शब्द झाले मुके 38

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 38

राजनला त्याची आई जे काही बोलत आहे ते सगळे समजत होते; पण तो सध्या वेगळ्या टेन्शनमध्ये होता. त्याची आई नॉर्मल बोलत होती ते पाहून त्याला प्रचंड राग आला आणि तो आईला वाट्टेल ते बोलला. खरंतर त्याचे असे रिऍक्ट होणे साहजिकच होते. सध्या प्रचंड दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळला होता आणि त्याच विचारात तो होता; पण त्याची आई तरी काय करणार? तिला यातील एक अक्षरही माहीत नव्हते म्हणून तर ती त्याबद्दल बोलत होती. एका आईला आपल्या मुलाची काळजी वाटणे साहजिकच होते. त्यानुसारच ती बोलत होती; पण राजनचा राग अनावर झाला आणि तो त्याच्या आईवर ओरडला. ते पाहून त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ते पाहून राजनला खूप वाईट वाटले. आपल्यामुळे आईच्या डोळ्यातून पाणी आले हे पाहून त्याला आणखी वाईट वाटले. तो तसाच शांत झाला आणि आईचा हात हातात घेऊन तिचे सांत्वन करू लागला.

"अगं आई, तुला कसे सांगू? तुला सांगितले तर तू ते टेन्शन पचवू शकणार नाहीस. तुला खूप वाईट वाटेल. आई, तू अजिबात काळजी करू नकोस." राजन आईला म्हणाला.

"मी नाही काळजी करणार. उलट माझ्यासोबत बोलून तुझे मन मोकळे होईल. तुला बरे वाटेल आणि हवं असेल तर मी तुला काही सल्ला देईन. तू तुझे मन मोकळे कर. जे काही असेल ते सर्व काही मला सांग." राजनची आई म्हणाली.

"आई, तुला कसे सांगू?" असे म्हणून राजन रडू लागला. त्याचे डोळे रडून रडून सुजले होते. त्याच्या तोंडावाटे एकही शब्द फुटत नव्हता. त्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्याला समजावत होती.

"आई, तुला कसे सांगू? मी कधीच बाप बनू शकणार नाही." असे म्हणताच राजनच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यावाटे अश्रू ओघळू लागले. नाही, हे तू खोटे बोलत आहेस. हे खरं नाही ना? सांग बघू. राजन, हे कसे शक्य आहे? नाही, हे सगळे खोटे आहे." रडतच ती म्हणाली.

"आई, मी हे खरं बोलतोय. हे बघ रिपोर्ट. रिपोर्टमध्ये सगळे काही स्पष्ट लिहिले आहे. आई, हे खरे आहे." असे राजन म्हणू लागला. आता मात्र त्या दोघांकडे काहीच शब्द नव्हते.

"आई, अगं मला आयुष्यात कोणीच बाबा म्हणू शकणार नाही. बाबा म्हणजे काय असतं ते मी कधीच अनुभवू शकणार नाही. मग तूच मला सांग मी कसे काय लग्न करू शकतो? बोल ना आई." असे म्हणत राजन रडू लागला. राजनच्या आईकडेही शब्द नव्हते. तीसुद्धा तशीच मान खाली घालून रडत होती. आता मात्र त्या दोघांच्याही समोर फक्त आणि फक्त अंधार होता.

स्वरा आधीपासूनच पूर्ण घाबरून गेली होती. आता मात्र तिने स्वतःला सावरले होते. ती तिच्या जागेवर उठली आणि राजनच्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या तोंडातून नकळत बाबा असा शब्द गेला आणि ते दोघेही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले.

"बाबा, तू का रडतोयस?" असे स्वरा म्हणाली आणि त्या दोघांनाही अंधारात कुठेतरी काजवाचा प्रकाश पडल्याचे जाणवले. स्वराच्या तोंडून तो शब्द ऐकताच राजनच्या अंगावर शहरे उमटले. त्याचे डोळे पुन्हा भरून आले. आता मात्र स्वराशी कसे बोलायचे हे त्या दोघांना समजेना.

"स्वरा बाळा, तुझा बाबा आता या जगामध्ये नाही. तो देवबाप्पाकडे गेला आहे. तुझी आईदेखील तिकडेच गेली आहे. आजोबा सुद्धा देवदर्शनासाठी निघून गेले आहेत." असे म्हणून राजनच्या आईने तोंडाला पदर लावला.

"अगं आजी, हा काय माझा बाबा. फक्त मला आई तेवढी यायची बाकी आहे." असे स्वराच्या तोंडून शब्द ऐकताच ते दोघेही अवाक् होऊन तिच्याकडे पाहू लागले.

"आजी, मला काही समजत नसले तरी आता काका जे काही बोलला ते मला थोडे थोडे समजले. तो म्हटला ना की मला कोणी बाबा म्हणू शकणार नाही, म्हणून मी त्याला बाबा म्हणायचं असं ठरवलं आहे." असे स्वरा म्हणाली आणि त्या दोघांच्याही डोळ्यातून पाणी आले. खरंच, म्हणतात ना! मुलींना लवकरच समज येते ती अशाप्रकारे स्वराला समज आली होती. इतक्या लहान कोवळ्या वयात तिला इतके मोठे ज्ञान कसे आले असेल? पण आता इथून पुढे इवल्याशा स्वराने त्या दोघांना सावरून घेतले होते. आता मात्र स्वरासाठी जे काही करायचे ते करायचे असे त्या दोघांनीही ठरवले होते, कारण इथून पुढचे आयुष्य जगण्याची तीच तर एक उमेद होती.

***********************

इतक्यात राजनचा मोबाईल वाजला आणि तो भानावर आला. त्याचे डोळे रडल्यामुळे सुजले होते. त्याने पटकन फोन उचलला. तो फोन त्याच्या घरून स्वराचा होता.

"बाबा, तुम्ही आज किती उशीर केलात? तुम्ही लवकर येणार होतात ना? मला बागेत घेऊन जाणार होता. तुम्ही तसे मला प्रॉमिस देखील केले होते." छोट्या स्वराचा आवाज ऐकून त्याला थोडे हलके वाटले.

"हो बेटा, आलोच मी." असे म्हणून राजनने मोबाईल खिशात ठेवला आणि तो जायला निघाला. तो त्याच्याच तंद्रित होता. त्याला शेजारी मेघना बसली आहे आणि तिच्याही डोळ्यावाटे अश्रू ओघळत आहेत हे दिसलेच नाही. तो तसाच गाडीत बसला आणि निघून गेला. त्या बागेमध्ये त्या बाकावर मेघना एकटीच बसली होती. ती देखील विचारांच्या तंद्रितच होती. एक व्यक्ती इतके सगळे कसे सहन करू शकत असेल याची तिला प्रचिती आली. मी माझे कर्तव्य म्हणून ओरडून जगाला सांगत होते; पण ही व्यक्ती तर इतके सगळे कर्तव्य निभावत असताना तिच्या तोंडातून चकार शब्दही कधी फुटला नाही. असे अनोखे व्यक्तिमत्व मला लाभले माझे भाग्यच आहे. खरंच, या माणसाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. इथून पुढे मी याचा जाॅब कधीच सोडणार नाही असे म्हणून मेघना घरी जायला निघाली.

बागेतून बाहेर आल्यानंतर कुठे रिक्षा वगैरे दिसते का हे ती पाहत होती; पण बराच वेळ झाला तिथे एकही रिक्षा आली नाही. ती सारखी घड्याळामध्ये पाहत होती. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. बहिणीला फोन करून सांगावे म्हणून ती फोन करू लागली; पण त्या ठिकाणी तिच्या मोबाईलला अजिबात रेंज नव्हता, त्यामुळे तिचा जीव घाबरला होता. थोडे पुढे चालत जावे अशा विचाराने ती हळूहळू पुढे जात होती. बराच वेळ चालून गेल्यानंतर तिला तिथे एक रिक्षा दिसली. रिक्षात बसून ती घरी जायला निघाली. घरी येत असतानाही तिच्या मनामध्ये असंख्य विचारांच्या गर्दीत ती हरवून गेली होती.

घरी जाऊन पहिल्यांदा आईसोबत फक्त गप्पा मारायच्या. दिवसभराचे काय घडले ते तिला सांगायचे आणि बहिणी सोबत संध्याकाळचा स्वयंपाक करताना तिलाही मनातील बोलून रिकामे व्हायचे असे तिने ठरवले होते. घराच्या अगदी जवळच आल्यावर ती रिक्षातून खाली उतरली आणि तिने संध्याकाळसाठी भाजी खरेदी केली. ती चालतच घरी जायला निघाली. घरी जात असताना आज ऑफिसमध्ये आणि बागेमध्ये जे काही घडले ते सगळे तिला आठवत होते. आज तिला घरी जायला खूप उशीर झाला होता; पण तरीही ती थकली नव्हती ना घाबरली होती. ती अगदी व्यवस्थित जात होती. इतक्यात तिच्या शेजारच्या काकू तिला तिथे दिसल्या.

"काय ग मेघना, आज नेहमीपेक्षा उशीर केलास. कुठे गेली होतीस की काय?" काकूंचा रोखठोक तिला समजला होता.

"अहो काकू, आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती ना त्यामुळे मला उशीर झाला. तसे दोन महिन्यातून एकदा ऑफिसचे मीटिंग असतेच. त्या दिवशी थोडा उशीर होतो." मेघना म्हणाली.

"बरं ठीक आहे." असे म्हणून त्या काकू निघून गेल्या आणि मेघना तिच्या घराकडे वळली. घरात गेल्यानंतर तिची नजर तिच्या आईला शोधू लागली. तसे रिक्षातच तिने बहिणीला फोन लावला होता; पण तिच्या बहिणीने फोन उचलला नाही याचा अर्थ ती कुठेतरी बिझी असेल असा तर्क तिने लावला होता. आता ती तिच्या आईला शोधत होती.
क्रमशः

🎭 Series Post

View all