शब्द झाले मुके 33

कथा तिच्या कर्तव्याची. कथा एका प्रेमाची.
शब्द झाले मुके 33

राजन खाली पडला तेव्हा सगळे डॉक्टर तिथेच होते त्यामुळे त्याच्यावर ताबडतोब उपचार झाले. काही वेळातच तो शुद्धीवर आला. आता मात्र त्याच्यासमोर सगळे काही अंधार दिसत होता. घरातील सर्वांचा असा अंत झालेला पाहून त्याला समोरचा रस्ता सापडत नव्हता. आता काय करावे? कुठे जावे? कसे करावे? असे अनेक प्रश्न त्याच्याभोवती घोंगावत होते. त्या सगळ्यातून बाहेर कसे पडावे हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता; पण दवाखान्यात अजून किती उशीर बसणार. कधी ना कधी इथून बाहेर पडावे लागणारच आहे. घरी जावे लागणारच आहे. घरामध्ये आई आणि छोटी स्वरा त्याची वाट पाहत बसल्या होत्या. त्या दोघींना कसे सामोरे जायचे, त्यांना कसे आणि किती समजावून सांगायचे असे अनेक प्रश्न त्याला सतावत होते आणि त्या सर्व प्रश्नांच्या गर्तेत तो तिथून उठला आणि घरी जायला निघाला.

आता या अशा परिस्थितीत त्याचे कोणतेच मित्र त्याच्याकडे येऊ शकले नाहीत, त्यामुळे ही सगळी खोटी दुनिया आहे हे त्याला समजून चुकले होते. गरजेला जो मदतीला येतो तोच खरा मित्र हे वाक्य त्याला समोर दिसू लागले. तसेच धडपडत तो रिक्षा करून घरी गेला. घरामध्ये आई आणि छोटी स्वरा त्याची वाट पाहत बसले होते. राजनला घरी आलेले पाहून त्याच्या आईला खूप आनंद झाला. ती तशीच धडपडत त्याच्या जवळ आली आणि तिने राजनला कडकडून मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. छोट्या स्वराला देखील खूप आनंद झाला होता. ती धावत पळत त्याचा जवळ येऊन राजनला तिने मिठी मारली. राजन मात्र तसाच स्तब्ध उभा होता. त्याला कसे रिऍक्ट व्हावे हेच समजेना. तो तसाच हळूहळू आत गेला आणि सोफासेटवर बसला. आता मात्र त्याला पुढे काय हा प्रश्न पडला होता त्यातून मार्ग कसा काढायचा त्याचे मात्र उत्तर त्याला मिळत नव्हते. तो तसाच शांत बसला. थोडा वेळ बसल्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी तिथून गेला. हॉस्पिटलमधून आल्यापासून त्याने एक अक्षरही आईसोबत बोलले नव्हते. आई देखील त्याच्यासोबत काहीच बोलली नाही, कारण आत्ताच तर दवाखान्यातून तो आला होता. लगेच त्याला काही प्रश्न विचारले तर टेन्शन येईल त्यापेक्षा शांत राहिलेले बरे असे म्हणून ती देखील शांत राहिली.

राजन फ्रेश होऊन त्याच्या रूममध्ये बसला होता. त्याला खूप वाईट वाटत होते. त्याने त्याचा हुंदका कसाबसा आवरला होता; पण त्याला आतल्या आत दुःख दाबून ठेवल्यामुळे खूप त्रास होत होता. कोणाजवळ मन मोकळे हे त्याला समजत नव्हते. बऱ्याच वेळाने त्याला मानसीची आठवण झाली. काही करून आपण मानसीला भेटायला हवे. तिच्यासमोर आपले दुःख सांगायला हवे. कितीही झाले तरी ती आपली सहचारिणी आहे, आपल्या आयुष्याचा भागीदारी आहे, आपल्या सुखदुःखात ती नेहमी आपल्याला साथ देणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी तिच्या समोर बोलून मोकळे व्हावे असा त्याच्या मनात विचार आला. त्याने पहिल्यांदा तिला फोन करण्याचा प्रयत्न केला; पण तिचा फोन लागत नव्हता त्यामुळे तिच्या घरी जाऊन तिच्याशी बोलावे, तिला भेटावे त्यामुळे आपले मन मोकळे होईल आणि पुन्हा पुढचा काहीसा मार्ग सापडेल अशा विचाराने राजन मानसीकडे जायला निघाला.

त्याला आता गाडी चालवायची देखील भीती वाटत होती त्यामुळे मानसीकडे जाताना तो रिक्षानेच गेला. घरातून बाहेर जाताना त्याने आईला फक्त लगेच जाऊन येतो इतकेच सांगितले होते; पण कुठे आणि कशासाठी जात आहे यातील काही सांगितले नाही. राजनची आई मात्र तशीच बसून होती. तिला खूप मार लागल्यामुळे काहीच करता येत नव्हते. आपल्या हसत्या खेळत्या घराचे असे का झाले याचे तिला वाईट वाटत होते. आम्ही खरंच कुठे चुकलो का की काय असे तिला वाटत होते. ती त्याच विचारात होती.

