शब्द झाले मुके 29

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 29
राजन सर्वांना पिकनिकला जाण्यासाठी तयार करत होता. त्याने पहिल्यांदा त्याच्या आईला तयार करण्याचे ठरवले. म्हणजे बाबाही लगेच तयार होतील. त्यानंतर दादाला कसे तयार करायचे हे शोधायला हवे असा त्याने मनात विचार केला आणि त्याची स्वारी आईकडे वळवली. तो आईच्या रूममध्ये गेला. त्याची आई तिथे पुस्तक वाचत बसली होती. त्याने पहिल्यांदा दारावर टकटक असा आवाज केला.

"अरे राजन, ये ना बाळ. यावेळी काय काम काढलंस? तेही माझ्याकडे! काही हवं होतं का?" राजनची आई म्हणाली.

"अगं आई, तसे खास काही नाही. फक्त थोडं बोलायचं होतं. तू बोलू शकतेस ना?" राजन म्हणाला.

"हो हो, बोल ना. काय बोलायचं आहे?" राजनची आई म्हणाली.

"अगं, बघ ना आई. वहिनी किती काम करते. सगळं घरचं, बाहेरचं पाहते; पण बिचारीला थोडीशीही करमणूक मिळत नाही. दादा त्याच्या कामात व्यस्त असतो. आता तर नवीन प्रोजेक्ट आलाय आणि आपणही आपल्या कामात. ती बिचारी बाकी सगळं पाहत बसतेय. आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं. तिच्याही काहीतरी इच्छा असतील ना." राजन म्हणाला.

"हो रे. खरंच, ऋचा आपल्या घरासाठी खूप काही करते. आता मानसी आल्यानंतर तिला थोडी विश्रांती मिळेल. त्या दोघी मिळून सगळे घर सांभाळतील. मी तरी काय करू? मलाही तिला मदत करता येत नाही. माझे गुडघे दुखतात." राजनची आई म्हणाली.

"अगं आई, तसे काही नाही. मी काय म्हणतो, वहिनी काल म्हणत होती की कुठेतरी बाहेर पिकनिकला वगैरे जाऊयात का; पण मी तिला कुठे घेऊन जाणार? दादासोबत जा म्हटलं तर वहिनी म्हणते की फॅमिली सोबत जाऊया. म्हणजे सगळेजण जाऊया; पण दादा काही तयार होणार नाही आणि बाबा पण होणार नाहीत. त्यामुळे कसं करायचे? वहिनीसाठी आपण इतकं तर करायला हवा ना? तिला काहीतरी हवं आहे म्हटल्यावर आपण द्यायला हवं ना? ती आपल्यासाठी इतकं करते आणि आपण इतकंही करणार नाही." राजन म्हणाला.

"अरे, हो रे. खूप दिवस झाले ती कुठे गेली देखील नाही. तिचीही इच्छा होणारच ना. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या बाबांना कसे तयार करायचे ते मी पाहते. फक्त आता प्रश्न राहिला तो तुझ्या दादाचा. त्याला आपण सगळेजण मिळून सांगूया, म्हणजे तो आपलं ऐकणारच. मी आहे काही काळजी करू नकोस. आपला हा प्लॅन यशस्वी होणार म्हणजे होणारच. पण कुठे जायचं रे?" राजनची आई म्हणाली.

"वहिनी म्हणत होती महाबळेश्वरला जाऊया. तुला काय वाटतं? आपण कुठे जाऊया?" राजन म्हणाला.

"ऋचा म्हणते तर ठीक आहे. आपण तिथे जाऊया. तसेही शेवटी तिची इच्छा आपण पूर्ण करणार आहोत ना. तिच्या मनात जे आहे तेच करूयात." राजनची आई म्हणाली.

आई सोबत बोलून झाल्यावर राजनला खूप आनंद झाला. आता आपला प्लॅन यशस्वी होणार असे त्याला वाटले. आता तो पुढच्या तयारीला गेला. त्याने तसे ऋचाला सांगितलेही. ऋचा देखील पिकनिकसाठी लागणारे साहित्य एकत्रित करत होती. तिलाही खूप आनंद झाला होता. बरेच दिवस झाले ती कुठे गेली नव्हती. आता तर संपूर्ण कुटुंबासोबत जायचे म्हटल्यावर एक वेगळाच आनंद तिच्या मनामध्ये होत होता. संध्याकाळी राजनचे बाबा आणि त्याचा दादा दोघेही घरी आल्यानंतर हात पाय धुऊन लगेच जेवायला बसले. जेवण झाल्यावर थोडा वेळ सगळेजण गप्पा मारत बसले होते. तेव्हाच राजनच्या आईने विषयाला हात घातला.

"खूप दिवस झाले आपण कुठे गेलो नाही. एकतर घरात बसून बसून खूप कंटाळा आलाय. मन कशात रमेना. अगदी नाही नाही ते विचार मनात येत आहेत. त्याचा परिणाम तब्येतीवर होत आहे. त्यापेक्षा आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का? माझे मन रमेल. माझ्या इच्छेखातर तुम्ही मला घेऊन बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जायला हवेत. मी म्हातारी किती दिवसाची. माझ्या इच्छा तुम्ही पूर्ण करणार नाही तर कुणाच्या करणार?" राजनच्या आईने इमोशनल शब्द टाकला आणि तेव्हाच सगळे तिच्या शब्दाला मान देत तयार झाले. राजनचा भाऊ रोहन थोडेसे आढेवेढे घेत होता; पण नंतर आईसमोर त्याचे काही चालले नाही. तो सुद्धा कसानुसा तयार झाला. पिकनिकला जाणार म्हणून सगळेजण आनंदात होते. ऋचाला देखील खूप आनंद झाला. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून ती आनंदात होती. तिच्या चेहऱ्यावर खूप मोठे हास्य होते; पण राजन मात्र चुळबुळ करत होता. त्याने हळूच ऋचाला खुणावले. ऋचाला मात्र काहीच समजेना. ती काय काय म्हणून त्याला म्हणत होती; पण तो जोरात काहीच सांगू शकत नव्हता. राजन तिथून हळूच उठला आणि ऋचाच्या शेजारी जाऊन बसला.

"वहिनी, मानसी घेऊन जायचं आहे ना?" राजन हळू आवाजात म्हणाला. तेव्हा ऋचाच्या लक्षात आले.

"अरे हो, मी विसरलेच. थांब सांगते." ऋचा हळूच म्हणाली.

"मी काय म्हणते, आता मानसी देखील आपल्या कुटुंबाचा भाग बनत आहे तर तिला देखील आपल्या सोबत घेऊन गेलो तर. तुम्हाला काय वाटते?" ऋचा म्हणाली.

"हो हो, चालेल ना. तसेही ती सुद्धा आपल्यात मिसळून जाईल. आपल्या सोबत बाहेर गेल्याने तिचे बंध आणखी घट्ट होतील. तुझी कल्पना चांगली आहे हा. मानसीला आत्ताच फोन करून सांगा. आपण उद्याच रविवार असल्याने सकाळी लवकर निघणार आहोत. जाता जाता तिलाही घेऊ आणि पुढे जाऊ." राजनची आई म्हणाली. आता राजनची आईच म्हटली आहे म्हटल्यावर तिला कोणीच नकार देऊ शकत नव्हते. अशाप्रकारे त्यांचे पिकनिकला जाण्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून राजन आणि ऋचा दोघेही खूप आनंदात होते. ऋचाने आदल्या दिवशीच सगळी तयारी करून ठेवली होती. मोठी इनोव्हा गाडी घेऊन जाण्याचे त्यांचे ठरले होते त्यामुळे राजनचा भाऊ रोहन गाडी चेकिंगसाठी गॅरेजमध्ये घेऊन गेला. आदल्या दिवशीच सगळी धावपळ सुरू झाली; पण फिरायला जाणार म्हणून सगळेजण आनंदात होते.

मानसी देखील त्या सर्वांसोबत येण्यास लगेच तयार झाली होती. तिने देखील तिची तयारी केली होती. दुसऱ्या दिवशी लवकरच निघणार असल्याने रात्री सर्वजण लवकरच झोपी गेले.

******************

सकाळी लवकरच सगळेजण उठले. पिकनिकला जाणार म्हणून एक वेगळाच हुरूप सर्वांमध्ये जमला होता. एक एक जण आवरून तयार होऊन हॉलमध्ये जमत होते. ऋचाने देखील स्वराला तयार करून बाहेर आणून बसवले आणि स्वतः तयार होण्यास गेली. तिने ब्लॅक कलरचा जीन्स आणि टॉप घातला होता. त्या रूपामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. राजनची आई देखील पंजाबी ड्रेस घातली होती. तसे फिरायला जाताना ती वेस्टर्न कपडे घालायची; पण आज मात्र तिला पंजाबी ड्रेस घालावासा वाटला. बाकी सर्व साहित्य घेऊन सगळेजण गाडीत बसले. आता गाडी मानसीच्या घराकडे वळली. मानसीला घेऊन ते पुढे जाणार होते. मानसी सुद्धा तयार होऊन बाहेर येऊन उभी होती. मानसीला गाडीत घेतले आणि गाडी महाबळेश्वरच्या दिशेने धावू लागली. पाठीमागच्या सीटवर मानसी आणि राजन बसले होते. त्यांच्याजवळ स्वरा होती. मधल्या सीटवर ऋचा राजनची आई आणि राजनचा भाऊ बसले होते. पुढे गाडी चालवायला ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी राजनचे बाबा बसले होते. ड्रायव्हरच्या पाठीमागच्या बाजूला राजनचा भाऊ रोहन, त्याच्या शेजारी ऋचा आणि मग राजनची आई असे तिघेजण बसले होते. गाडी महाबळेश्वराच्या दिशेने सुसाट निघाली होती. सगळेजण खूप आनंदात होते. गाणी, गप्पागोष्टी करत सगळे एन्जॉय करत निघाले होते. खूप दिवसांनी असा फॅमिली ट्रिप करायचा त्यांचा योग आला होता आणि प्रत्येक जण यात सहभागी झाले होते. ऋचाला फक्त नवरा बायको पिकनिकला जायला आवडत नव्हते, तर सहकुटुंब पिकनिकला गेल्यावर खूप छान मज्जा येते त्यामुळे तिला कुटुंबासमवेतच जायला आवडायचे.

क्रमशः

🎭 Series Post

View all