शब्द झाले मुके 34
राजन मानसीच्या बाबांना बाजूला हटवून तिच्या घरामध्ये शिरला. आत गेल्यानंतर तो जोरात मानसीला हाक मारू लागला; पण मानसी काही आली नाही. तो इकडे तिकडे तिला शोधत होता. त्याने आत जाऊन पाहिले तर कोणीच नव्हते मग तो पुन्हा मानसीला जोर जोरात हाक मारू लागला. मानसीचे बाबा त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते; पण त्याची नजर फक्त मानसीवर होती. ती कुठे दिसते याकडेच तो लक्ष ठेवून होता.
"तू आधी बाहेर हो म्हटलं ना. तुला मानसी तुला भेटणार नाही. तू उगीच इतका आटापिटा करत आहेस. तू जा तुझ्या घरी आणि तुझा मार्ग निवड. मानसीने तिचा मार्ग निवडला आहे. उगीच तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा येऊ नकोस. तिने तुला झिडकारले आहे. तिच्या आयुष्यातून तुला काढून टाकलं आहे. तू जा इथून. उगीच इथे तमाशा करू नकोस." मानसीचे बाबा राजनला म्हणत होते.
"मला फक्त एकदा मानसीला भेटायचे आहे. प्लीज, मला भेटू द्या. तुम्ही सांगा ना तिला. ती तुमचे सगळे ऐकेल. ती एकदा मला भेटली की मी इथून निघून जाईन. फक्त एकदा भेटायला सांगा." असे म्हणून राजन मानसीच्या बाबांना विनवत होता; पण ते देखील त्याचे काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
"तुला इथून जा म्हणून सांगितलंय ना?" असे म्हणून मानसीच्या बाबांनी राजनचा हात ओढला आणि त्याला घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला; पण राजन काही केल्या बाहेर जात नव्हता.
"एक मिनिटं बाबा, त्याला थांबू द्या." असे म्हणत मानसी वरून खाली आली. तिच्या चेहऱ्यावर थोडेसेही दुःख, वेदना काहीच नव्हते ते पाहून राजनला खूप आश्चर्य वाटले. तरीही आपण तिला सांगू या भावनेने राजन पटकन मानसीजवळ गेला. त्याने मानसीला निरखून पाहिले. तिच्या डोळ्यांमध्ये त्याला कसल्याच भावना दिसल्या नाहीत.
"अगं बघ ना, बाबा काय बोलत आहेत? तू माझ्यासोबत येणार आहेस ना? माझे आयुष्य सुखकर करण्यासाठी तू मला साथ देणार आहेस ना? आपण मिळून रंगवलेली स्वप्नं आपण आता पूर्ण करणार आहोत. तू मला प्रत्येक क्षणी साथ देणार असे बोलली होतीस तशी तू आता मला साथ देणार ना? अगं, मी खूप एकटा पडलोय. मला तुझ्या आधाराची गरज आहे. माझ्यासोबत येशील ना मानसी?" राजन मोठ्या आशेने मानसीकडे पाहत होता.
"आता त्या गोष्टी खूप मागे गेल्या आहेत. वेळही निघून गेली आहे आणि तुझ्याजवळ असलेले सारे काही.. मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही. मी माझा वेगळा मार्ग निवडला आहे. तू माझ्या आयुष्यातून निघून जा आणि मला विसर." मानसी सहजच म्हणाली.
"विसर म्हणजे? इतक्या सहजासहजी विसरणे शक्य आहे का? मी कसा विसरू सांग ना. सध्या मी एकटा पडलोय. मला तुझ्या आधाराची गरज आहे, तुझ्या साथीची गरज आहे आणि अशावेळी तू मला विसरून जा म्हणतेस! अगं, आपण किती छान स्वप्नं पाहिली होती. ती पूर्ण करण्याची आपल्याला संधी मिळतेय, काहीतरी करून दाखवण्यासाठी आपल्याला संधी मिळत आहे. तू फक्त माझ्या पंखांना बळ दे, मी बघ कसा आकाशात झेप घेईन. तू मला साथ दे मी सारे काही विश्व निर्माण करेन; पण विसर म्हणून बोलू नकोस ग. मला तुझ्या साथीची, आधाराची खूप गरज आहे. प्लीज, माझ्यासोबत चल." राजन काकुळतीने मानसीला म्हणत होता.
"मी आणि तुझ्यासोबत! छे! अजिबात नाही. मी तुझ्यासोबत यायला तुझ्याकडे सध्या काय आहे? काहीच तर नाही. मग मी तुझ्यात असे काय बघून तुझ्याकडे येऊ बोल. सध्या तरी तुझ्याकडे काहीच नाही आणि भविष्यातही तू मला हवे असलेले सुख देशील याची काही शाश्वती नाही." मानसी म्हणाली.
"अगं मानसी, काही दिवसातच सगळ्या सुखांची लोळण तुझ्या पायापाशी आणून टाकतो. फक्त तू माझ्यासोबत चल. आपण दोघे मिळून या संसाराचा गाडा चालवू. तू माझ्यासोबत असशील तर मला काहीच अवघड नाही. तू फक्त माझ्यासोबत यायला तयार हो. तुझ्यासमोर सारे काही मी नतमस्तक करेन." राजन म्हणाला.
खरंच राजनचे मानसीवर अगदी मनापासून प्रेम होते. तो तिच्यासाठी काहीही करण्यास तयार होता; पण मानसीचे खरंच त्याच्यावर प्रेम होते का असा आता प्रश्न पडायला लागला आहे. मग तिने हे सगळे केले कशासाठी? प्रेमासाठी की आणखी कशासाठी? काही समजायला वाव नव्हता. राजन मानसीला विनवत होता; पण मानसी त्याच्याकडे फक्त पाहत होती. तिला खरंच राजनसोबत जायचे नव्हते, की ती कोणाच्या तरी दबावाखाली आली होती काहीच समजेना. आता मानसीला उचलून पळवून न्यावे असेही राजनच्या मनात आले; पण मानसी स्वतःच यायला तयार नाही तर तिला पळवून तरी कसे नेणार असा विचार आल्यावर तो पुन्हा शांत झाला. आता मात्र त्याला काय करावे सुचेना. एक तर मानसी त्याच्यासोबत यायला तयार नाही. तिचे बाबाही तिला सोडायला तयार नाहीत आणि इथे डोंगराएवढे दुःख घेऊन मी तिच्याकडे आलो आहे. त्याचे ते दुःख तिने कमी करावे ही त्याची मुळीच अपेक्षा नव्हती; पण त्याला त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी तिने सांत्वनाचे दोन शब्द त्याच्या सोबत बोलावे एवढीच त्याची इच्छा होती. तिने प्रेमाने त्याच्यासोबत दोन शब्द बोलले की त्याला खूप मोठे बळ मिळणार होते. त्याचे साठलेले दुःख मोकळे करण्याचा ती एकमेव मार्ग होती; पण तीच आता त्याच्या सोबत यायला नकार देत आहे.
मानसीच्या मनात नक्की आहे तरी काय असा प्रश्न राजनला पडला होता. तो तिला सारखे विचारण्याचा प्रयत्न करत होता; पण मानसी डायरेक्ट काही बोलत नव्हती. तिला तसा कोणीतरी मिळाला असेल का असा प्रश्नही त्याच्या मनात येऊन गेला; पण मानसी राजनवर इतकेच अपार प्रेम करायची की ती असे काही करेल यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता.
"मानसी, फक्त काही दिवस तू माझ्यासोबत चल. मी तुला माझ्यासोबत लग्न कर असे देखील म्हणणार नाही; पण मला याक्षणी तुझ्या आधाराची गरज आहे ग. प्लीज मानसी, चल ना." असे म्हणून राजन मानसीला विनवत होता; पण मानसीच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले नाहीत.
"मी तुझ्यासोबत कशासाठी यायचं? तुझ्याकडून मला असे काय मिळणार आहे? तुझ्याकडून मला काहीही मिळणार नाही, उलट त्यामध्ये माझे नुकसानच होणार आहे. मी तुझ्यासोबत यायला अजिबात तयार नाही." मानसीने राजनला ठणकावून सांगितले.
"पण का? आणि कशासाठी? काहीतरी ठोस कारण असेलच ना? काही दिवसापूर्वी तर तू माझ्या प्रेमामध्ये अखंड बुडाली होतीस. अच्छा, तेव्हा माझ्याकडे सारे काही होते ना! आता माझ्याकडील सगळी संपत्ती निघून गेली आहे तर तू तुझे रंग रूप दाखवायला सुरू केलेस आणि तुम्ही मुली अशाच असता ग. जिथे संपत्ती असते तिकडे धावता. भले तो मुलगा कसा का असेना; पण तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही कधीच जात नाही. संपत्ती पाहून प्रेम करणाऱ्या मुली मला माझ्या आयुष्यात नको आहेत. आता मी तुला अजिबात विनवणार नाही. तुझा मार्ग मोकळा आहे. तुला जिकडे जायचे आहे तिकडे निघून जा आणि याचे प्रायश्चित्त मी भोगणार." असे म्हणून राजन रागातच तिथून निघून जाऊ लागला.
"संपत्ती फक्त एवढीच गोष्ट नाही! पैसा काय तू पुन्हा मिळवू शकशील; पण याच्या पेक्षाही खूप मोठं काही तू गमावलं आहेस." मानसी तुच्छतेने म्हणाली.
"हो, मला माहित आहे. मी माझे कुटुंब हरवून बसलो आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती माझी सोबत सोडून निघून गेली आहेत; पण आता जे काही माझ्या आयुष्यात आहेत त्यांना सांभाळायचं कर्तव्य देखील माझ्यावरच आहे." राजन हळवे होऊन म्हणाला.
"ते सुद्धा नाही. त्याहूनही खूप काही गमावलेस." असे मानसी म्हणताच राजन विचारांमध्ये गुंतला.
"तू आयुष्यात कधीच बाप होऊ शकणार नाहीस." मानसी बोलून गेली तेव्हा मात्र राजनच्या पायाखालची जमीनच सरकली.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा