मागील भागात आपण पाहिले की वाडा आणि जमीन सुयशच्या बाबांनी त्यांच्या मामाकडे गहाण ठेवला आहे. गहाण ठेवला आहे की त्यांना कोणी फसवले होते बघू आजच्या भागात..
" आई, बाबा कधी अडचणीत आले होते का?" प्रिशाशी खेळत असलेल्या मालतीताईंना सुयशने विचारले.
" नाही रे.. त्यांच्या हाताशी होता की बर्यापैकी पैसा."
" मग काही खरेदी वगैरे केली होती का कसली? एखादी मोठी जमीन वगैरे?किंवा असलंच काही? तुला काही माहीत आहे का?"
" नाही रे.. केली असती तर त्याचे कागदपत्र असले असते ना? पण मला जोपर्यंत आठवते तशी त्यांनी काहीच खरेदी केली नाही. त्यांचे म्हणणे होते आधीचीच एवढी जमीन सांभाळायला जमत नाही. अजून कशाला? तसेही उणापुरा दोनतीन वर्षांचा संसार. एकमेकांची ओळख होईपर्यंत संपलाही. काही बोलणे झालेच नाही एवढे. पण तू का विचारतो आहेस आज एवढे खोदून खोदून?"
" आई, मला सांग तू माझा आणि यशचा खर्च कसा केलास?"
" कसा केलास म्हणजे? शेतीची कामे सुरूच होती की. आधी दादा यायचा मदतीला. नंतर त्याला त्रास नको म्हणून माझे मीच करायचे. त्यातून आलेला पैसा पुरायचा. म्हणजे मी पुरवायचे. पण का विचारतो आहेस आज हे? काय ग कनिका?"
"माझ्या समाधानासाठी.. बाबांच्या कोणत्या नातेवाईकांनी तुला मदत नाही केली कधी?"
" मदत करायला होते कोण? यांचे मामा लग्नापुरते आले होते. नंतर तेही वारले. हे गेल्यावर त्यांच्या घरातले माझ्याशी का संबंध ठेवतील?"
सुयश पुढे काही बोलणार तोच त्याचा फोन वाजला.
" हो.. आलोच.. दहा मिनिटे द्या."
" हो.. आलोच.. दहा मिनिटे द्या."
" आई, मी आणि कनिका जरा बाहेर जाऊन आलो."
" अरे पण, सकाळी सुद्धा ती बाहेर जाऊन आली. आता परत?"
" आई, महत्वाचे काम आहे. आलोच.." सुयशने कनिकाला खुणावले. दोघे बाहेर पडले. कोपर्यावरच्या हॉटेलमध्ये बसले. सुयशने फोन लावला.
" आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये. तुम्ही?"
" गाडी पार्क करतो आहे.. आलोच." सुयश आणि कनिकाने दरवाजाकडे बघितले. आणि बघतच राहिले. तोच चेहरा, तसेच केस.. अगदी सदाशिवराव.. फक्त मिशी आणि जुन्या काळातले कपडे नसलेले.
" हाय.. मी आकाश.. मी चुकत नसेन तर तुम्ही सुयश." तो सुयशकडे येऊन बोलला.
" हो.. मी सुयश. ही माझी बायको कनिका." सुयश ओळख करून देत बोलला.
" तुम्ही दोघं माझ्याकडे असे का बघता आहात? एखादं भूत बघितल्यासारखे. माझा चेहरा एवढा भितीदायक आहे?" त्याने हसत विचारले.
" तुम्ही काल आमच्या वाड्यावर आला होता का?" कनिकाने मध्येच विचारले. आकाशला आश्चर्य वाटले.
" हो.. मला हा वाडा बघायची उत्सुकता वाटली म्हणून काल गावात आल्या आल्या तुमच्या वाड्यावर आलो. तिथे काही कार्यक्रम सुरू होता बहुतेक. मग निघालो. पण तुम्हाला कसे समजले?"
" काल मी ओझरते बघितले तुम्हाला." कनिका सुयशकडे अपराधी नजरेने बघत म्हणाली. सुयशला तिच्या चक्कर येण्यामागचे कारण समजले. सावरून घेत तो आकाशला बोलला,
" आत यायचे ना मग?"
" नाही.. इतके वर्ष काही संबंध नाही आपले. थोडं ऑकवर्ड वाटले. म्हणून नाही आलो." त्याने स्पष्टीकरण दिले.
" आता मग कामाचे बोलूयात का?" सुयशने विचारले.
" अर्थात.. त्यासाठी तर मी इथे आलो आहे."
" मी फोनवर बोललो तसे तुमचे आजोबा माझ्या बाबांचे सख्खे मामा होते. माझ्या बाबांचा माझ्या जन्माच्या आधीच मृत्यु झाला.." बोलता बोलता सुयश थांबला.
" ऐकून फार वाईट वाटले. मला हे काहीच माहीत नव्हते. माझे आईबाबा परदेशात होते. मला मात्र इथे परत यायचे होते. मी पाच वर्षांपूर्वीच इथे आलो. तिथेच मोठा झाल्यामुळे मला इथली काहीच माहिती नाही. तुम्ही म्हणालात त्यानंतर ती जुनी कागदपत्रे बघितली. तो वाडा आणि जमीन आमच्याकडे गहाण आहे.."
" माझ्या बाबांनी पैसे घेतलेच नव्हते. राग येऊन देऊ नका, पण मला असे वाटते त्यांना फसवले गेले असावे." सुयश अडखळत बोलला.
" असेल.. मग?"
" तुम्ही द्याल ना परत?" कनिकाने आशेने विचारले.
" नाही.." आकाश बोलला.
कशी मिळवू शकेल कनिका आकाशकडून तिची जमीन आणि वाडा? मिळेल तरी का तिला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा