शब्द झाले मुके 31
राजनला खूप अस्वस्थ वाटत होते. आपल्या घरचे सगळे कुठे आहेत असा मोठा प्रश्न झाला पडला होता. त्याला पहायला अजून कोणीच कसे आले नाही याची तो वाट पाहत होता. डॉक्टरांना तर प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडत होता; पण डॉक्टर त्याला काही बोलत नव्हते. फक्त थोड्या थोड्या प्रश्नांची उत्तरे ते देत होते. बऱ्याच वेळाने जेव्हा राजनला आयसीयू मधून बाहेर स्पेशल रूममध्ये शिफ्ट केले. त्यानंतरही बराच वेळ कोणीच त्याच्याजवळ आले नाही. तो तसाच स्वस्थ पडून होता. काही वेळाने रूमचे दार उघडले. तेव्हा झटकन त्याने तिकडे वळून पाहिले.
छोटी स्वरा धावतच तिथे आली आणि ते हुमसून हुमसून रडू लागली. तिला पाहून राजनला काही समजेना. 'ही एकटीच इथे कशी? बाकी सगळे कुठे गेले?' असा तो विचार करत होता. स्वराला एकटीला पाहून त्याचे हात पाय गळाले. तो काही बोलणार इतक्यात त्याला दारातच मानसी दिसली. मानसीला पाहून त्याला थोडे हायसे वाटले.
"मानसी, थॅंक् गाॅड तू आलीस. बघ ना मगासपासून मी सर्वांना विचारत आहे; पण कुणीच काही उत्तर देत नाहीत. बाकीचे कुठे आहेत? मानसी, तू अगदी ठणठणीत आहेस याचा अर्थ बाकीचे व्यवस्थित असतील ना? स्वरा देखील व्यवस्थित आहे. स्वराला पाहून मला खूप बरे वाटले. बाळा, तुला काही झालं नाही ना?" राजनने स्वराला प्रश्न केला.
"नाही. मी अगदी ठीक आहे." स्वरा म्हणाली; पण ती प्रचंड घाबरली होती. राजनने जेव्हा तिचा हात स्वतःच्या हातात घेतला तेव्हा तिला बरे वाटले. ती थोडीशी हसली.
"मानसी, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना आणि स्वरा सुद्धा ठीक आहे ना? काय झालं? मला अगदी सुरुवातीपासून सांग ना." राजन म्हणाला.
"राजन, तुला मी काय आणि कसं सांगू माझं मलाच समजेना. तू आत्ताच या आजारातून बरा झाला आहेस. प्लीज, तू एकदा घरी चल. मग तुला मी सविस्तर सारे काही सांगते." मानसी म्हणाली.
"नाही मानसी, मला आत्ताच ऐकून घ्यायचे आहे. बाकीचे घरचे कुठे आहेत? सगळे व्यवस्थित आहेत ना? मग ते मला भेटण्यासाठी का आले नाहीत? बोल ना, मानसी. मला खरं खरं सांग." राजन काकुळतीला येऊन म्हणाला.
"राजन, डॉक्टरांनी तुला विश्रांती घेण्यात सांगितले आहे. जर तू व्यवस्थित असशील तरंच बाकी सगळे सुरळीत होणार आहे त्यामुळे तू पहिल्यांदा तुझी काळजी घे. मी आहे ना सगळ्यांची काळजी घ्यायला. तू त्रास करून घेऊ नकोस." मानसी राजनला समजावत होती; पण राजन काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
"तुला काहीच झाले नाही ना? तिथून आपल्याला हॉस्पिटलमध्ये कोण आणले? बोल ना काही तरी बोल ना मानसी." राजन म्हणाला.
"राजन, आपला खूप मोठा एक्सीडेंट झाला होता. एक्सीडेंटमध्ये सगळेजण बेशुद्ध पडले होते. मी स्वराला अगदी पोटाशी धरल्यामुळे तिला काहीच झाले नाही. मलाही थोडीशीच दुखापत झाली. अगदी कोपऱ्याला आम्ही असल्यामुळे आम्ही दोघी सुखरूप होतो. तो इतका मोठा भीषण अपघात होता की कुणालाच काही समजले नाही. मी तर पूर्णपणे घाबरून गेले होते, गोंधळून गेले होते. छोटी स्वरा माझ्यासोबत होती. काय करावे हे मला समजत नव्हते. मी हळूच माझा मोबाईल कसाबसा काढून घेतला. साधे गाडीतून हलताही येत नव्हते. तसाच मोबाईल काढून घेतला आणि माझ्या मैत्रिणीला फोन केला. तिने तिच्या मित्रांना फोन लावून सर्वांना एकत्रित बोलावून घेतले आणि सगळे इथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्सला फोन करून त्यांनी सांगितले. ते सगळे येण्याअगोदर इथे ॲम्बुलन्स आली आणि सर्वांना या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. मी एका दिवसात बरी झाले. स्वराला काहीच लागले नव्हते; पण ती प्रचंड घाबरली होती. ती माझ्यासोबतच होती त्यामुळे काही वेळातच ती ठीक झाली; पण आतून प्रचंड घाबरली आहे. मलाही काही समजत नव्हते. सर्वांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर कोणीतरी एका मैत्रिणीने माझ्या घरी माझ्या बाबांना फोन करून सांगितले. माझा एक्सीडेंट झाला आहे हे समजल्यावर माझ्या बाबांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. त्यांच्यासोबत आई आहे." मानसी एक एक गोष्टींचा उलघडा करून सांगत होती.
"अरे बापरे! मग आता तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे? ते व्यवस्थित आहेत ना आणि माझी आई बाबा कुठे आहेत? मला सांग ना." राजन पुन्हा पुन्हा विचारत होता.
"तुझी तब्येत पूर्णपणे बरी होऊ दे मग मी तुला सांगेन." असे मानसी म्हणाली तेव्हा राजन पुढे काही बोलणार इतक्यातच सिस्टर औषध घेऊन आले.
"आता जेवण करून घ्या आणि औषध वेळेवर घ्या. नाहीतर तुम्ही लवकर बरे होणार नाही. वेळेवर औषध घेतला तरच लवकर बरे व्हाल." तेव्हा मात्र राजन गपचूप उठला आणि मुकाट्याने त्याने चार घास पोटात ढकलले. घरच्यांचे तर काही समजल्याशिवाय त्याला व्यवस्थित जेवण जाणार नव्हते आणि कसे जाईल? घरचे ठीक आहेत की नाहीत याची प्रत्येकाला काळजी ही असतेच ना. तसे त्यालाही होती त्यामुळेच त्याने चार घास पोटात ढकलले आणि औषध घेऊन तो स्वस्थ निजला. त्याला झोप तर लागणारच नव्हती. सारखी मनाची हुरहुर सुरू होती; पण त्याला कोणीच काही सांगेना त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता आणि सांगणार तरी कसे? पूर्णपणे तो आजारातून बाहेर आल्याशिवाय काय घडले हे सांगायचे नाही असे डॉक्टरांनी सर्वांना ताकीदच दिली होती. त्यातच त्याला डोळा लागला. थोड्यावेळाने राजनला जेव्हा जाग आली तेव्हा त्याने पाहिले तर त्याच्याजवळ फक्त स्वरा होती. मानसी तिथून निघून गेली होती. ते पाहून राजाला खूप वाईट वाटले. 'मानसी मला एकट्याला सोडून अशी कशी जाऊ शकते?' म्हणून तो उदास होऊन तसाच बसला होता. त्याने धाडस करून स्वराला मानसीबद्दल विचारले.
"त्या आंटी आहेत ना त्यांनी ही चिठ्ठी इथे ठेवली आहे. मी आलेच असे म्हणून त्या इथून निघून गेल्या." असे स्वरा म्हणाली. राजनने ती चिठ्ठी उचलली आणि तो वाचू लागला.
"हे बघ राजन, हा एक्सीडेंट होण्यापूर्वीची गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. आता माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता हे मी तुला सांगितले; पण तू जेव्हा झोपला होतास तेव्हाच ते हे जग सोडून निघून गेले आहेत हे समजले. खरंतर मी तुला उठवणार होते; पण तुझी तब्येत देखील अशी नाजूक असल्यामुळे मी काही सांगू शकले नाही. तुझ्या कुटुंबाचा सविस्तर आढावा मी तुला पत्रातूनच सांगेन. शिवाय तुझे सगळे रिपोर्ट आले आहेत ते सुद्धा मी पाहिले आहेत. मला इथून पुढे तू कोणत्याच गोष्टी सांगू नकोस. मला इथे थांबता येणार नाही त्याबद्दल खूप सॉरी. नाहीतर मी तुला घरापर्यंत पाठवून मगच जाणार होते; पण अचानक बाबांच्या जाण्याने मला तिकडे जावे लागले. त्यांचे क्रिया कर्म मला करावे लागणार होते. कितीही केले तरी ते माझे बाबा होते आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी त्यामुळे मला सगळी जबाबदारी पूर्ण करावी लागणारच होती म्हणून मी बाबांच्या घरी जात आहे. तू आता माझी वाट पाहू नकोस. तुझ्या आयुष्यात इथून पुढे मी तुला साथ देऊ शकणार नाही. तसेही तुझ्याकडे बक्कळ पैसा आहे. तुला जे हवे ते तू मिळवू शकतोस; पण आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही. काही गोष्टी या नशिबातच असायला हव्यात. काही गोष्टी तुझ्या माझ्या नशिबात नाहीत. मी माझ्या आयुष्याचे वाळवंट करणार नाही. माझ्या पद्धतीने मी माझ्या आयुष्याचा मार्ग निवडला आहे. तू तुझ्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने जाईन. प्लीज, मला विसरून जा. तसेही आपले फार काही दिवसांचे नाते नव्हते; पण तरीही तुझी ओढ मला लागली होती. पण आता मात्र मी तुला साथ नाही देऊ शकत नाही. आत्ता यावेळी माझी खरी गरज माझ्या आईला आहे आणि मी तिकडे जात आहे. पुन्हा एकदा सांगते आय एम रियली सॉरी."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा