शब्द झाले मुके 41
राजन त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्याने मेघनाला आत बोलावून घेतले. मेघनाला खरंतर याची जाणीव होतीच की राजन त्याला बोलावून चार शब्द सुनावणार, त्यामुळे ती थंड डोक्याने आत गेली आणि राजन समोर निपचिप उभी राहिली. राजनने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या रागाचा पारा पूर्णपणे चढला होता. तिला काय काय बोलू आणि काय नको असे त्याला झाले होते. त्याला मेघनाचा प्रचंड राग आला होता. खरंतर ही सारे काही पैशासाठी करत आहे असे त्याला वाटत होते; पण तो काहीच बोलला नाही. फक्त तिच्याकडे पाहत उभा राहिला. ते पाहून मेघनाला काही समजेना.
"मिस मेघना, तुमच्याकडून अशी काही अपेक्षा नव्हती. मला सगळे काही माहित झाले आहे." राजन असे म्हणाला; पण मेघनाला यातील काहीच समजले नाही. खरंतर तिला राजनकडून वेगळ्या गोष्टीची अपेक्षा होती; पण राजन मात्र काही वेगळेच बोलत होता. इतक्यात दारात दुसरी एक व्यक्ती आल्यामुळे त्यांना ते बोलणे तिथेच थांबवावे लागले.
ती व्यक्ती गेल्यानंतर राजनने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. "तुमच्या आईची तब्येत आता कशी आहे?" राजन इतकेच बोलून शांत राहिला.
"सर, कालपेक्षा आज तिची तब्येत थोडी बरी आहे म्हणूनच मी आजपासून ऑफिसला येत आहे." मेघना म्हणाली.
"खरंतर ऑफिसला येण्याची काहीच गरज नव्हती. तसेही तू माझ्या आईला शब्द दिला आहेस. आता तुला काही न मागताच सगळे काही मिळणार आहे. तर तू हे सगळे कोणत्या गोष्टीसाठी करत आहेस? मला माहित आहे मी हे फक्त स्वरासाठी आणि माझ्या आईसाठी करत आहे." राजन चिडून बोलला; पण मेघनाला मात्र नक्की काही समजले नाही.
"सर, मला काही समजले नाही." मेघना स्पष्टपणे म्हणाली
"आता तुला जॉब करण्याची काहीच गरज नाही." राजन म्हणाला.
"पण का सर, काय झाले? आता माझ्या आईची तब्येत बरी आहे." असे मेघना न समजल्यासारखे म्हणाली.
"आता लग्न होणार आहे म्हटल्यावर तुला जॉबची काय गरज? तुला तर स्वराची आणि माझ्या आईची काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे तू आत्तापासूनच घरी राहिलीस तरी चालेल." राजन स्पष्टपणे म्हणाला.
"पण सर, मी तर तुमच्या आईंना सांगितले आहे की मी लग्नानंतरही जॉब करणार आहे." मेघना म्हणाली.
"आणि माझी आई हो म्हणाली!" राजन आश्चर्याने म्हणाला.
"हो. त्यांना काहीच अडचण नाही. तसेही मी माझ्या आईसाठी आणि बहिणीसाठी हा जॉब कंटिन्यू करणार आहे. आणि माझा जो काही पगार येतो तो माझ्या आईला देणार आहे असे मी सुरुवातीलाच तुमच्या आईंना सांगितले होते. तेव्हा त्या ठीक आहे असे म्हणाल्या." मेघनाने जे काही असेल ते स्पष्टपणे सांगितले.
"जर तुला माहेरची इतकी काळजी असेल तर या लग्नाला तू तयार कशाला झालीस? तुला जर पैशाची गरजच होती तर मला सांगायचे. मी तुला जितके हवे तितके पैसे दिलो असतो; पण अशी खोटी आश्वासन सांगून आणि इतक्या नियम व अटी घालून हे लग्न करण्याची काहीच गरज नव्हती." राजन आवाज चढवून बोलला.
"नाही. मी स्वराची आणि आईंची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. त्यांना कोणताच त्रास होणार नाही याची खबरदारी घेईन, शिवाय घरही अगदी व्यवस्थित सांभाळेन; पण मला स्वाभिमानाने जगायचे आहे म्हणून ही नोकरी पुढे कंटिन्यू ठेवायची आहे." मेघना म्हणाली.
"इतकेच स्वाभिमानाने जगायचे असते तर माझ्या आईकडून पैसे का घेतले असते?" राजन रागातच म्हणाला आणि त्याने तोंड फिरवले, इतक्यात पुन्हा दारावर टप् टप् असा आवाज झाला.
"सर, त्या क्लायंटचा फोन आला होता. ते लगेचच मीटिंगसाठी येत आहेत तेव्हा तुम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंगसाठी तयार रहाल का?" असे ऑफिसमधील एक व्यक्ती बोलली. तेव्हा राजन झटकन त्याच्या टेबलवरील फाईल घेऊन बाहेर गेला आणि तो कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन बसला. राजनच्या मनात असंख्य विचारांनी घेरावा घातला होता. त्याला अजूनही मेघनाचे मन समजले नव्हते. 'इकडे तर स्वाभिमानाच्या मोठमोठ्या गोष्टी बोलते आणि दुसरीकडे माझ्या आईकडूनच पैशाची मागणी करते! नक्की हिच्या मनात आहे तरी काय?' असा प्रश्न राजाला पडला होता; पण समोरून दुसरी पार्टी आल्यामुळे त्याला मिटिंगमध्ये लक्ष देणे गरजेचे होते. इकडे मेघनाला देखील राजन काय बोलत होता ते समजले नव्हते. त्याच्या आईचे आणि राजनचे काय बोलणे झाले हे देखील तिला माहीत नव्हते, त्यामुळेच ती गोंधळून गेली होती.
**************
घरामध्ये स्वरा आणि तिची आजी दोघी लग्नाच्या तयारीला लागल्या होत्या. मेघनाची आई हॉस्पिटलमधून घरी आली की सगळेजण एकत्र बसून लग्नाची बोलणी करणार होते; पण हे लग्न होणार हे मात्र नक्की असल्याने त्या दोघी आनंदाने लग्नाच्या तयारीला लागल्या होत्या. मेघनाला देखील खूप आनंद झाला होता; पण तिला तिची आई हॉस्पिटलमध्ये असल्याने तिची काळजी लागून राहिली होती.
दोन दिवसांनी मेघनाच्या आईला डिस्चार्ज मिळाला आणि त्या घरी आल्या. त्यानंतर राजनची आई स्वरा व राजनला घेऊन लग्नाची बोलणी करण्यासाठी मेघनाच्या घरी गेली. मेघनाच्या आईला इतके चांगले स्थळ आल्याचे पाहून खूप आनंद झाला. तिला बाकी कोणतीही सत्य परिस्थिती माहीत नसल्याने इतका चांगला मुलगा आपला जावई होणार ही एकच गोष्ट तिने मनात ठेवली होती आणि त्यामुळेच तिला खूप आनंद झाला होता.
"आता आपल्याला लवकरच लग्नाची तयारी करावी लागणार आहे. मला तर काय करू मी काय नको असे होत आहे. माझ्या लेकीचे लग्न, खरंच मला खूप आनंद झाला आहे." असे मेघनाची आई म्हणाली.
"मला सुद्धा खूप आनंद झाला आहे. मला आता माझी मेघना आई मिळणार. खरंच देव बाप्पाने मला आई दिली. मी आई-बाबांच्या लग्नात नवीन ड्रेस घालणार. आपण जाऊया, लवकर तयारी करूया म्हणजे आई लवकर आपल्या घरी येईल." छोटी स्वरा म्हणाली तसे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तराळले. सर्वजण हळवे झाले; पण या सगळ्यांमध्ये राजन मात्र लगेच उठून गेला होता. तो ऑफिसमध्ये काम असल्याने तिथे जास्त वेळ बसू शकला नाही. मेघनाच्या आईला राजनबद्दल सगळे काही माहीत होते. शिवाय मेघना त्याच्याच ऑफिसमध्ये काम करत असल्याने त्याच्याबद्दल तिच्या तोंडून खूप काही ऐकले होते. यावरून तो चांगलाच असणार हे तिने जाणले होते. आता मात्र सर्वजण लग्नासाठी घाई करत होते. मेघनाला देखील या लग्नासाठी खूप उत्सुकता लागली होती. लग्नामध्ये काय काय करावे नि काय नको असे तिला झाले होते; पण शेवटी लग्नाचा खर्च तोलून मोलून करावा लागणार होता. लग्न जरी राजनकडील मंडळी करणार असले तरी एखादी विधी आपण घ्यावा असे तिच्या मनात आले; पण 'तेवढा खर्च आपल्याला झेपेल का? नको नको त्यापेक्षा आपण अगदी साध्या पद्धतीने हे लग्न करावे. उगीचच इतका खर्चाचा घाट नको घालायला. राजनलाही साध्या पद्धतीने लग्न करणे नक्कीच आवडेल. त्यालाही फार कुणाला सांगायची इच्छा नसेल.' असे मेघना मनातच म्हणाली आणि तिने तिचा निर्णय राजनला सांगावा आणि लग्न हे साध्या पद्धतीनेच करावे असे ठरवले; पण राजन तिचे म्हणणे ऐकल का? राजनची आई यासाठी मान्य होईल का? इतक्या दिवसांनी त्यांच्या घरात हे मंगलकार्य होत आहे यामध्ये सर्वजणच आनंदी आहेत, तर त्यांच्या आनंदावर विरजण पडेल की सर्वजण मेघनाच्या होकारांमध्ये हो देतील? असा विचार करत मेघना बसली होती. शेवटी काहीही करून हा विचार राजनसमोर मांडायचा असे तिने ठरवले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा