शब्द झाले मुके 30
राजन आणि त्याचे कुटुंबीय खूप दिवसांनी पिकनिकला जात होते. एक दिवसासाठी त्यांनी महाबळेश्वर हे ठिकाण निवडले. सहकुटुंब फिरायला जायचे अशी ऋचाची इच्छा असल्याने घरातील प्रत्येक जण जात होते. गाडी भरधाव वेगाने महाबळेश्वरच्या दिशेने जाऊ लागते. गाडीमध्ये गप्पागोष्टी, गाणी सारे काही सुरू झाले होते. हसत खेळत सर्वजण जात होते. तो संपूर्ण दिवस एन्जॉय करायचा असे सर्वांनी ठरवले असल्याने अगदी सुरुवातीपासूनच गप्पा गोष्टींना जणू ऊत आला होता. आपल्या सर्व कुटुंबाला हसते खेळते पाहून ऋचालाही खूप आनंद झाला.
बराच वेळ प्रवास झाल्यानंतर थोडे उजाडले. याचा अर्थ ते सर्वजण भल्या पहाटेच घरातून निघाले होते. त्या ठिकाणी थोडा जास्त वेळ त्यांना राहता यावे इतकीच त्यांची इच्छा होती त्यामुळेच घरातून भल्या पहाटे निघाले होते. थोडे उजाडल्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबवण्यात आली. तिथे सर्वजण भरपेट नाश्ता आणि चहा घेतले. आणि पुन्हा गाडीत बसले. आता नाष्टा पोटात गेल्यानंतर सर्वांना बरे वाटत होते. आता महाबळेश्वरला गेल्यानंतरच जेवण करायचे असे सर्वांनी ठरवले होते. सोबत थोडे फराळाचे सामान असल्यामुळे कोणाला भूक लागली की फराळ करावा असे ठरले.
गाडीमध्ये स्वरा तिच्या बोबड्या बोलाणे गाणी गुनगुणत होती, शिवाय सर्वांना हसवत देखील होती. ते क्षण पुढे सरकूच नाहीत असे सर्वांना वाटत होते. गाडी अगदी व्यवस्थित जात होती. आता घाट लागला होता. घाटातून गाडी जात असताना सर्वांना खूप मज्जा येत होती. सगळेजणच आनंदात होते. थोड्यावेळाने ड्रायव्हरने एका बाजूला गाडी पार्क केली. सगळेजणच आश्चर्यचकित झाले. असे मध्येच ड्रायव्हरने गाडी का पार्क केली असेल? असा प्रश्न सर्वांच्या मनात चालू होता.
"अरे ड्रायव्हर, तू इथे मध्येच गाडी का पार्क केलीस? गाडीला काही झाले का?" राजनच्या बाबांनी ड्रायव्हरला प्रश्न केला.
"नाही काका, मला वॉशरूमला जायचं आहे म्हणून मी गाडी पार्क केली आहे. गाडी इथेच असू दे, मी आलोच." म्हणून ड्रायव्हर तिथून जाऊ लागला.
"अरे, पण गाडी डाव्या साईडला लावायचं ना. इथे उजव्या साईडला का लावलास?" पुन्हा राजनच्या बाबांनी प्रश्न केला.
"अहो काका, डाव्या बाजूला गाडी पार्क केली की लगेच घाट आहे. उगीच काही घातपात नको म्हणून मी इकडे डोंगराच्या आडोशाला गाडी पार्क केली आहे. आणि तसेही मी दोन मिनिटात आलोच." असे म्हणून ड्रायव्हर निघून गेला. ड्रायव्हर गेल्यानंतर पुन्हा गाडीमध्ये गप्पा गोष्टींना ऊत आला होता. सगळेजण गप्पा गोष्टी करण्यात मग्न होते. ऋचाला तर काय करू नि काय नको असे झाले होते. ती खूप आनंदाने सर्वांशी बोलत होती. आता सर्वांनी गाण्याचे भेंड्या खेळायचे ठरवले. राजनचे आई-बाबा देखील त्यामध्ये सामील झाले. कारण मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे असे त्यांना वाटत होते त्यामुळेच मुले जे काही म्हणतील ते सर्व आपण करायचे असे त्यांनी ठरवले होते. गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. दोन दोनचे गट पडले. राजनच्या आई-बाबांचा एक गट, राजनचा भाऊ आणि वहिनीचा एक गट राजन आणि मानसीचा एक गट असे तीन गट पडले. गाण्याच्या भेंड्यांना सुरुवात झाली. अगदी सूर ताल लय सोडून सगळे बिनधास्त गाणी म्हणत होते. एखाद्याला एखादे गाणे आठवले नाही तर दुसरा गट लगेच पुढची गाणी म्हणायला सुरुवात करत होता. त्यामुळे त्यांना खूप मज्जा येत होती. ऋचाला तर नेहमीपेक्षा यावेळी छान वाटत होते. तिलाही खूप आनंद झाला होता. शेवटचे गाणे सर्वजण एकत्र मिळून म्हणू लागले. इतक्यात ड्रायव्हर आला.
"चला, आता इथून साधारण एक अर्ध्या पाऊण तासात आपण पोहोचतोय." असे ड्रायव्हर म्हणाला. तेव्हा सर्वांना खूपच आनंद झाला. ड्रायव्हर गाडीत बसला आणि त्याने गाडी सुरू केली. गाडी आता टर्न घेऊन पुढे जाणार तोच समोरून भरधाव वेगात एक ट्रक येताना दिसली. सगळेजण घाबरले.
