Login

शाप.. उत्तरार्ध भाग ५

कथा एका वाड्याची
शाप.. उत्तरार्ध भाग ५


मागील भागात आपण पाहिले की सदाशिवरावांच्या मृत्युने शापाची सुरूवात झाली. कनिकाला जाणीव झाली आहे, की हे घर शापमुक्त झाले तर तिच्यामुळेच होईल. बघू कसे ते.


""कनिका.. सकाळी सकाळी न सांगता कुठे गेली होतीस? मोबाईलही नेला नव्हतास." सुयश काळजीने विचारत होता.

" मी आईंना सांगून गेले होते."

" हो पण एवढा वेळ? मला तुझी किती काळजी वाटत होती." कनिकाला सुयशमध्ये विनायकचा भास झाला. ती स्वतःशीच हसली.

" आता हसतेस काय? नाश्ता करायला चल. वहिनी पण थांबली आहे." वहिनींचे नाव ऐकताच कनिका हातपाय धुवून बाळाकडे गेली. मधुराकडे बघताना तिला तिथे जानकीबाई दिसू लागल्या आणि छोट्या प्रिशामध्ये केशव. नक्की काय खरे आणि काय खोटे, हेच तिला समजेनासे झाले. ती तशीच खोलीत जाऊन बसली. पुढे काय करावे लागेल याचा विचार करू लागली. आजूबाजूला नजर फिरवताना तिला त्या वाड्यातल्या उमाच्या आठवणी दिसू लागल्या. त्या आठवणीत ती गढली असतानाच सुयश तिथे आला.

" काय ग, कोणत्या जगात आहेस?" त्याने विचारले.

" काही नाही.. असेच. बोल काय झाले?"

" कनिका, तू इकडचे काम बघताना कधी जुनी कागदपत्रे पाहिलीस का?" सुयश थोडा काळजीत दिसत होता.

" नाही.. मी फक्त आईंना विचारून शेतात जायचे आणि तिकडच्या गड्यांकडून काम करून घेत होते. का रे काही काळजीचे कारण?"

" म्हटलं तर हो.."

" म्हणजे?"

" अग, तू शेताची घडी व्यवस्थित बसवली आहेस म्हणून मी जुनी कागदपत्रे बघत होतो. तर त्यात एक नोंद आहे की हा वाडा , हे शेत सगळे गहाण ठेवले आहे. त्यावर बाबांच्या सह्या आहेत."

" काय???" कनिकाचा विश्वास बसत नव्हता.

" हो ना. समजल्यापासून मी पण टेन्शनमध्ये आहे. आधीच तुला बोलणार होतो पण म्हटलं बारसे होऊन जाऊ दे. मग बोलू."

" अरे पण, इतकी वर्ष तुला काहीच समजले नाही?" कनिकाला मोठा धक्का बसला होता.

" कसं समजणार? आम्ही बाबांना कधी बघितलेच नाही. आम्हा दोघांना सांभाळण्यातच आईचा सगळा वेळ जात असावा. बाबा गेल्याच्या दुःखात तिनेच हे कधी बघितले नसावे. मी आणि यश बोर्डिंग मध्येच शिकलो. नंतर यश इथेच रहायला लागला. मला वाटतं यशला याचा सुगावा लागला असावा. तो मला एकदा फोनवर बोलला होता. काही सांगायच्या आधीच तो गेला." सुयश जड आवाजात बोलत होता.

" सुयश, काही झाले तरी हा वाडा, ही जमीन वाचलीच पाहिजे. मला तर आश्चर्य वाटते की हे गहाण ठेवून इतकी वर्ष झाली तरी ती समोरची व्यक्ती वसुलीसाठी कशी आली नाही." कनिका आता विचार करू लागली.

" कारण हे सगळे बाबांनी गहाण ठेवले आहे त्यांच्या मामाकडे.. मला तरी वाटते त्यांनी बाबांना फसवले असावे. हे जर आईला समजले ना तर तिला धक्का बसेल मोठा."

" गहाण ठेवण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या नावावर का नाही करून घेतले?"

" शापाची भिती वाटली असेल कदाचित त्यांना.. मला हे समजल्या समजल्या लगेच मी त्यांची चौकशी सुरू केली. बाबा गेल्यानंतर त्यांनी संबंधच ठेवले नाहीत. त्यामुळे इतर नातेवाईकांकडून त्यांचा नंबर मिळवला कसाबसा. त्यांचा नातू येईल भेटायला आपल्याला फोन करून. आई आणि वहिनीला हे नको सांगायला. आपण त्याला बाहेरच भेटू. चालेल?" सुयशने विचारले. कनिकाने मान हलवली. तिला समजेना आता हे घर वाचवायचे शापापासून की वाडा गहाण जाण्यापासून.


वाचवू शकेल का हा वाडा कनिका? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all