसू लागतात. त्यात तिला उमाचा झालेला गर्भपात दिसतो. बघू आता पुढे काय होते ते.


" अहो.. कुठे होता तुम्ही? या चार दिवसात काय काय झाले.." उमा विनायकच्या गळ्यात पडून रडत होती.

" शांत हो.. एवढ्या हिमतीने हे सगळं निभावलंस आणि आता रडतेस?" विनायक तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला.

" आपलं बाळ गेलं.." उमा हमसून हमसून रडत होती.

" बोलल्या वहिनी मला.. आता केशवलाच आपला मुलगा समजू.." विनायक शांतपणे बोलत होता. "दादा, तुला काही बोलला?"

" नाही.. ते आल्यापासून शांतच आहेत. त्यांनीही त्या शापाचा धस्का घेतला आहे बहुतेक.." उमा डोळे पुसत बोलली.

" उमा, नक्की काय बोलली ती कमळा? त्या चाकर असलेल्या बाईचे बोलणे तू एवढे मनाला लावून घेतेस?"

" चाकर असली तरी बाईच ना ती? आपल्या नवऱ्याचा डोळ्यासमोर खून होताना बघून तिचा तळतळाट झाला ते ही मनाला लावून घेऊ नको? एवढ्या वेळा शेतावर गेले आहे मी. रात्री अपरात्री.. पाऊल न पाऊल ओळखीचे आहे माझ्या. असे असताना मी पडले आणि आपले बाळ गेले तरी यावर मी विश्वास नको ठेवू? तुम्हाला गमवायची भिती नसती ना तर दुसरे लग्न सुद्धा करायला सांगितले असते. पण..." बोलता बोलता उमा थांबली.

" दुसरं लग्न.. आणि मी? तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे.. तू आराम कर.. यावर आपल्याला काहीतरी उपाय शोधायला पाहिजे." विनायक विचार करत बोलला.

" मी रात्रभर विचारच करत होते. मग मला आठवलं.." बोलता बोलता उमा थबकली.

" काय आठवले?"

" माझ्या माहेरी एक डोंगर आहे. तिथे एक साधूबाबा राहतात. ते अडीअडचणीला लोकांची मदत करतात. आपण तिथे गेलो तर?"

" तुझी श्रद्धा असेल तर नक्की जाऊ. या सगळ्यातून सावर आता स्वतःला. ती वहिनी पण घाबरली आहे. तिला तुलाच धीर द्यायचा आहे. त्या कमळीचे काय झाले?"

" वैद्यबुवा आले होते. त्यांनी सांगितले कधीही बाळंतीण होऊ शकते. तोपर्यंत तिला वाड्यातच राहू दे ना तिला?" उमाने विचारले. मान हलवत विनायक उठला. सदाशिवरावांकडे जायला निघाला. तो बाहेर पडताना त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रु उमाला दिसलेच. तिचा जीव कळवळला..

" सोडव रे देवा या सगळ्यातून आम्हाला." तिने देवाला हात जोडले. वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे दोनच दिवसांत कमळाची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला. ती इथे रूळली आहे हे बघून उमा विनायकसोबत दोन दिवस माहेरी गेली. तिथून ठरल्याप्रमाणे ते दोघे त्या सत्पुरूषाच्या दर्शनाला गेले. डोंगर चढून उमाला धाप लागली होती. कसंतरी थांबत चालत ती त्या साधूबाबांच्या गुहेपाशी पोहोचली. सगळे आत गेले. आत साधूबाबा ध्यानात बसले होते. खूप वेळ सगळेजण त्यांचे डोळे उघडायची वाट बघत होते. शेवटी कंटाळून विनायक मेव्हण्यासोबत बाहेर निघून गेला. उमा पण बाहेर पडणार तोच त्यांनी डोळे उघडले.

" बोल... काय बोलायचे आहे.."

"महाराज.. मी.."

" सांग.. न घाबरता सांग.." त्यांच्या आश्वासक शब्दांनी उमाला धीर आला. तिने पटापट त्यांना सांगायला सुरुवात केली. महाराज शांतपणे ऐकून घेत होते. हुंदके देत उमाने बोलणे थांबवले.

" महाराज, हे सगळे खरे असेल का? असेल तर कसं वाचवू मी या सगळ्यातून?"

" तू वाचवणारी कोण?" महाराजांचा आवाज घुमला.

" मी?? मी.. या वाड्याची सून. ती कमळा माझ्याकडेच आली ना मदतीला. हे माझेच घर आहे ना?"

" पण जिथे तुझा अंश नाही तिथे तू कोणाला वाढवणार?" महाराजांचे शब्द तिच्या ह्रदयावर वार करून गेले.

" माझा अंश नसला म्हणून काय झाले? केशवही माझाच आहे ना?" डोळ्यातले अश्रु मागे ढकलत उमा बोलत होती.

" शोभशील या घराची आई.. आता घरी गेलीस ना की हे सगळे लिहून काढ.. सात पिढ्यांनंतर..."


" सात पिढ्या??" उमाने तोंडावर हात ठेवला..

" हो.. सात पिढ्या.. सात पिढ्या हा शाप भोगावाच लागेल. त्यानंतर समजेल हा शाप संपणार की नाही.."

" महाराज.. कमळा म्हणाली.. जोपर्यंत तो इथे आहे, तुम्हाला यातून मुक्ती नाही.. हे सगळं वैभव भावजींनी कमावले आहे.. ते इथून जाईपर्यंत म्हणजे?"

" एवढा विचार करू नकोस बाळ.. कर्ता सवरता तो आहे. आपण आपल्या हातात जे आहे तेच करावे. मी तुला काही साधना सांगतो. त्या करायला सुरुवात कर.. उपयोग होईल."

" महाराज..." उमाला पुढे बोलवत नव्हते.

" लक्षात ठेव.. तूच यांना शापमुक्त करशील.. आता नाहीतर पुढच्या जन्मात.. करशील हे नक्की."

" उमा.. उमा.. अग चल ना.." विनायक आत आला. " कधीचे बाहेर थांबलो आहोत तुझी वाट बघत. काय करते आहेस?"

" ते महाराज.." उमाने महाराजांकडे बघितले. ते परत समाधिस्थ झाले होते. तिने घाम पुसायला पदर हातात घेतला. तर पदराला एक भूर्जपत्र चिकटलेले होते. तिला समजले. तिने ते पदरात लपवले. महाराजांना नमस्कार करून ती चालू लागली.. घराच्या दिशेने..


काय होईल पुढे बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all