"ड्रायव्हर, ड्रायव्हर ट्रक बघ. गाडी थांबव. बाजूला घे." असा एकच आवाज घुमत होता. गाडीत सर्वजण ओरडत होते ते पाहून ड्रायव्हर घाबरला. त्याला काही सुचले नाही. त्याला गाडी थांबवावे की बाजूला घ्यावे हेच समजेना. तो डळमळीत झाला. ते पाहून ट्रक ड्रायव्हरला काही समजेना. त्याचाही कंट्रोल सुटला आणि शेवटी दोघांची धडक झाली. राजन स्वराला धरण्यासाठी शोधत होता तर मानसीने स्वराला तिच्या कुशीत गच्च धरले होते ते पाहून त्याचा मानसीबद्दल विश्वास वाढला. त्याच्या मनात आपसूकच तिची जागा भरली. तो तिकडे पाहत असतानाच त्याचे डो॓ळे आपोआप मिटले गेले.
*******************
जेव्हा राजनचे डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला जाणवले की तो आयसीयूमध्ये होता. 'अरे बापरे! मी इथे कसा आलो? आणि मी इथे आहे तर माझ्या घरचे सगळे कुठे आहेत? सगळे कसे असतील आणि हे सगळे काय होऊन बसले?' असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात सुरू होते. ओरडावे असे त्याला खूप वाटत होते; पण तोंडावाटे आवाज येईना. उठून पळून बाहेर जावे आणि घरचे सगळे कुठे आहे ते पाहावे असे त्याला वाटले; पण त्याला हलताही येत नव्हते त्यामुळे तो हतबल होऊन तसाच पडून राहिला. कोणाला आवाज द्यावा तर त्याचा आवाज बाहेरपर्यंत जाणार नव्हता. त्याला ऑक्सिजन वगैरे लावण्यात आले होते. तो तसाच विचारमग्न होऊन पडला होता. इतक्यात तिथे सिस्टर आल्या. त्यांनी पाहिले की राजनने डोळे उघडले होते. त्यांना खूप आनंद झाला. त्या धावतच डॉक्टरांना बोलावण्यास गेल्या. राजन मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता; पण त्या घाईघाईने डॉक्टरांना बोलावण्यासाठी निघून गेल्या. आता राजन तिथे एकटाच होता.
'स्वरा, आई, बाबा, मानसी, दादा, वहिनी सगळे कसे असतील? माझी ही अवस्था आहे तर त्यांची काय असेल मला तर विचारच करवत नाही. कोणाला विचारू आणि कोणाशी बोलू काही समजेना. इथे तर कोणीच नाही. या रूममध्ये मला एकट्याला ठेवले आहे. सगळे व्यवस्थित असते तर ते मला पाहण्यासाठी आत आले असते; पण ते आले नाहीत. त्यांना आत पाठवले नसेल तर, त्या डॉक्टरांना बोलवण्यास गेले आहेत; पण डॉक्टर लगेच येतील का? हे कोणतं हॉस्पिटल आहे? हे आमच्या शहरातले हॉस्पिटलमध्ये आहे की दुसऱ्या. देवा! काहीच समजेना. फक्त एक कर. माझ्या घरातल्या सर्वांना सुखरूप ठेव. बाकी माझी तुझ्याकडे काहीच इच्छा नाही.' राजन मनातच विचार करत पडला होता. त्याला काही करताच येत नव्हते. इतक्यात तिथे डॉक्टर आले. त्यांनी त्याचे चेकअप करायला सुरुवात केली. आता राजन बऱ्यापैकी ठीक झाला होता, त्यामुळे त्याचा ऑक्सिजन मास्क काढण्यात आला होता. त्याला बाहेर शिफ्ट करण्याची प्रोसेस सुरू केली होती.
"डॉक्टर, हे कोणते हॉस्पिटल आहे आणि माझ्या घरचे सगळे कुठे आहेत? मला इथे का ऍडमिट केले आहे? प्लीज सांगा ना, डॉक्टर." राजन काकुळतीला येऊन म्हणाला.
"तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरे तुम्हाला मिळतील. फक्त आता थोडी विश्रांती घ्या आणि औषध वेळेवर घ्या. तसेही अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही रिकव्हर झाला आहात, त्यामुळे ऑल द बेस्ट. काहीच काळजी करू नका नाहीतर त्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल." असे डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर, प्लीज सांगा ना. मला काय झालंय आणि माझ्या घरचे कसे आहेत? काहीतरी बोला. आणि आता मला कुठे घेऊन जात आहात? माझ्यासोबत कोणी आहे का?" राजन थोडासा आवाज वाढवूनच म्हणाला.
"तुम्ही गेले दोन दिवस झाले इथे हॉस्पिटलमध्ये आहात. 72 तासाची गॅरंटी होती तुमची. तुम्ही 48 तासात खूप चांगले रिकव्हर झाला आहात. आता तुम्हाला आयसीयू मधून बाहेर शिफ्ट करणार आहोत." डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर, माझ्यासोबत कोणी दुसरे येथे ऍडमिट झाले आहे का? माझ्या घरचे बाकी कुठे आहेत?" राजन म्हणाला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा