Login

शब्द झाले मुके 40

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 40

राजन मेघनाच्या घरासमोर येऊन थांबला होता; पण मेघनाच्या घराला कुलूप होते. ते पाहून त्याचा रागाचा पारा चढला. 'आता याक्षणी तिच्या घरातील सर्व जण गेले कुठे? मेघना आज ऑफिसला आली नाही; पण ती घरात देखील नाही याचा अर्थ हे सगळेजण कुठे बाहेर गेले आहेत का? की आणखी काही? आता कुणाकडे चौकशी करू?' असे म्हणून राजनने मेघनाला फोन लावला, तर मेघनाने फोन उचलला नाही. आता मात्र त्याच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली. तो प्रचंड चिडला. रागाच्या भरात मेघनाचे तोंड पुन्हा कधीच पाहणार नाही असे त्याने ठरवले आणि तो घरी जायला निघाला. इतक्यात शेजारचे काका त्याच्याशी बोलायला आले.

"अरे नमस्कार, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे का? नाही म्हणजे तुम्ही आलात आणि लगेच निघालात म्हणून विचारतोय." काका म्हणाले.

"हो काका, ते मेघनाला भेटायचे होते. म्हणजे त्या ऑफिसला आल्या नाहीत. काही सिरीयस प्रॉब्लेम आहे का हे विचारायचे होते." असे राजन म्हणाला.

"मेघना होय, ती तर हॉस्पिटलमध्ये आहे." काका म्हणाले.

"काय! कोणत्या हॉस्पिटलमध्ये? आणि काय झाले आहे?" राजनने काळजीने विचारले.

"काही नाही. तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली ना, मग त्यांना घेऊन ती हॉस्पिटलमध्ये गेली होती. डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करून घेतले असल्यामुळे ती तिथेच थांबली आहे." असे ते काका म्हणाले. तेव्हा राजनचा राग शांत झाला. त्याने त्या काकांकडे हॉस्पिटलचे नाव वगैरे विचारून घेतले आणि तो हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. हॉस्पिटलमध्ये जात असताना त्याचे मन शांत झाले होते. राजन हॉस्पिटलमध्ये जात तर होता; पण त्याला त्याच्या आईचा फोन आला, त्यामुळे तो घरी जायला निघाला. घरी गेल्यावर तो पाहतो तर काय त्याच्या आईच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता. छोटी स्वरा सुद्धा खूप आनंदात होती. ते पाहून राजनला काहीच समजले नाही.

"अरे राजन, आलास तू. मी तुझीच वाट पाहत होते बघ." राजनची आई म्हणाली.

"हो आई, तू मला इतक्या तातडीने का बोलावून घेतलेस? माझे खूप महत्त्वाचे काम होते. मी तिकडे जात होतो आणि तू लगेच बोलावून घेतलेस. काही महत्त्वाचं काम होतं का? तुझी तब्येत बरी आहे ना?" राजनने प्रश्नांचा भडिमार सुरू केला.

"अरे, तू आधी ये तरी. इथे शांत बस. तुला सगळे काही मी सांगेन. खूप खूप आनंदाची बातमी आहे." राजनची आई म्हणाली.

"आनंदाची बातमी! म्हणजे आई तुला काय म्हणायचे आहे? तू आणि काही घोळ घातलेला आहेस का?" राजनने संशयाने विचारले.

"अरे नाही रे, तू ये तरी आधी इथे." असे म्हणत राजनच्या आईने राजनचा हात धरला आणि त्याला खुर्चीत बसवले. हे सगळे पाहून राजन आश्चर्यचिकित झाला. तो आश्चर्याने त्याच्या आईकडे पाहू लागला. स्वरा मात्र खूप आनंदाने त्या दोघांकडे पाहत होती.

"अरे राजन, मेघनाने या लग्नाला होकार दिला आहे. ती अगदी मनापासून या लग्नाला तयार झाली आहे." हे ऐकताच राजनला खूप आनंद झाला; पण तो आनंद व्यक्त करू शकत नव्हता. आनंदाने उभा राहून तो आईला काही बोलणार इतक्यातच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. राजनच्या मोबाईलवर मेसेज आला होता. काही महत्त्वाचा मेसेज आहे का हे पाहण्यासाठी राजनने मोबाईल पाहिला, तर त्याच्या आईच्या अकाउंटमधून जवळपास लाखभर रुपये ट्रान्सफर झाले होते. 'आईने हे पैसे कोणाला ट्रान्सफर केले असतील आणि इतक्या जलद! असे का? आई तर मला काहीच बोलली नाही. काही लग्नासाठी खरेदी तिने आतापासूनच सुरुवात केली की काय? अशा एक ना अनेक विचारांच्या गर्तेत राजन हरवून गेला.

राजनची आई खूप आनंदात दिसत होती. त्याने तिच्याकडे पाहिले. तो त्याच्या आईजवळ गेला आणि आईला म्हणाला. "आई, तू तुझ्या अकाउंटमधून पैसे कोणाला ट्रान्सफर केले आहेस?"

राजनची आई खूप आनंदात होती, त्यामुळे आनंदाच्या भरात तिने सगळे काही खरे खरे राजनला सांगून टाकले. "अरे, ते पैसे मी मेघनाला ट्रान्सफर केले आहेत. तिची आई दवाखान्यात ऍडमिट आहे ना? तिला थोडी पैशाची गरज होती म्हणून मी लगेच देऊन टाकले." राजनची आई असे बोलताच राजनच्या पायाखालची जमीन सरकली.

मेघना फक्त पैशासाठी या लग्नास तयार होत आहे! मेघनाला पैसा हवा होता आणि म्हणूनच तिने आईला माझ्याशी लग्न करणार आहे असे सांगितले. याचा अर्थ तिचे माझ्यावर मुळीच प्रेम नाही. नक्कीच हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे. हे खरोखर लग्न होऊ शकत नाही. काहीही असू दे, मला हे लग्न अजिबात करायचे नाही. मेघना इतकी स्वार्थी असेल असे अजिबात वाटले नाही. तिला तिच्या आईला वाचवण्यासाठी पैसे हवे होते म्हणून ते पैसे माझ्या आईकडून घेऊन ती या लग्नासाठी तयार झाली आहे. खरंच, हे खूप चुकीचे आहे. मी मेघनाला कधीच माफ करू शकणार नाही. तिने हे सारे काही स्वार्थासाठी केले आहे. आता इथे येऊन ती फक्त प्रेमाचा देखावा करेल; पण मी तिच्या जाळ्यामध्ये अजिबात फसणार नाही. तिने कितीही प्रयत्न केले तरीही मी तिच्याकडे ओढला जाणार नाही, कारण हा हे लग्न फक्त स्वार्थासाठी होत आहे. असे लग्न करण्यापेक्षा न झालेलेच बरे. असा विचार करून राजन काही निर्णय घेणार इतक्यात तिथे स्वरा आली आणि तिने येऊन राजनला घट्ट मिठी मारली.

"बाबा तुम्ही माझ्यासाठी मेघनाशी लग्न करणार आहात. मला खरंच खूप आनंद झाला आहे. मेघना आई, खरंच खूप चांगली आहे. मी खूप खुश आहे." असे म्हणून स्वरा तिथून निघून गेली. स्वराच्या चेहऱ्यावरील ते हास्य पाहून राजन विरघळून गेला. 'आपण हे सगळे काही स्वरासाठी करत आहोत, मग आपल्याला इतके का वाईट वाटत आहे? आपली जी काही सत्यपरिस्थिती आहे ती आपण मेघनाला सांगितली आहे. जे सत्य आहे ते सांगितले आहे. तिच्यापासून काहीही लपवले नाही. तरीही ती त्या लग्नासाठी तयार झाली आहे! याचा अर्थ तिला या सगळ्या गोष्टी मान्य असणारच, नाही का? ती तर हे पैशासाठी करत आहे म्हटल्यावर तिला या गोष्टींचा काहीच संबंध नाही.' असे म्हणून राजनचा पुन्हा रागाचा पारा चढला; पण तरीही तो शांत झाला. राजन बाहेर गेला. त्याची आई देखील खूप आनंदात होती. हे त्याने पाहिले आणि तो त्याच्या आईजवळ गेला.

"आई, मी लग्न करणे हे गरजेचेच आहे का? असा देखील मी खूप आनंदात आहे. मग तू का माझ्या मागे हात धुऊन लागली आहेस." राजन म्हणाला.

"अरे बाळा, आता सगळे काही व्यवस्थित होत आहे. मी इकडे देखील तयार झाले आहे. स्वरा सुद्धा आनंदात आहे आणि तू मध्येच हे काय बोलत आहेस? ते काही नाही. तुला हे लग्न करावेच लागणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. सगळे काही व्यवस्थित पार पडेल. स्वराला तिची आई मिळेल आणि तुला तुझी पत्नी. त्यामुळे तू आता कोणताही विचार करू नकोस. मला आता लग्नाची सगळी तयारी करावी लागणार आहे, त्यामुळे तू आता काहीही बोलू नकोस. तू फक्त शांत रहा." असे म्हणून राजांची आई आनंदाने तिथून निघून गेली. आईचा आणि स्वराचा आनंद हिरावून घेण्यात काहीच अर्थ नाही. खूप दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर इतका मोठा आनंद झळकत होता, हे पाहून राजन या लग्नाला तयार झाला.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राजन ऑफिसला गेला. त्याने ऑफिसमध्ये जाऊन पाहिले तर आज ऑफिसला मेघना आली होती. ते पाहून तो चकित झाला. तिची आई तर हॉस्पिटलमध्ये होती आणि ही ऑफिसला लगेच आली कशी? हा प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळत होता. राजन त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्याने मेघनाला आत बोलावले. मेघना आत गेली खरी; पण ती राजनच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हती. मुळात ती काहीच बोलली नाही. राजनही फक्त तिच्याकडे पाहत होता. तो तिच्यासोबत काहीच बोलला नाही. त्याला फक्त तिचा राग येत होता आणि तो राग कसा काढावा याचा विचार तो करत होता.
क्रमशः