शब्द झाले मुके 35

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 35

राजन मानसीला विनवत होता; पण मानसी काही केल्या त्याच्यासोबत जायला तयार नव्हती, त्यामुळे राजन खूप संतापला होता. त्याला पुढे काय करावे हे सुचत नव्हते. मानसीकडून त्याला खूप काही अपेक्षा होत्या; पण मानसीने आता त्याचा अपेक्षाभंग केला होता, त्यामुळे तो स्वतःची समजूत काढत होता.

"तू इतकी स्वार्थी असशील असे मला वाटले नव्हते. तू माझ्यावर मनापासून प्रेम करत असशील असेच मला वाटले होते आणि म्हणूनच तुझ्या त्या प्रेमासाठी मी इथपर्यंत आलो. जर तू अशी स्वार्थी आहेस हे मला आधी समजले असते तर मी इथपर्यंत आलो देखील नसतो. आता तू तुझ्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने. तुला इतकी पैशाची लालच आहे हे मला आज समजले. असे अनेक पैसे मी तुझ्यावर उधळेन; पण काही अवधी मी घेईन. पण तुला तितकाही अवधी नको आहे. ठीक आहे राहू दे. तुझा मार्ग मोकळा आहे. तू तुझ्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने जाईन. शेवटी कितीही केले तरी एकट्याने एकट्यासाठीच लढायचे असते. तिथे आपली लढाई ही आपलीच असते आणि आपल्यासाठी असते. दुसरे कोणी आपल्या मदतीला येणार नसतो." राजन खूप काही बडबडत होता; पण मानसीने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही. ती फक्त कसंनुसं हसली आणि तोंड फिरवून आत जाऊ लागली.

"तू इतक्या खालच्या पातळीची बाई असशील असे मला वाटले नव्हते. इथून पुढे मी तुझे तोंडही पाहणार नाही. तू खरंच खूप वाईट मुलगी आहेस." असे भरपूर काही मानसीच्या जिव्हारी लागेल असे राजन बोलत होता तेव्हा मात्र मानसीला अजिबात राहवले नाही.

"तुला खरे काय ते समजले तर तू इथे उभा देखील राहू शकणार नाहीस." असे म्हणत मानसी हसली. ते पाहून राजनला खूप वाईट वाटले.

"काय खरं आहे बोल तरी. मला तरी समजू दे." राजन जीव मुठीत घेऊन म्हणाला. असे नेमके कोणते कारण होते जे मानसीला आणि राजनला दूर करणार होते. मानसी त्याच्यापासून दुरावली होती. असे नक्की काय घडले होते हे राजनला जाणून घ्यायचे होते आणि म्हणूनच तो जीव मुठीत घेऊन मानसीला ते कारण सांगण्यास सांगत होता.

"तू या जन्मात कधीच बाप होऊ शकणार नाहीस." असे मानसी म्हणताच राजनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आपण खाली कोसळतोय की काय असे वाटत होते. इतक्यात टेबलाचा आधार घेऊन तो कसाबसा उभा राहिला. त्याच्यासमोर अंधार दाटून आला होता. मानसी असे का बोलत आहे याचा त्याला अर्थ लागत नव्हता. असे नक्की काय झाले आहे त्यामुळे मानसी इतकी टोकाची गोष्ट बोलत आहे हे देखील त्याला समजत नव्हते. तो त्याच्या विचारात मग्न झाला होता. त्याच्यासमोर आता पूर्णपणे अंधार दाटला होता. आपल्या आयुष्यातील सगळं काही संपलं असे त्याला वाटत होते. त्याच्या डोळ्यावर अश्रू ओघळत होते; पण त्याने स्वतःला सावरून घेतले. याचा शहानिशा केल्याशिवाय ही गोष्ट खरी कशी समजायची अशी शंका त्याच्या मनात चुकचुकली.

"मानसी उगीच काहीही बरळू नकोस. तोंडाला येईल ते बोलू नकोस. असे कसे शक्य आहे आणि ही गोष्ट तुला कशी समजली? बोल लवकर मानसी." म्हणून राजन मानसीवर ओरडला.

"तू दवाखान्यात होतास तेव्हाच मला ही गोष्ट समजली होती. तू दवाखान्यातून घरी आलास खरा; पण तुझे रिपोर्ट व्यवस्थित पाहिलेस का? त्या रिपोर्ट्समध्ये स्पष्ट तसा उल्लेख आहे. तुझ्या ज्या काही टेस्ट झाले आहेत त्यामध्ये तसे आढळून आले आहे. तुझ्या इन्टर्नल बाॅडी इन्जर्डमुळे स्पर्म काऊंन्ट कमी आले आहेत आणि त्यामुळेच तू कधीच बाप होऊ शकणार नाहीस असे त्या रिपोर्टमध्ये आहे. हवे असेल तर तू घरी जाऊन पुन्हा एकदा व्यवस्थित रिपोर्ट पहा, मग तुला समजून येईल की उगीचच कशाच्याही आधाराने बोलणं नाही." मानसी तुच्छतेने बोलली आणि राजन मात्र तिच्याकडे टक लावून पाहत बसला. आता काय करावे हे त्याला समजेना.

"या सगळ्याचा शहानिशा मी करेनच; पण त्याआधी तू याच एका गोष्टीसाठी माझ्यासोबत येत नाही आहेस की आणखी काही गोष्ट आहे ते स्पष्ट सांग. जर का आणखी काही गोष्टी असतील तर त्या सुद्धा तू स्पष्टपणे सांगितलेस तर मला समजतील." असे राजन म्हणाला. तेव्हा मात्र मानसी शांत झाली.

खरंतर राजन हा कधीच बाप बनू शकणार नाही याचा अर्थ मानसीला देखील मातृत्वाचे सुख मिळणार नाही. मानसी देखील आई बनवू शकणार नाही आणि त्यामुळेच तिने राजनसोबत येण्यास नकार दिला. कारण तिला मातृत्वाचे सुख अनुभवायचे होते शिवाय या एक्सीडेंटमध्ये राजनमध्ये आणि कोणकोणते फाॅल्ट निघाले आहेत हे तिला माहीत नव्हते त्यावेळेस त्या संशयाने ती त्याच्यासोबत जाऊ शकत नव्हती. तिला कोणताच निर्णय घेणे सोपे नव्हते. खरंतर या अशा परिस्थितीत मानसीच्या जागी कोणतीही स्त्री असती तरी तिला निर्णय घेणे अवघड झाले असते. तसेच मानसीला झाले होते. त्या दिवशी जेव्हा तिने राजनचे सर्व रिपोर्ट पाहिले तेव्हाच ती खूप अस्वस्थ झाली होती आणि त्यामुळेच ती तिथून परत घरी आली आणि राजनला ती कधीच भेटायला गेली नाही; पण जरी ती लग्न करणार नसली तरी एक मित्रत्वाच्या नाते तिने ठेवले असते तरीही काही बिघडले नसते. राजनला तिने आपसुकच मदत केली असती तर तो तिची ती मदत आयुष्यभर विसरला नसता; पण मानसीने तसे अजिबात केले नाही. ती स्पष्टपणे त्याच्यासोबत येण्यास नकार देत होती आणि त्यामुळेच राजनला तिचा राग येत होता. तो त्याक्षणी काहीही करू शकत नव्हता, कारण त्याचे हात दगडाखाली सापडले होते आणि अशा परिस्थितीत त्याला साथ देणारे दुसरे कोणीच नव्हते त्यामुळेच तो शांत राहिला होता.

मानसी राजनसोबत येण्यास मुळीच तयार नव्हती शिवाय तिचे बाबाही तिला सोडण्यास तयार नव्हते. राजनचे कोणतेच मित्र त्याच्या मदतीसाठी येण्यास तयार नव्हते. या सर्व परिस्थितीसमोर राजन हतबल झाला होता. शिवाय घरी जाऊन कधी एकदा ते रिपोर्ट पाहतोय असे त्याला झाले होते. त्याने शेवटचे मानसीला विचारावे म्हणून एक प्रयत्न केला.

"मानसी, तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही. हे बघ, नंतर तुला या गोष्टीचा पश्चाताप होता कामा नये की राजन आला होता तो विनवत होता. तरीही मी गेले नाही असे तुला वाटायला नको. इतके सारे होऊ नये मी तुला एक संधी देतोय एक शेवटचे विचारतोय तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही. अगं, लग्न राहू दे बाजूला. एक मैत्रीण म्हणून तरी तू मला मदत कर. मला साथ दे." असे म्हणून राजन मानसीला विनवत होता.

"मी तुला एकदा सांगितलेलं आहे ते समजत नाही का? मी तुझ्यासोबत आजच काय आयुष्यात कधीही येणार नाही. मी माझा मार्ग निवडला आहे, तू तुझ्या मार्गाने जा." असे म्हणून मानसीने तोंड फिरवले तेव्हा मात्र राजनला या जगात कोणीच कुणाचे नसते हे जाणवले. इथून पुढे कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवायचा असेल तर त्या व्यक्तीची चांगलीच पारख करायला हवे. रंग रूपावर विसंबून राहून त्या व्यक्तीवर प्रेम करण्यापेक्षा त्या व्यक्तीची मनाचे तपासणी करायला हवी हे जाणवले.

'आपल्या अडचणीच्या वेळी आपल्या मदतीला येते तीच आपली खरी व्यक्ती असते, शिवाय आपले सारे दोष सामावून घेऊन आपल्या मदतीसाठी धावते तीच खरी आपली व्यक्ती; पण जगामध्ये अशा व्यक्ती मिळणे खूप दुर्लभ आहे. अशी व्यक्ती चुकून एखादीच असते, नाहीतर बाकी सगळे दुनिया स्वार्थी आहे.' असा विचार करतच त्याने घरचा रस्ता धरला.
मानसीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राजनला समोरचे काही दिसेनासे झाले. त्याचे डोळे भरून आले होते. डोळ्यावाटे हळूहळू एक एक अश्रू ओघळत होते. तो तसाच रस्त्यावर आला. त्याने कुठे रिक्षा, टॅक्सी दिसते का ते पाहिले; पण त्याला तिथे एकही वाहन दिसेना. तसाच चालत तो पुढे पुढे जाऊ लागला. समोर एक रिक्षा त्याला दिसली आणि ती पकडून तो घरी जायला निघाला.
क्रमशः


🎭 Series Post

View all