शब्द झाले मुके 42
मेघना नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली. तिने आज तिचा मुद्दा राजनला समजावून सांगायचा आणि हे लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे असे ठरवले होते. खरंतर ती हे लग्न एक कर्तव्य म्हणून करणार होती; पण हळूहळू जेव्हा राजनबद्दल तिला सत्य समजले तेव्हा मात्र त्याच्याविषयी तिला करुणा वाटू लागली आणि त्यातूनच तिचे त्याच्यावर कधी प्रेम जडले हे तिचे तिला समजले नाही. आता मात्र राजन सोबत लग्न करून आपण आपला सुखी संसार करावा शिवाय स्वराचे चांगले संगोपनही करावे असे तिला नेहमी वाटत होते. यामध्ये तिचा कोणताच स्वार्थ नव्हता; पण तरीही राजनला मात्र ती हे पैशासाठी करत आहे असे वाटत होते आणि त्यामुळेच तिच्याबद्दल त्याच्या मनात कोणत्याच भावना नव्हत्या.
राजन आपल्याला समजून घेईल, आपल्या भावना त्याला समजतील आणि आम्ही दोघे मिळून खूप छान संसार करू अशी संसाराचे अनेक स्वप्नं मेघनाने पाहिले होते; पण प्रत्यक्षात काय होणार आहे हे त्या परमेश्वरालाच ठाऊक.
मेघना ऑफिसमध्ये गेली, तिने पाहिले तर राजन तिच्या आधीच ऑफिसमध्ये आला होता. आता त्याच्यासोबत एक शब्द बोलून घेऊयात का असे तिला वाटले आणि ती राजनच्या केबिनमध्ये जायला निघाली. तिने दारावर टकटक असा आवाज केला.
"कम इन" असा आतून आवाज आल्यानंतर मेघना आत गेली. तिने पाहिले तर राजन लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता. त्याचे तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. ती तशीच शांत उभी राहिली. बराच वेळ झाला तरी राजनने तिच्याकडे पाहिले देखील नव्हते.
"बोला काय काम आहे?" राजन म्हणाला.
"सर, थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे हे तुमच्या आईसोबत मी बोलू शकले असते; पण एकदा तुमच्याशी बोलावे असे मला वाटले म्हणून मी आले आहे. बोलू शकते का?" मेघना म्हणाली. तेव्हा राजनने तिच्यावर एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून "बोल" इतकेच तो म्हणाला.
"आपण लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं का? म्हणजे तुमच्या घरचे माझ्या घरचे इतकेच. बाकी कोणताही गाजावाजा न करता हे लग्न करावे असे मला मनापासून वाटते. तुमचे काय म्हणणे आहे?" मेघना दबकतच म्हणाली.
"धुमधडाक्यात लग्न करायची इथे हौस कुणाला आहे? तसेही मला या लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट नाही." राजन तुसडेपणाने म्हणाला. खरंतर मेघना तिच्या स्वार्थासाठी हे लग्न करत आहे, तिला पैसे मिळावेत यासाठी ती असे करत आहे असे राजनला वाटत असल्याने तो तिच्यासोबत असे मुद्दामून वागत होता. मेघना मात्र तसेच शांत उभी राहिली.
"आता आणखी काय?" राजन रागातच म्हणाला.
"ते तुमच्या आईंना तेवढं सांगाल का की मी सांगू?" मेघना अडखळतच म्हणाली.
"काही सांगायची वगैरे गरज नाही. काही असेल ते मी बघेन. तू जा आता फक्त लग्नादिवशी आवरून यायचे तेवढे काम कर बाकी सगळे मी पाहतो." असे राजन लॅपटॉपमध्ये पाहतच म्हणाला. मेघना मात्र पटकन तिथून निघून गेली. राजन आधी तर व्यवस्थित वागत होता पण आता नक्की त्याला काय झाले आहे? हा प्रश्न तिच्या मनामध्ये घोळत होता. लग्नाआधीच जर आमच्यात एवढे मतभेद असतील तर लग्नानंतर काय अवस्था होईल असा विचार तिच्या मनात येऊन गेला; पण तरीही ती शांत राहिली. जे होईल ते पाहू; पण आधी लग्न तर होऊ दे असे तिने स्वतःच्या मनाला समजावले आणि ती तिच्या कामाला लागली.
इकडे घरामध्ये स्वराची आणि तिच्या आजीची एकच धांदल उडाली होती की लग्नामध्ये काय करू नि काय नको. त्यांनी खूप सारी तयारी सुरू केली होती. मेघनाच्या आईची देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती. मेघनाच्या लग्नात काय काय द्यायचे आणि काय काय नाही याची जणू तिने लिस्ट बनवली होती. दोन्हीकडील मंडळी खूप आनंदात होते. लग्नाच्या तयारीमध्ये गुंतले होते. तर इकडे राजन आणि मेघनाचे काही वेगळे सुरू होते. त्यांना इतक्या मोठ्याने लग्न करायचे नव्हते आणि हा निर्णय त्यांनी घरच्यांना अजून सांगितला देखील नव्हता. जेव्हा घरच्यांना ही गोष्ट समजेल तेव्हा ते तयार होतील की नाही याची जाणीवही त्यांना नव्हती. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून भागून ते दोघेही आपापल्या घरी गेले होते. घरामध्ये पाय टाकताच त्यांना लग्नाच्या गडबडीची जाणीव झाली. प्रत्येक जण आपापल्या तयारी मध्ये गुंतले होते. अजून लग्नाची तारीख ठरली नव्हती तर हे सगळे लग्नाच्या तयारीला लागले होते. तारीख ठरल्यानंतर काय करतात काय माहित असा प्रश्न त्या दोघांना पडला होता.
"राजन, हे बघ मी लिस्ट बनवली आहे. इतक्या सगळ्या पाहुण्यांना मी सांगणार आहे. आज इतक्या दिवसांनी आपल्या घरामध्ये मंगलकार्य होत आहे तर सर्वांना आमंत्रण हे द्यावेच लागणार ना? या शहरांमध्ये कोणाचेही इतक्या मोठ्याने लग्न झाले नसेल तितक्या मोठ्याने आणि धुमधडाक्यात मी तुझे लग्न करणार आहे. काय माहित त्यानंतर कोणते कार्यक्रम मी पाहू शकेन की नाही." असे म्हणून राजनची आई भावुक झाली.
"आई, माझं थोडं ऐकून घे. हे बघ तू मोठ्याने लग्न करायचे असे म्हणत आहेस; पण मला ते योग्य वाटत नाही. कारण त्या सगळ्यांमध्ये पाहुणेरावळे येणार. उगीचच नाही नाही त्या गोष्टी बोलल्या जाणार. त्याचा त्रास तुला होणार. पुन्हा मेघनाला होणार. छोट्या स्वराच्या मनावर त्याचा परिणाम होईल. हे सगळे नकोच ना. त्यापेक्षा अगदी साध्या पद्धतीने आपण हे लग्न पार पाडायला हवे. नंतर पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम किंवा पार्टी वगैरे ठेवून; पण हे लग्न सध्या तरी खूप साध्या पद्धतीने करावे अशी माझी इच्छा आहे. प्लीज, तू नको म्हणू नकोस." राजन त्याच्या आईला समजावत होता.
"अरे, पण मी आणि स्वराने तुझ्या लग्नाची खूप सारी स्वप्नं पाहिली होती. ते आता कसे पूर्ण होणार? तू तर साध्या पद्धतीने लग्न करूया म्हणत आहेस. आमचे काय?" राजनच्या आईने राजनला प्रश्न केला.
"अगं आई, आपण नंतर एक खूप मोठी पार्टी ठेवूया. त्यामध्ये तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता; पण आता नको प्लीज." असे राजन म्हणताच राजनची आई नाराज झाली; पण तिचा तो राग फार टिकणारा नव्हता.
"अगं आजी, आता या वेळापुरतं आपण मेघना आई आणि बाबांच्या मर्जीने करूयात; पण पुढच्या वेळेस यांचे काही ऐकायला नको. आपल्याला तर लवकरात लवकर मेघना आई या घरामध्ये यायला हवी आहे ना? ती एकदा काय या घरामध्ये आली की आपण मस्त मज्जा करू. तोपर्यंत बाबाच्या मर्जीने सगळे करूयात." असे स्वरा तिच्या आजीला समजावत होती. तेव्हा कुठे राजनची आई याला तयार झाली.
"बरं, ठीक आहे. तुमच्या पद्धतीने जे काही करायचे आहे ते करा; पण एकदा मेघना या घरामध्ये आली की तुम्हा दोघांनाही माझेच ऐकावे लागणार आहे. तू मला काही समजवायला गेलास तर मी तुझे काही एक ऐकणार नाही." राजनची आई राजनला खडसावून सांगत होती.
"जशी तुझी आज्ञा आई; पण आता तरी थोडं हसून दाखव आणि जी काही तयारी करायची आहे ती तयारी करू लाग." असे राजन म्हणताच राजनची आई शांत झाली. आता ती फक्त त्या दोघांच्या लग्नाची तारीख ठरवण्याच्या मागे लागली होती. अखेर भटजींकडून लग्नाची तारीख ठरली. अगदी जवळचीच तारीख त्यांनी ठरवली होती. लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्याचे ठरवल्यामुळे फार काही करावे लागणार नव्हते, त्यामुळे जवळची तारीख जरी असली तरी त्यांना चालणार होते आणि तसेही मेघना कधी एकदा त्या घरात येते असे त्यांना झाले होते, त्यामुळे ते सर्वजण तारीख फायनल करून लग्नाच्या तयारीला लागले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा