शब्द झाले मुके 36

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 36

असंख्य अडथळे पार करत भरल्या डोळ्यांनी राजन घरामध्ये आला. घरामध्ये आल्यावर लगेचच त्याने रूममध्ये जाऊन सगळे रिपोर्ट पाहिले तर मानसी जे म्हणत होती तेच त्या रिपोर्टमध्ये लिहिले होते. याचा अर्थ मानसी खरे बोलत होती. 'अरे देवा! इतके मोठे संकट पुढे येऊन ठाकले आहे आणि आता हे नवीनच.' असे म्हणून तो पूर्णपणे कोसळून गेला होता. त्याच्या समोर दुःखाचा डोंगर उभा ठाकला होता. आता यापुढे काय हे त्याला दिसतच नव्हते. समोर पूर्ण अंधारच दिसत होता. तो तसाच रडत तिथे बसला होता. आईला कसे सामोरे जायचे हे त्याला समजत नव्हते.

बराच वेळ झाला राजन येऊन; पण तो आल्यापासून त्याच्या खोलीतच आहे, बाहेर आला नाही असे म्हणून राजनच्या आईची घालमेल होत होती. रूममध्ये जाऊन पहावे का असे त्याला वाटले; पण पुन्हा ती शांत झाली. बराच वेळ झाला तरी लेकरू खोलीतून काही बाहेर आले नाही म्हणून राजनची आई खोलीकडे जाण्यास वळली. तिच्या पाठोपाठ छोटी स्वरा देखील होती. त्या दोघी खोलीत गेल्या. त्यांनी डोकावून पाहिले तर त्यांना तिथे कुठेच राजन दिसला नाही. राजनच्या आईला खूप आश्चर्य वाटले. राजन रूममध्ये तर आला होता मग तो गेला कुठे? सकाळपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते. तो सकाळपासून उपाशीच होता आणि आता बाहेर जाऊन आला तर विश्रांती घ्यायची सोडून काहीतरी खाऊन औषध घ्यायचे सोडून कुठे गेला असेल? या विचारातच राजनची आई दाराशीच उभी होती. तिने थोडे आत जाऊन पाहिले तर तिला तिथे राजन दिसलाच नाही. पुन्हा ती थोडे आत गेली. बाथरूममध्ये वगैरे तो कुठे दिसतो का हे पाहण्यासाठी ती रूममध्ये गेली तर बेडच्या बाजूला कोपऱ्यात राजन बसलेला तिला दिसला. तिला थोडेसे धस् झाले. तो चक्कर येऊन तर पडला नसेल ना? तो असा कसा कोपऱ्यात बसला असेल अशा विचारातच तिथे गेली आणि तिने पाहिले तर राजन निपचिप दवाखान्यातील रिपोर्ट घेऊन बसला होता. ती हळूच त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"राजन बाळा, इथे असा का बसला आहेस? तुला काय झाले आहे?" असे तिने विचारले तेव्हा राजनने फक्त तिच्याकडे पाहिले आणि तो तसाच पुन्हा शून्यात हरवून शांत बसला. आता मात्र राजनच्या आईला खूप भीती वाटू लागली. तिने पुन्हा त्याचा हात धरला आणि त्याला बेडवर बसवले.

"राजन, तुझ्या आईला सांगणार नाहीस का? अरे, मी तुझी आई आहे. जे काही असेल ते मला सांग. बोलून मन मोकळे कर. असे मनात काही ठेवून घेऊ नकोस." राजनची आई राजनला समजावत होती. तेव्हा मात्र राजनचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यावाटे आसवे ओघळू लागले. त्याने कसाबसा हुंदका आवरला होता; पण आता आई इतके काही बोलत होती की त्याचे मन त्याला मोकळे करणे भाग पडले होते. मनातील सारे काही आईशी बोलून मोकळे व्हावे असे त्याला वाटले; पण त्याच्या तोंडावाटे एकही शब्द फुटेना.

"आई, सगळं संपलं गं." असे म्हणून त्याने एक हंबरडा फोडला आणि त्याचे असे रडणे पाहून त्याच्या आईला काही समजेना. तिच्याही डोळ्यावर अश्रू ओघळू लागले. स्वरा तर घाबरून तिच्या आजीला येऊन बिलगली; पण तिलाही काही समजेना.

"बाळा, तू असे का बोलतोयस? असे बोलू नकोस ना. काहीही संपले नाही. आपण सगळे काही व्यवस्थित करू. तू असे बोलू नकोस. तू धीट रहा. असे हतबल होऊ नकोस. आपली परिस्थिती पुन्हा व्यवस्थित होईल." राजनची आई त्याला समजावत होती.

"आई अगं, दादा, बाबा आणि वहिनी तिघेही आपल्याला सोडून निघून गेले ग. आता आपण काय करायचं? असे म्हणून पुन्हा त्याचा बांध फुटला. ते ऐकून मात्र राजनच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिला कसे रिऍक्ट व्हावे हेच समजेना. तिला खूप मोठा धक्का बसला होता. असे काही झाले असेल हे तिचे मन मान्यच करत नव्हते; पण काही वेळाने तिने देखील खूप मोठा हंबरडा फोडला. त्या दोघांचे असे रडणे पाहून स्वरा मात्र पूर्णपणे घाबरून गेली होती. ती एका बाजूला कोपऱ्यात रडत बसली होती. तिच्याकडे लक्ष द्यायला या दोघांनाही भान नव्हते, कारण हे दोघेही पूर्णपणे दुःखात बुडून गेले होते. छोट्या स्वराला मात्र नक्की काय घडते हे समजत नव्हते. ती खूप घाबरून गेली होती. त्या दोघांचे असे रडणे तिने पहिल्यांदाच पाहिले होते. घराचे असे काय झाले असे तिला वाटत होते. बराच वेळ राजन आणि राजनची आईने एकमेकांच्या गळ्यात पडून रडून घेतले. आता मात्र त्या दोघांसमोर पुन्हा अंधार दाटला होता. त्या दोघांना तिथे आधार देणारे दुसरे कोणीच नव्हते. फक्त नातलग नाही तर अशावेळी कोणीच साथ दिले नाही. ज्यावेळी यांची परिस्थिती चांगली होती त्यावेळी सर्वजण येऊन जात होते; पण आता अशा वेळी सर्वांनी पाठ फिरवली होती. त्यांना आता नव्याने सुरुवात करायला लागणार होते. राजन मान खाली घालून बसला होता. 'आता आपणच काहीतरी करायला हवे, आपणच आपला आधार बनायला हवे. दुसरे कोणी आपल्यासाठी येणार नाहीत. आपणच एक पाऊल पुढे टाकायला हवे.' असा विचार करून राजनच्या आईने राजनला आधार द्यायचे ठरवले.

"हे बघ बाळा, जे काही झाले ते झाले; पण आता इथून पुढे आपल्याला पुढचे आयुष्य ढकलायला हवे. आपण वाचलो आहोत म्हणजे आपल्याला यातून सावरायला हवे. तू काही काळजी करू नकोस. टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. आपण नव्याने चांगली सुरुवात करू. तुझे आणि मानसीचे लग्न लावून देऊ. तुम्ही छान संसार करा. मी सुद्धा स्वरा सोबत राहीन आणि आपण पुढे एक पाऊल टाकू." असे म्हणून राजनची आई राजनला समजावत होती; पण राजन आईला आता कुठल्या शब्दात काय सांगणार होता. हे दुःख आईने पचवले; पण इथून पुढचे दुःख ती पचवू शकेल की नाही त्याला समजत नव्हते. त्याच्या समोर फक्त अंधाराने अंधारच होता. आर्थिक राहू दे; पण मानसिक बळही कोणी देऊ शकत नव्हते, इतका तो हतबल झाला होता.

"राजन बाळा, तू काही काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. तू पुन्हा हे सारे काही उभे करशील यावर माझा विश्वास आहे. तू काहीही काळजी करू नकोस. हे सारे काही पुन्हा निर्माण होईल. तू एक काम कर. मानसीला बोलावून घे आणि तुम्ही दोघे लवकरात लवकर लग्न करा. अगदी साधेसे तुमच्या लग्न लावून देऊ आणि मग बघ पुन्हा घर कसे हसते खेळते होईल. ती तुला नक्कीच साथ देईल, तुला मदत करेल. त्यामुळे तू पुढचा कोणताही विचार करू नकोस. झाल्या गोष्टी आता पुन्हा परत येणार नाहीत त्यामुळे पाठीमागचा विचार न करता आपण पुढे जायला हवे." असे म्हणून राजनची आई राजनला धीर देत होती; पण राजनच्या डोळ्यातून मात्र आसवे गळत होते.

"आई, मी आत्ताच मानसीकडे जाऊन आलो आहे. मला सुद्धा असेच सगळे वाटले होते. या सगळ्या गोष्टी तुला सांगण्यापूर्वी तिला सांगून माझे मन मोकळे करावे आणि मग तुला येऊन या सगळ्या गोष्टीचे सांत्वन करावे अशी माझी मनापासून खूप इच्छा होती आणि त्यासाठीच मी मानसीकडे गेलो होतो." असे म्हणून राजन पुन्हा शांत झाला.

"मग काय झाले? मानसी उद्या येतो म्हणाली का? ती कधी येणार आहे? बरं, पुढची तयारी कधी करायची? आपण एका मंदिरात अगदी साधेच तुमचे लग्न लावून देऊ. तिथून पुढे तुम्ही दोघे मिळून सगळे उभे करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला साथ देईन. तुम्ही काही काळजी करू नका. शिवाय स्वरा सुद्धा आपल्या सोबत असेलच. तिची जबाबदारी सुद्धा तुम्हालाच घ्यायला लागणार आहे. परमेश्वराने अजून पुढे काय वाढून ठेवले काय माहित?" असे म्हणून राजनची आई पुन्हा राजनला समजावत होती.

"आई, तू शांत रहा. तू काही त्रास करून घेऊ नकोस. सगळे काही ठीक होईल. बघू जे काही होईल ते होईल." असे म्हणून राजनही त्याच्या आईला समजावत होता.

"मला सांग, मानसी तुझ्यासोबत कधी लग्न करणार आहे. अरे, थोडी का होईना त्याची तयारी करावी लागणारच आहे ना. आपण मंदिरात जाऊन भटजीची भेट घेऊन येऊ. एकत्र चांगला मुहूर्त पाहूयात आणि लग्नाची तयारी करून लग्न उरकून टाकू." राजनची आई म्हणाली.

"आई, मानसी येणार नाही. आई, तिने इकडे येण्यास नकार दिला आहे." असे राजन म्हणताच राजनची आई स्तब्ध झाली.
क्रमशः

🎭 Series Post

View all