शब्द झाले मुके 28

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 28

"राजन, आपण खूप दिवस झाले कुठे पिकनिकला गेलो नाही. आपण वनडे ट्रिप करून येऊयात का?" ऋचाने राजनला विचारले तेव्हा राजनला खूप आनंद झाला.

"ग्रेट वहिनी! तू खरंच खूप गोड आहेस ग. तुझ्यासारखे विचार मला करता येत नाही. खरंच, आपण जाऊया. तेवढाच सर्वांना चेंज होईल. नाहीतर नेहमी ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस एवढंच. बाकी दुसरे तिसरे काहीच करता येत नाहीये. सर्वांना तेवढाच बदल होईल. मी काय इकडून तिकडे सारखा फिरत असतो; पण दादा, बाबा, आई आणि तुला कुठेच जाता येत नाही. आपण नक्कीच जाऊयात. मी सर्वांना तयार करेन." राजनने ऋचाला शब्द दिला.

"यावेळी आपण मानसीला घेऊन गेलो तर.. ती सुद्धा आपल्यातलीच आहे. तिला आणखी आपल्या जवळ येता येईल. तुला काय वाटते?" ऋचा म्हणाली.

"काय वहिनी, तू खरंच ग्रेट आहेस यार! तुझ्या डोक्यात ना असे एक एक आयडिया खूप छान सुचतात. हो हो तिला सुद्धा नेऊया; पण मानसीला घेऊन जायचं हे तू सांगायचं सर्वांना. बाकी सर्वांना मी तयार करेन, चालेल." राजन म्हणाला.

"हो हो नक्कीच. चालेल; पण तुझे दादा येतील का? मला तर त्यांचा काही भरोसा नाही. हल्ली तर ते घरातल्यापेक्षा ऑफिसमध्ये जास्त जात आहेत. त्यांचं काम खूप अति होतंय. थोडं संसाराकडे लक्ष द्यायला हवं. संसारापेक्षा काम खूप महत्त्वाचं आहे का? खरं सांगू, मला तर ना त्यांच्यावर खूप संशय येतोय; पण मी बोलून दाखवत नाही." ऋचाने राजन पुढे तिचे मनमोकळे केले.

"अगं वहिनी, तू पण ना. उगीच डोक्यात काहीतरी खुळ घालून घेतेस. तसे काहीच नाही तुला माहित आहे. आपल्या कंपनीला खूप मोठा प्रोजेक्ट मिळालाय आणि त्या प्रोजेक्टवरच दादा काम करतोय. ते प्रोजेक्ट खूप थोड्या कालावधीमध्ये पूर्ण करून द्यायचे आहे त्यामुळे त्याच्यावर प्रेशर असणारच ना? आणि बाबांचा स्वभावही तुला माहित आहे. कोणतेही काम वेळेत पूर्ण करायचे. तीच सवय दादाकडे आली असेल, त्यामुळेच तर तो वेळेच्या आधी प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय ना?" राजनने ऋचाला समजावले.

"हो मला वाटतंय रे; पण थोडं कुटुंबाकडेही लक्ष द्यायला हवं ना. कुटुंब आणि काम यामध्ये ताळमेळ घालता यायलाच हवा ना? आता कितीही केले तरी संसार देखील महत्त्वाचा असतो आणि काम देखील. कारण काम केल्याशिवाय संसाराला मुबलक पैसा मिळणार नाही आणि पैसा मिळाल्याशिवाय संसार व्यवस्थित होणार नाही, म्हणूनच या दोन्हीचा ताळमेळ घालून राहायला हवं ना? मी बोलते; पण बोलणे सोपे असते करणे मात्र अवघड असते. मला वाटतंय; पण आता त्यांनी स्वतःला खूपच कामात झोकून दिले म्हणून म्हणते रे. ते पिकनिकलाही येतील की नाही याची मला शंका वाटतेय." ऋचा म्हणाली.

"अगं वहिनी, तू इतकी का काळजी करतेस? मी आहे ना. दादाला कसं करायचं तयार करायचं बरोबर मला माहित आहे. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. फक्त मानसीला तयार करायचं तेवढं तू पहा आणि निघण्याची तयारी करायला लाग. बाकी सगळं माझ्यावर सोपवून दे." राजनने ऋचाला आश्वासन दिले.

"हो हो नक्कीच; पण कुठे जायचं? अजून आपले डेस्टिनेशन ठरलेलं नाही." ऋचा म्हणाली.

"वहिनी, केरळला जाऊयात का? मस्त मजा येईल. तिकडे पाहण्यासारखे खूप आहे." राजनने ऋचाला सुचवले.

"अरे, पण आपण वनडे ट्रिप काढणार आहोत. इतके दिवस जायला इथे कुणाला वेळ आहे का? यांचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपण जाऊया; पण आता फक्त एक दिवसासाठी कुठेतरी जाऊ. म्हणजे सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी परत येण्यासारखे ठिकाण सांग. तिथे सगळे लगेच तयार होतील. केरळ म्हटलं तर सगळे तयार होणार नाहीत." ऋचा स्पष्ट म्हणाली.

"मग महाबळेश्वरला जाऊया. मस्त निसर्गरम्य ठिकाण असलेले महाबळेश्वर. तिथे छान वाटेल. तुला काय वाटतं? तसेही आपल्या शहरापासून जवळच आहे आणि जरी आपल्याला तिथे रहावसं वाटलं तरी एखादा दिवस आपण राहू शकतो." राजनने त्याच्या मनातील बोलून दाखवले.

"अरे हो. आपण महाबळेश्वरला तर जाऊन येऊ शकतो. चालेल. फिक्स अँड फायनल. आपण महाबळेश्वरला जाणार आहोत. आता सर्वांना तयार करण्याची जबाबदारी तुझी. कोणापासून सुरू करतोस हे तुझे तू पहा. तू सर्वांना तयार केलेस की मग मी मानसीचे नाव सुचवेन. चालेल." ऋचा म्हणाली.

"येस बॉस. जशी आपली आज्ञा. मी आता लगेच तयारीला लागतो." असे म्हणून राजन तिथून निघून गेला आणि ऋचा गालातच हसली.

राजन आणि ऋचाचे नाते हे सुरुवातीपासूनच अगदी मैत्रीचे नाते होते. ते दोघेही धीर आणि भावजय पेक्षा मैत्रीच्या नात्यात त्यांना बांधून ठेवणे खूप सोपे झाले होते. तशी राजनचीच इच्छा होती. 'टिपिकल दीर आणि भावजय सारखे आपले नाते नको. आपण एका फ्रेंड सारखे राहू' असे त्यानेच अगदी पहिल्या दिवशीच ऋचाला सांगितले होते आणि तिला देखील कोणत्याही नात्यात अडकण्यापेक्षा एक मैत्रीचे नाते खूप चांगले वाटले. मैत्रीच्या नात्यांमध्ये आपण हक्काने काहीही बोलू शकतो. तिथे कोणत्याही नात्याचे बंधन नसते आणि तेच तिला योग्य वाटले, कारण नात्याच्या बंधनात अडकून रुसवे फुगवे करण्यापेक्षा मैत्रीच्या बंधनात अडकून जे असेल ते निखळ नाते आपल्याला जोडता येते असे तिला वाटले होते आणि त्यामुळेच त्या दोघांचे खूप छान बंध जुळले होते. त्यांचे दीर आणि भावजयचे नाते सगळ्यात बेस्ट होते. सर्वांना ते नाते खूप आवडले होते. जेव्हा केव्हा राजन आणि ऋचा एकत्र जातील तेव्हा तेव्हा सगळेजण नातेवाईक वगैरे त्या दोघांकडे अगदी बेस्ट दीर आणि भावजयीची जोडी म्हणून पाहत होते. सर्वांना त्या दोघांचे खूप कौतुक वाटत होते, कारण बाहेरून आलेल्या त्या स्त्रीला त्याने योग्य तो मान दिला होता. ते नाते शेवटपर्यंत तसेच रहावे यासाठीच ते दोघेही प्रयत्न करत होते, म्हणूनच ऋचाने देखील राजनसाठी मानसी योग्य आहे का नाही हे पाहून पडताळच त्या दोघांची बोलणी घरामध्ये केली होती. तिला मानसी राजनसाठी अगदी योग्य वाटली होती.

ऋचाच्या लग्नानंतर काही वर्षांनी स्वराचा जन्म झाला. त्यानंतर स्वराला देखील राजनने खूप छान प्रेम दिले. ती जास्त करून तिच्या काकाकडेच असायची. राजनही तिला प्रेमाने जवळ घ्यायचा, तिच्याशी खेळायचा, बोलायचा, तिचे हट्ट पूर्ण करायचा. तसाही तो कॉलेजमध्ये होता त्यामुळे त्याला भरपूर वेळ मिळत होती. त्याचा दादा आणि बाबा हे दोघेही कामात व्यस्त असायचे त्यामुळे स्वराला आपसूकच त्याचा लळा लागला होता. आजूबाजूला फिरवणे, गाडीवरून फेरफटका मारून आणणे ही त्याची कामे होती आणि तो दिसला की स्वराही त्याच्याकडे धाव घ्यायची. हे एक वेगळेच काका आणि पुतणीचे नाते होते. राजन खरंच सर्वांपेक्षा खूप वेगळा होता. त्याचे विचार, त्याचे वर्तणूक, त्याचे बोलणे, त्याचे वागणे हे सारे काही इतरांपेक्षा निराळे होते आणि त्यावरच सर्वजण भाळत होते. सर्वांना तो आपलासा वाटत होता. त्याचा कुणालाच राग येत नव्हता. मग त्यात ऋचा आणि मानसी या वेगळ्या कशा?

ऋचाला कोणीच भाऊ वगैरे नव्हते. ती तिच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी होती; पण लग्नानंतर इतकी सारी माणसे पाहून तिला खूप आनंद झाला. प्रत्येकाशी नवे नाते ती योग्य पद्धतीने निभावत होती. इतकी शिकलेली ऋचा या घरामध्ये सर्वांची योग्य ती देखभाल करत होती. शिवाय कसलीच अपेक्षा न करता ती सारं काही प्रेमाने करत होती, यामुळे घरचे सारे आपसूकच तिच्याकडे ओढले गेले होते. ऋचा या नावाशिवाय कोणाचेच पान हालत नव्हते आणि आपली बायको देखील अशीच असावी असे राजनला नेहमी वाटत होते. वहिनीच्या सोबत राहून वहिनीप्रमाणे तिने रहावे वागावे असे त्याला वाटत होते. मानसीमध्ये त्याला तसे काही दिसल्यामुळेच तो तिच्याकडे ओढला गेला होता. आता राजन सर्वांना पिकनिकसाठी तयार करण्यासाठी गेला आणि इकडे ऋचा पिकनिकला जाण्यासाठी जे जे काही हवे ते सर्व काही तयारी करत व्यस्त होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all