राजन मात्र मानसीला भेटून सारे काही मनातले बोलायचे आणि मनसोक्त रडून घ्यायचे. आईला उगीच त्रास कशाला द्यायचा असा विचार तो करत होता. गेल्या गेल्या पहिल्यांदा मानसीच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडायचे आणि मग ती माझ्या डोक्यावरून मला कुरवाळेल आणि केसातून हात फिरवेल. मग मात्र ती मला काही विचारायचा प्रयत्न करेल, तेव्हा मला बोलता येणार नाही म्हणून माझ्यासाठी सांत्वनाचे चार शब्द बोलेल. त्यातून मला छान उभारी येईल आणि मग मी तिला मनातील सारे काही बोलून दाखवेन. मग ती माझ्यासोबत चार गोष्टी बोलेल आणि आपण दोघे मिळून पुन्हा आपले जग निर्माण करू. आईंना आणि स्वराला सांभाळून आपला बिजनेस मोठा बनवू, बाबांचे आणि दादांचे स्वप्न पूर्ण करू, वहिनी जशी होती ना अगदी तसेच मी सुद्धा त्या घराचा आधारस्तंभ बनण्याचा प्रयत्न करेन आणि तुझी राणी बनवून त्या घरामध्ये येईन, मी तुझ्या पाठीशी आहे तू काहीच काळजी करू नकोस असे ती मला म्हणेल आणि मी पुन्हा तिच्या मिठीत शिरून खूप रडेन. आता तर मला तिचाच आधार होता. आईला मी सगळे काही मनातले सांगू शकत नव्हतो. उगीच तिला कशाला टेन्शन. मग आम्ही दोघेही येऊन आईला, बाबा दादा आणि वहिनी बद्दल जे काही घडले ते सविस्तर सांगून तिचे सांत्वन करू शकतो. मानसी आईजवळ बसून आईचे सांत्वन करेल. छोट्या स्वराला ती कुशीत घेईल आणि आपण पुन्हा नव्याने सारे जग उभे करू असे म्हणून आईला देखील ती एक नवी उभारी देईल आणि आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी ती चालून येईल. अशा एक ना अनेक गोष्टी घडून येतील. आमचे घर पुन्हा हसते असेल. मानसी आमच्या घरातील भिंतींना जिवंतपणा आणेल आणि आम्ही पुन्हा आमचे विश्व निर्माण करू. अशा विचारांच्या तंद्रितच राजन मानसीकडे जात होता. त्याचे आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हते. तो आता पुढे काहीतरी चांगले घडेल अशा विचारानेच जात होता. त्याला मानसीकडून खूप काही अपेक्षा होत्या.

विचारांच्या तंद्रीत मानसीचे घर कधी आले हे राजनला समजलेच नाही. तो रिक्षातून खाली उतरला. रिक्षावाल्याला त्याने पैसे दिले आणि धावत पळतच तो मानसीच्या घराकडे गेला. त्याने दारावरची बेल वाजवली आणि मानसीची वाट पाहत तो तिथेच उभा राहिला. काही वेळातच दार उघडले आणि समोर मानसीचे बाबा होते.

"बाबा, मानसी कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे. ती मला भेटायला का येत नाही. एकदाच भेटून गेली त्याच्यावरती फिरकली देखील नाही. मानसी आहे ना घरात?" राजन गडबडीने विचारत आत डोकावून पाहत होता.

"मानसी असली नसली तरीही ती तुला भेटणार नाही. तू इथे कशाला आला आहेस? तुझे तिच्याकडे काय काम आहे मला सांग. मी तिला सांगेन; पण ती तुला भेटणार नाही." मानसीचे बाबा म्हणाले.

"अहो, पण ती मला का भेटणार नाही. माझं खरंच खूप महत्त्वाचे काम आहे. मला तिला भेटणे गरजेचे आहे. प्लीज तिला बोलवा ना." राजन काकुळतीला येऊन म्हणाला.

"ती तुला भेटणार नाही म्हणून एकदा सांगितले ना, मग सारखं सारखं का विचारतोयस? काय काम आहे मला सांग. मी तिला सांगेन; पण तू आता इथून निघून जा." मानसीचे बाबा म्हणाले.

"अहो, पण तिला भेटणे खूप गरजेचे आहे. मला खूप मोठी मदत होईल हो. ती मला का भेटणार नाही? आमचे लग्न होणार आहे आणि तुम्ही तिला भेटू देत नाही." राजन म्हणाला.

"तुमचे लग्न होणार होते; पण आता ते शक्य नाही. ती तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू इथे कशाला आला आहेस. निघून जा. ती तुझे तोंडही पाहणार नाही." मानसीचे बाबा म्हणाले.

"अहो, प्लीज मला खरंच भेटायचे आहे. तिची खूप मोठी मदत होईल. मी तिचे हे उपकार कधीच विसरणार नाही आणि ती माझ्यासोबत लग्न करणार होती आणि इतक्यात निर्णय कसा बदलला!" राजन म्हणाला.

"तुला सांगितले तितकं ऐकायचं. ती तुला भेटणार नाही म्हणजे भेटणार नाही. तू इथून निघून जा, नाहीतर तुला धक्के मारून बाहेर काढावे लागेल." मानसीचे बाबा राजनला ओरडतच म्हणाले; पण राजन काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो जबरदस्तीने आत घुसला, तेव्हा मानसीच्या बाबांनी त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर ओढले. तरीही राजन काही ऐकायला तयार नाही. तो डायरेक्ट आत गेला.
क्रमशः

🎭 Series Post

View all