शब्द झाले मुके 39
राजन नेहमीप्रमाणे ऑफिसला आला होता. किंबहुना नेहमीपेक्षा थोडा लवकरच आला होता, कारण तसे त्याचे ऑफिसमध्ये महत्त्वाचे कामही होते. खूप महत्त्वाची मिटिंग आज होणार होती आणि त्याची महत्त्वाची फाईल मेघनाकडे होती. राजन ऑफिसमध्ये येऊन अर्धा तास झाला होता तरीही अजून कोणीच ऑफिसमध्ये आले नव्हते. तसा तो ऑफिस भरण्यापूर्वी एक तास आधीच आला होता. तेव्हा इतक्या लवकर ऑफिसमध्ये कोण कसे येईल. तो मिटिंगमधील मुद्दे बाजूला काढत मिटिंगची तयारी करत होता. हळूहळू एक एक जण ऑफिसमध्ये येऊ लागले. राजन मात्र त्याच्याच कामांमध्ये गुंतला होता. ऑफिसचे टायमिंग होऊन गेले तरीही मेघना अजून ऑफिसला आली नव्हती. राजन मेघना येण्याची वाट पाहत होता. मिटिंगची महत्त्वाची फाईल तिच्याकडे असल्यामुळे शिवाय काल त्यांच्यात जी काही चर्चा झाली त्यावरून ती आज लवकरच ऑफिसला येईल असा तर राजनने तर्क लावला होता; पण ऑफिसची वेळ होऊन गेली तरीही अजून मेघना ऑफिसला आली नव्हती.
राजनसाठी त्याच्यापेक्षा ती मीटिंग खूप महत्त्वाची असल्याने तो खूप चिडला होता. मेघना ऑफिसला आली नाही तर तिला ऑफिसमधून कायमचे काढून टाकायचे असे त्याने ठरवले होते. आता मात्र त्याचा संयम संपला होता. त्याचा मेघनावरचा राग वाढत चालला होता. इतक्यात दारावर टकटक असा आवाज आला. नक्कीच मेघना असणार असे त्याला वाटले आणि त्याने रागानेच कम इन असे म्हटले. राजनचे डोके फाईलमध्ये असल्याने समोर कोण आले आहे याकडे त्याने पाहिले नाही.
"इतका का उशीर झाला? तुम्हाला सांगितले आहे ना आज महत्त्वाची मिटिंग आहे तर लवकरच यायचे म्हणून. कित्येकदा सांगूनही तुला कळत नाही का? महत्त्वाची मिटिंग असताना देखील तुला उशीर कसा होऊ शकतो? आता हे रोजचेच झाले आहे. मला तर याची सवय झाली आहे. मला एक गोष्ट सांग, तुला या कामावर ठेवायचे आहे की नाही. तसे असेल तर आत्ताच तू हा जॉब सोडू शकतेस." राजन रागाच्या भरात बोलत होता.
"सर, मी टिना. ते आज मेघना ऑफिसला येऊ शकणार नाही म्हणून तिने ही फाईल माझ्याकडून पाठवली आहे. आज मिटिंगसाठी ही फाईल लागणार आहे असे तिने सांगितले आहे. ही फाईल देण्यासाठी मी आत आले आहे. सर, मी रोज वेळेतच ऑफिसला येते. प्लीज, मला नोकरीवरून काढू नका." ती मुलगी घाबरतच म्हणाली.
"ओके, ती फाईल टेबलवर ठेवा आणि तुम्ही जा." असे राजन म्हणाला.
"पण सर, मी रोज ऑफिसला वेळेतच येते. प्लीज, मला नोकरीवरून काढू नका." टिना म्हणाली.
"ठीक आहे, काढत नाही. आता जा तुमच्या कामाला." राजन वैतागून म्हणाला. खरंतर त्याला मेघनाचा प्रचंड राग आला होता. ती आज ऑफिसला यावी आणि अजून तिच्यासोबत बोलणे व्हावे असे त्याला मनापासून वाटत होते; पण आज तर त्याच्या अपेक्षेपेक्षा काही वेगळेच घडत होते.
'आज मेघना ऑफिसला का आली नसेल? कदाचित ती सुद्धा माझी परिस्थिती पाहून माझ्या आयुष्यातून निघून गेली असेल! कदाचित तिलाही माझ्यापेक्षा माझ्या पैशावर प्रेम चढले असेल? तसे किती केले तरी प्रत्येक स्त्रीला आई व्हावे असे वाटतच असते, तसेच मेघना याला अपवाद नाही. तिच्याही काही अपेक्षा असतील, तिचेही स्वप्नं असेल. आपण कुणाला बंधन घालू शकत नाही. कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. कोणी स्वच्छेने आपल्या आयुष्यात आले तर ठीक नाहीतर आपण आपले एकटेच बरे. मेघना तशी वाटत नव्हती; पण ती देखील मानसी सारखीच निघाली. असो, ज्याचा प्रश्न. आता आपल्या आयुष्यामध्ये मेघनाला अजिबात थारा नाही. शेवटी प्रत्येक व्यक्ती ही स्वार्थासाठीच आपल्या जवळ येते. आपल्या सोबत असते. एकदा का आपले काम झाले की मग आपल्या आयुष्यातून निघून जाते; पण निस्वार्थी मनाने एखाद्याच्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही विरळाच असते. तशी व्यक्ती म्हणजे मेघना असे मला वाटत होते; पण ते साफ चुकीचे आहे. मेघना देखील त्यातलीच एक निघाली. तिच्यामध्ये वेगळपण असे काहीच नाही. असो." असे म्हणत राजन त्याच्या मिटिंगच्या तयारीला लागला; पण त्याच्या मनामध्ये असलेले मेघनाचे विचार तो थांबवू शकत नव्हता. त्याचे मन मिटिंगसाठी स्थिर होत नव्हते. तो बराच प्रयत्न करत होता; पण ते काही केल्या त्याचे मन लागत नव्हते.
शेवटी कशीबशी राजनने मिटिंग संपवली. मेघनाने पेपरमधील मुद्दे छान मांडले होते आणि त्याचे प्रेझेंटेशनही अगदी व्यवस्थित केले असल्यामुळे त्या लोकांना काही त्रास झाला नाही. समोरच्या पार्टीला हे प्रेझेंटेशन खूप आवडले आणि त्यांनी तिथल्या तिथे डील फायनल केली. राजनला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले, कारण त्या मिटिंगमध्ये त्याचे मन स्थिर नव्हते शिवाय त्यांने कोणते मुद्दे मांडले हे त्याच्या लक्षातही आले नाही; पण तरीही समोरच्या पार्टीने डील फायनल केले हे ऐकताच तो अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहू लागला.
"राजन सर, तुमचे प्रेझेंटेशन खूप छान होते. हे जे काही तुम्ही मुद्दे काढलेत ते खूप छान आहेत. मला खूप आवडले आणि हे पेपर वर्क पाहूनच मला ही डिल फायनल करावीशी वाटली." असे समोरची व्यक्ती बोलताच राजनला मेघनाची आठवण झाली.
'इतक्या छान अभ्यासपूर्वक मेघनाने हे मुद्दे काढले होते त्याचा कंपनीसाठी फायदा झाला आहे, मग तिला मी कामावरून कसा काढू शकतो? जाऊ दे. किती दिवसांची सुट्टी घेणार आहे घेऊ दे; पण पुन्हा या ऑफिसमध्ये तिची गरज आहे." असे म्हणून राजन पुन्हा शांत झाला. समोरची पार्टी लगेच निघून गेली; पण राजनचे मन काही केल्या स्थिर होत नव्हते.
'मेघनाला भेटल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही.' असे म्हणून तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला. 'आज संध्याकाळी तिच्या घरी जावे का? तिला भेटून यावे का? नक्की कोणत्या कारणासाठी ती ऑफिसला आली नसेल? हेच कारण आहे की आणखी काही कोणत्या अडचणीत त्याची सापडली नसेल ना?' अशा एक ना अनेक विचार राजनच्या मनात येत होते. त्या दिवशी ती डील फायनल झाल्यामुळे होणारा आनंद तो अनुभवू शकत नव्हता. त्याचा तो पूर्ण दिवस मेघनाच्या विचारांमध्येच निघून गेला.
'मी तिच्याबद्दल इतका का विचार करतोय? खरंतर तिचा माझ्याशी काही एक संबंध नाही. ती माझ्या आयुष्यात येवो अगर न येवो. माझे तिच्यावर मुळीच प्रेम नाही. तर मी तिचा का विचार करत बसलो आहे? जाऊ दे. आपण आपल्या कामांमध्ये लक्ष द्यायला हवे.' असा विचार करत राजन त्याच्या कामाला लागला. तरीही संध्याकाळी मेघनाच्या घरी जाऊन यावे अशा विचार पक्का करून तो कामात गुंग झाला. काम करता करता तो इतका रमला की ऑफिस सुटून बराच वेळ झाला तरी त्याला समजले नाही. काही वेळाने तेथील कर्मचारी जेव्हा त्याच्या केबिनमध्ये आला तेव्हा राजन भानावर आला. त्याने घड्याळात पहिले तर सात वाजले होते. अरे बापरे! बराच उशीर झालाय. तसेही आपल्याला मेघनाकडे जाऊन घरी जायचे आहे असा विचार करून राजनने त्याची बॅग घेतली आणि तो घरी जाऊ लागला. आज येताना गाडी त्याने स्वतः आणली होती. ड्रायव्हरला तो सोबत आणला नव्हता, कारण त्याच्या आईला मंदिरात जाण्यासाठी ड्रायव्हरला घरी ठेवून तो गाडी घेऊन आला असल्याने मेघनाच्या घरी जाण्यास त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. या राजनने गाडी पार्किंग मधून काढली आणि तो मेघनाच्या घरी जायला निघाला.
मेघनाचे घर जवळ येताच त्याच्या मनाची धाकधूक वाढली. तो तसाच मेघनाच्या घरासमोर गेला. त्याने घरासमोर गाडी लावली आणि आत जाऊ लागला. राजनची गाडी दारासमोर आलेली पाहून आजूबाजूचे सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. त्याला खूप अवघडल्यासारखे वाटू लागले. तो तसाच आत गेला. आत जाऊन पाहतो तर मेघनाच्या घराला कुलूप होते. आता हे सर्वजण कोठे गेले असतील? असा विचार करत तो काही क्षण तेथे थांबला. त्याने मेघनाला फोन लावला; पण मेघनाने त्याचा फोन उचलला नाही. आता मात्र राजनच्या रागाचा पारा चढला.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा